पुस्तक परिचय : 'आहारसंस्कृती, आपल्या देशाची आहारसंहिता'
X
खाणंपिणं हे नेहमीच खाण्यापिण्याच्या पलीकडे जाणारं असतं. जगण्याचं प्रतिबिंब त्यात ठळकपणे पडतं. एकूणच जीवनसंस्कृतीचा आत्मा त्यात एकवटलेला असतो... साहित्य, भाषा, सामाजिकता असे वेगवेगळे संकेत घेऊन येणार्या खाद्यसंस्कृतीचा वेध घेणारं आणि त्याचबरोबर विविध खाद्यपदार्थांच्या पाककृतीही समोर ठेवणारं, लेखिका नंदिनी आत्मसिद्ध यांचं नवंकोरं पुस्तक प्रकाशित अलीकडेच झालं आहे- 'आहारसंस्कृती-आपल्या देशाची आहारसंहिता' .
भारतात जशी सांस्कृतिक विविधता आहे तशीच खाद्यसंस्कृतीचीही विविधता आहे. पण ही विविधता कशी आहे, याची उत्सुकता अनेकांना असते. भारताच्या खाद्य संस्कृतीबद्दल तुम्ही ऐकले असेल पण या विविधतेने नटलेल्या खाद्यसंस्कृतीची माहिती तुम्हाला एकत्र मिळाली तर? हो याच खाद्यसंस्कृतीवर आधारित 'आहारसंस्कृती, आपल्या देशाची आहारसंहिता' हे नंदिनी आत्मसिद्ध लिखित आणि संधिकाल प्रकाशनतर्फे निर्मित पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे.
खाद्यपदार्थांसोबतच विशिष्ट माहौल, जेवणपद्धती, स्वयंपाकाकडे बघण्याचे दृष्टिकोन, चौकटीपलीकडे जाऊन आहारात नवनव्या गोष्टींना मिळणारं स्थान अशा अनेक बाबींचा वेध हे लिखाण घेतं. आहारसंस्कृतीत भाषा, सामाजिकता, आपपरभाव, स्वागतशीलता, अशा अनेक गोष्टी मोडतात. धर्म, सणवार, निसर्गचक्र, भौगोलिकता याच्याशीही ती जोडलेली असते. अशा अनेक प्रवाहांचा वेध घेत आणि आहारासंदर्भातली वेगळी माहिती देत केलेलं हे लेखन जीवनाकडे बघण्याची एक निराळी नजर देऊन जाणारं आहे.