प्रेम मिळालं तर तृतीयपंथी भीक मागणार नाही - माधुरी शर्मा | Transgender
X
प्रेमाला कशाचीही बंधनं नसतात. अगदी लिंगभेदाचंही बंधन नसतं. त्यातच तृतीयपंथीयासोबत लग्न करण्याचा धाडस आणि माणूस म्हणून जगण्याची धडपड करणारे अनेकजण आजही समाजात दिसतात. मात्र, केवळ तृतीयपंथी असल्यानं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा का, असा सवाल व्हॅलेनटाईन डे च्या निमित्तानं उपस्थित केला जातोय.
आजही समाजामध्ये प्रेमाबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. बहुतांश वेळी प्रेमाबाबत संकुचित मनोवृत्ती समाजात पाहायला मिळते, असा स्पष्ट आरोपच तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढणाऱ्या तृतीयपंथीय माधुरी शर्मा यांना केलाय. पुण्यात “राईट टू लव्ह”या संस्थेने व्हेलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर एक कार्यक्रम घेतला, त्यावेळी माधुरी बोलत होत्या. आजही तृतीयपंथीयांबद्दल समाजात वेगवेगळे विचार ऐकायला मिळतात. मात्र, याच समाजामध्ये तृतीयपंथीयांसोबत लग्न करण्याचं धाडस दाखवणारेही लोकं आहेत. दरम्यान, तृतीयपंथीयांना प्रेम मिळालं तर कुठल्याही तृतीयपंथीयांना रस्त्यावर भीक मागण्याची गरज पडणार नाही, असं मत स्वतः तृतीयपंथीय असलेल्या माधुरी शर्मा यांनी व्यक्त केलं. तृतीयपंथीयंाना आरक्षण नाही. त्यावर माधुरी शर्मा म्हणाल्या की, आरक्षण तर फार लांबची गोष्ट आहे, तृतीयपंथीयांना माणूस म्हणून जगण्याचा मूलभूत अधिकारचं नाही तिथे आरक्षणाचा प्रश्नच नाही, असा उद्वीग्न सवालही माधुरी शर्मा यांनी उपस्थित केला.