Home > मॅक्स स्पोर्ट्स > महाराष्ट्रात चाललीय ‘दंगल’ - भाग २

महाराष्ट्रात चाललीय ‘दंगल’ - भाग २

महाराष्ट्रात चाललीय ‘दंगल’ - भाग २
X

कुस्तीचा खेळ फार आव्हानात्मक. कसून व्यायाम आणि दणकट आहार या गोष्टी असाव्याच लागतात. कुस्तीत लक्ष्य गाठण्यासाठी लक्ष केंद्रित करण्याचीही जरूर आहेच. क्षणिक मोह आवरावे लागतात. तालमीत दिसत होतं की, या मुलींनी तशी सवय करून घेतली आहे. आज मोबाईलच्या जमान्यात पाळण्यातल्या बाळालाही गप्प करायला मोबाईलवर एखादा कार्टूनचा व्हिडीओ लावून दिला जातो. त्या रंगबेरंगी दुनियेत आणि संगीतात बाळ गुंतून पडतं. पण तालमीत मोबाईलवर बंदी आहे. गुंड सरांची मुलगी कुस्तीगीर अंकिता गुंड हिला म्हटलं, "तुझा मोबाईल नंबर असेल तर दे ना.' तर ती अगदी सहज "माझ्याकडं मोबाईल नाहीये' असं म्हणाली. मी अवाकच. म्हटलं, "कॉलेजमधल्या मैत्रिणींशी बोलायचं वगैरे असेल तर...'

"संपर्कच नाहीये...म्हणजे तशा मैत्रिणीही नाहीये. येरवड्याच्या मोझे महाविद्यालयात आहे. पण त्यांनी सवलत दिली आहे. त्यामुळे रोजचं जाणं होतंच असं नाही. त्यामुळे मैत्रिणी नाहीत.' कुस्तीसाठी मुलींनी इतकं झोकून दिलं आहे. मोबाइलसाठी वेळ तरी कुठे असतो म्हणा मुलींकडं... त्यांचा दिवस सुरू होतो पहाटे साडेचार वाजता. उठल्यानंतर जरासं आवरलं की व्यायामाला सुरुवात होते. सपाटे, जोर बैठका, डिप्स असा चांगला तासभर व्यायाम होतो. मग आंघोळी उरकून पुन्हा सहा वाजता मैदानावर धावणं, स्प्रिंट (जोरात धावणं) असे व्यायामप्रकार होतात. मग मैदानावरचा स्टॅमिना वाढवण्यासाठी, दम रोखून धरण्यासाठीचे काही वेगवान व्यायाम तसेच बास्केटबॉल, फुटबॉल हे खेळही व्यायाम म्हणून खेळले जातात. त्यानंतर थोडा वेळ कुस्तीचा प्रात्याक्षिक सराव केला जातो. 8.30 पर्यंत हे सगळं चालतं. मग दुपारी शाळा-महाविद्यालय करून संध्याकाळी पुन्हा 5.30 ते 8 या वेळात प्रत्यक्ष लढतींचा सराव केला जातो. कधी कमी वेळ, कधी जास्त वेळीच्या लढती लावल्या जातात.

भरपूर व्यायाम आणि भरपूर उर्जा लागत असल्यानं अर्थातच क्रीडापटूंना आहारही भरपूर लागतो. नाश्त्यामध्ये थंडाई- बदामाचे दूध, केळी, फळं, पौष्टिक लाडू, तीन वेळचं व्यवस्थित जेवण असा आहार या मुली घेतात. यातही परिस्थितीनुसार आहार असतो. साधारणपणे सर्वसामान्य कुटुंबात शेंगदाण्याचे लाडू परवडतात. त्यापेक्षा बरी परिस्थिती असणारे सुकामेव्याचे लाडू देतात तर अतिशय उत्तम परिस्थिती असणारे थेट प्रोटीन्स देतात. दुधातून दोन चमचे प्रोटीन्स घेतले जाते. पण अशा प्रकारचा खुराक घेणारे अगदीच मोजके. एकूणच संयमित, शिस्तबद्ध जगण्याबद्दल काय वाटत असेल यांना?

साताऱ्यातील कोरेगावची प्राजक्ता म्हणाली, "कुस्ती खेळायला आवडतं म्हटल्यावर हे करावंच लागणार. व्यायामामुळे भरपूर उर्जा जाते त्यामुळे ती मिळविण्यासाठी खाणं भागच आहे. आणि ध्येय ठरलंय तर मेहनतही आवश्यक आहे. '' त्याला जोडूनच विचारलं, "पण मग इतर मुली जशा केस वाढवतात, नटतात, मौज करतात तसं करण्याचा मोह होत नाही का?'' तर ठाण्याची अश्विनी मढवी म्हणाली, "ही चार दिवसांची मजा आहे. उलट आम्ही तेच चार दिवस कष्ट करतोय आणि त्यातून आयुष्यभराचं नाव कमावणार आहोत. एखाद्या क्षेत्रात मिळणारं नाव कायम राहतं हा चार क्षणांचा मोह खूप महागात पडतो. ''

तिला साथ देत अंकिता गुंड म्हणाली, "स्पर्धा जिंकल्यानंतरचा आनंद खूप असतो. त्यामुळे नटण्या-थटण्याचा मोह होत नाही. उलट स्पर्धांमधून होणारं कौतुक, एक एक ट्रॉफी मनोबल वाढवत राहते. ते अधिक महत्त्वाचं वाटतं. मुलींचं शरीर व्यायामानं बळकट, मजबूत होतं. सेल्फ डिफेन्ससाठी कराटे वगैरे गोष्टींचा विचार करतो पण कुस्तीमधून मुलींना तोच आत्मविश्वास आणि तेच स्वसंरक्षणाचे धडे मिळतात. आपल्याकडे मुलगी म्हणजे नाजूक, वगैरे चुकीच्या धारणा आहेत. मुलीनं सक्षम असावं असं का नाही वाटत?'' शरीराच्या ठराविक मापांवरून मुलींची पारख करणाऱ्यांना अंकिताचं उत्तर म्हणजे त्यांच्या डोळ्यात एक झणझणीत अंजन आहे असं वाटलं.

बोलताना, सतत माती आणि मॅट असा विषय निघत असल्यामुळे दोन्हीतील फरक समजून घेणे गरजेचं वाटलं. ग्रामीण भागात तांबड्या मातीत कुस्ती खेळली जाते. कुस्तीगीरही आखाड्यात, तालमींत अशाच प्रकारे सराव करतात मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवर स्पर्धा होतात. मातीतील कुस्तीपेक्षा मॅटवरच्या कुस्तीत अधिक गतिमानता असते. त्यामुळे तिथले तंत्र, डावपेच हे वेगळे असतात आणि मातीतील वेगळे. कुस्तीगीराने जर मॅटवर सराव नाही केला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करू शकत नाहीत. त्यामुळेच आता ग्रामीण भागातील प्रशिक्षण केंद्रांनाही जास्तीत जास्त मॅट मिळण्याची गरज असल्याचे प्रशिक्षकांनी नमूद केलं.

आत्ता कुस्ती खेळत असल्या तरी पुढे काय? आपल्या देशात क्रिकेट हा लोकप्रिय खेळ असतानाही महिला क्रिकेटर्सला पुरूष क्रिकेटर्सइतकं प्रेम मिळत नाही अशी वस्तुस्थिती आहे अशा सगळ्या परिस्थितीत कुस्ती खेळणाऱ्या मुलींचं पुढं काय असा विचार सारखा डोकावत होता. मग मुलींना याविषयी छेडलं तर यशश्री म्हणाली, "कुस्ती खेळत असलो तरी शिक्षणावरही लक्ष केंद्रित केले आहे. आजच्या घडीला कोणत्याही खेळाबरोबर शिक्षण महत्त्वाचंच.''

मुलींशी बोलताना लक्षात आलं की कुस्ती खेळणाऱ्या अनेकींना पोलीस खात्यात जायचे आहे. पोलीस उपनिरीक्षक, जिल्हा क्रीडा अधिकारी, गटशिक्षण अधिकारी अशी या मुलींची स्वप्नं आहेत. मुलींचं हे स्वप्न हवेतील गप्पा नव्हत्या तर त्यांच्यापुढे तशा आदर्श कुस्तीगीर आहेत. विजया खुटवड या सहायक पोलीस निरीक्षक, गीताई गटोर या शिक्षणाधिकारी, संपदा गटोर जिल्हा क्रीडा अधिकारी, सात-आठ जणी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून रूजू झाल्या आहेत. वेगवेगळ्या पदांवर 25 कुस्तीगीर पोलीस खात्यात आहेत. त्यामुळे कुस्तीत कामगिरी आणि शिक्षणाची साथ अशी सांगड घालणाऱ्या कुस्तीगीरांचं भविष्य उज्जवल आहे.

कुस्ती प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींमध्ये ग्रामीण- शहरी असा भेद दिसला नाही. ग्रामीण मुलींइतकंच शहरातल्या मुलींचं प्रमाण दिसलं. देशाचे आयकॉन, खेळातून मिळणारी प्रसिद्धी हाही भाग कुस्तीच्या आकर्षणाकडे आहे हेही डावलता येणार नाही, प्रशिक्षक सांगत होते... "कुस्ती स्पर्धेत मुलामुलींचं प्रमाण सारखं झालं आहे. सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या विभागांसाठी आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत 50 मुले तर 40 मुली असे चित्र होते. मुलीही हिरीरीने कुस्ती खेळण्याची मजा घेत आहेत'' असे सोलापूरच्या श्रीकृष्ण व्यायामशाळेचे प्रमुख हिंद केसरी विजेते भारत मेकाले यांनी सांगितले.

गुंड सरांचा अनुभव याला दुजोरा देणारा. कुस्तीत गाजणाऱ्या मुलींना पाहून त्यांच्या गावांतून पालकांची सकारात्मक प्रतिक्रिया येते, असे त्यांनी सांगितले. परभणीच्या डी. एस. एम. एस. कॉलेजचे प्राध्यापकआंतरराष्ट्रीय पंच बंकट यादव यांचं एक निरीक्षण असं की, " घरातच कुस्ती असेल तर शिकवायला अवघड जात नाही. खेळाडू प्रशिक्षणानंतर चांगलं खेळतोच. पण घराणेशाही असेल तर मुलं लहानपणापासूनच कुस्ती पाहत वाढलेले असतात याचा परिणाम खेळाकडं पाहण्याच्या मानसिकतेवर झालेला असतो.

राज्यातील काही गावातील तालमींनी कुस्ती प्रशिक्षण केंद्रांमध्ये परिवर्तन केलं आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं काही ठिकाणी मॅट पोहचवली आहे. महाराष्ट्रात तर कुस्तीच्या खेळाला दर्जा प्राप्त आहे. शासकीय हालचाली होत आहेत मात्र त्याचे प्रमाण वाढण्याची गरज गुंड यांनी बोलून दाखवली.

"शासकीय स्तरावर चांगल्या खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र ती फारच कमी असते सर्वसाधारणपणे कुस्तीगिराच्या एका महिन्याच्या आहाराचा खर्च 10 हजारापर्यंत जातो. गरीब खेळाडूंना हा खर्च परवडत नाही मग तो कुस्तीगीर सर्व स्पर्धा आणि जत्रांमध्ये भाग घेत राहतो. याचा परिणाम त्याच्या खेळावर होतो. दुसरी गोष्ट वजन. ग्रामीण भागात आजही वजन खूप असलं, पैलवान दिसलं म्हणजे झालं, असा समज आहे. पण वजन वाढवून कुस्तीगीर होता येत नाही." असं यादव यांनी सांगितलं.

मुलींना पाहिलं तर खरोखरच त्या अजिबात वजनदार दिसत नव्हत्या. मध्यम बांध्याच्या, काटक दिसत होत्या. यादव पुढे म्हणाले, ''तुमच्याकडे वजनाची नव्हे तर सामर्थ्य असण्याची गरज असते. सध्या राज्य कुस्तीगीर परिषदेच्यावतीनेच चांगले खेळाडू शोधून पुण्यातील मामासाहेब मोहोळ केंद्रात प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे.''

जामखेड येथील आरणगावच्या अर्णेश्वर लाल आखाडा येथेही कुस्तीगीर अयुब शेख हे मुला-मुलींना प्रशिक्षण देतात. त्यांनी नुकताच एक आखाडा बांधला आहे. मात्र फारश्या सोयी नाहीत. तरीही कुस्तीच्या प्रेमापोटी शेख मुला-मुलींना प्रशिक्षण देत आहेत. परिसरातील पाचसहा जणी कुस्ती शिकायला येतात. शेख म्हणाले, राज्यस्तरावरील स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या माधुरी भोसले या मुलीनं दोनदा राष्ट्रीय स्तरापर्यंत यश मिळवलं आहे. तसेच मिळवलंय. आजारी आईवडील, लक्ष देणारं कोणी नाही, यामुळे अयुब शेख यांनीच तिच्या 8वी ते 10वीच्या शिक्षणाचाही भार उचलला. दीड वर्षांपासून तर ती त्यांच्या आखाड्यातच राहत आहे. तिच्यासारख्या अन्य दोघीही तिथंच रहायला आहेत.

गरीब परिस्थितीतून आलेल्यांसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पान्सिबिलिटी या माध्यमातून मदत मिळवण्याचे प्रयत्न चालले आहेत. विविध कंपन्यांकडून आपल्या व्यायामशाळेतील दोन तीन मुलींसाठी अशी मदत गुंड यांनी मिळवली आहे.

नव्यानं प्रशिक्षणासाठी आलेले खेळाडू हे सोयी-सुविधां अभावी, पैशांअभावीच मागे पडतात. त्यामुळे शासनानं खेळाडू घडविण्यासाठी पैसा ओतण्याची गरज आहे, असे कुस्तीगीर अयुब शेख म्हणाले.

ऑलिंपिक पदकं जिंकणाऱ्या मुलींमुळे पालक कुस्तीसाठी प्रोत्साहन देऊ लागले आहेत. साक्षी मलिक, गीता फोगट यांची चर्चा अजून हवेत आहे. ऑलिंपिक 2020पर्यंत आपणही मजल मारायची याचा चंग बांधलेल्या मुली दिसत होत्या.

जोग महाराज व्यायामशाळेत शनिवारचा दिवस क्रॉसकंट्रीसाठी असतो. धावण्याचा व्यायाम. नंतर इतर व्यायामांना सुट्टी. कारण धावण्याने थकायला होतं. गप्पा रंगल्या होत्या त्या दुपारी आरामाच्या वेळात. पण आता त्या उरकत्या घेण्याची गरज होती. प्रशिक्षकाच्या कधी प्रेमळ तर कधी दमात घेण्याच्या आवाजात सगळा आखाडा कुस्तीमय व्हायचा होता...!!!

हिनाकौसर खान-पिंजार

Updated : 4 Aug 2017 8:31 PM IST
Next Story
Share it
Top