कशासाठी पाहिजे न्युट्रल क्युरेटर?
Max Maharashtra | 2 Jun 2017 10:04 AM IST
X
X
नुकतंच बीसीसीआयने “न्युट्रल क्युरेटर” ची नियुक्ती करावी असे मत मांडलं आहे. यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे क्युरेटर सुधीर नाईक यांच्याशी बातचीत करता ते म्हणाले ही उत्तम कल्पना असून यामुळे क्रिकेट खेळाला फायदाच होईल. कारण भारतामध्ये अगदी रणजी करंडकाच्या सामन्यामध्ये सुद्धा स्वतःला हव्या तशा विकेट तयार करून घेण्याची वृत्ती वाढली आहे. त्यामुळे क्रिकेटमधील “फेअर प्ले” नष्ट होत असून त्याचा दुष्परिणाम क्रिकेटला भोगावा लागतो. परंतु हा निर्णय घेतानाच आपल्याकडे असे न्युट्रल क्युरेटर किती आहेत याची खातरजमा असोसिएशनला करून घ्यावी लागेल. कारण क्युरेटर हा देखील कुठल्यातरी असोसिएशनचा कर्मचारी असतो. त्यामुळे असोसिएशन आणि कर्णधाराचा आदेश धुडकावून बीसीसीआयच्या नियमावलीप्रमाणे काम करण्याची क्षमता त्या क्युरेटरकडे आहे का? हे एकदा तपासून घ्यावे लागेल. अशी हिम्मत शिक्षित क्युरेटरच दाखवू शकतात असे मत सुधीर नाईक यांनी मांडले. एकूण क्युरेटर आणि त्यांचे काम यावर प्रकाश टाकताना सुधीर नाईक यांनी सांगितले की २००५ सालची घटना आहे. बीसीसीआयला आयसीसी कडून एक खरमरीत पत्र आले होते. त्या पत्रामध्ये मुंबईमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने का बंद करू नये अशी विचारणा करण्यात आली होती. त्याला कारण देखील तसे गंभीर होते. असे काय घडले की मुंबईमधून क्रिकेटचे सामने बंद करण्याच्या निर्णयापर्यंत आयसीसी या सर्वोच्च संस्थेला विचार करावा लागत होता. या पूर्वीच्या एका आंतरराष्ट्रीय सामन्याचा निकाल फक्त दोन दिवसात लागला होता. आणि त्या मैदानाच्या आणि खेळपट्टीच्या गुणवत्तेवर सर्वस्तरावरून टीकेची झोड उठली होती. आजी माजी क्रिकेटपटू तसेच नावाजलेल्या क्रिकेट संस्था, पदाधिकारी प्रत्येकाने या खेळपट्टीच्या दर्जा आणि गुणवत्तेवर शंका उपस्थित केली होती. आणि म्हणून आयसीसीने बीसीसीआय या संस्थेला खरमरीत पत्र लिहून यापुढे मुंबईला सामने का द्यावे असा प्रश्न उपस्थित केला होता. आणि मुंबईचा गतलौकिक लक्षात घेऊन एक सामना देत असून या वेळी अशी काही चूक झाल्यास यापुढे आंतरराष्ट्रीय सामने देता येणार नाही असे कळविले होते. हे पत्र बीसीसीआयला मिळताच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनी माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर, पदाधिकारी रवी सावंत आणि रत्नाकर शेट्टी यांना पाचारण केले व याबाबतीत सल्ला मागितला. हे काम कोण करू शकेल असे विचारले. यावर दिलीप वेंगसरकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता सुधीर नाईक यांचे नाव सुचवले. शरद पवारानी त्यांच्या नावाला होकार देऊन तत्काळ सुधीर नाईक यांच्याशी भेट घेण्याचे सुचविले. तीन महिन्यावर विश्वचषकचे सामने आले होते आणि त्यापूर्वी वानखेडेची खेळपट्टी तयार करण्याचे कठीण काम घेऊन वेंगसरकर सुधीर नाईकयांच्याकडे पोहोचले. क्रिकेट आणि मुंबई वर जीवापाड प्रेम असणारे सुधीर नाईक यांनी यापूर्वी झालेल्या अपमानाला विसरून पुन्हा एकदा वानखेडेवर पाऊल ठेवले. सुधीर नाईकांना फक्त खेळपट्टीच तयार करायची नव्हती तर उत्तम खेळपट्टी तयार करून मुंबईबद्दलचा विश्वास कायम ठेवायचा होता. हे आव्हान सुधीर नाईक यांनी अतिशय समर्थपणे पेलले आणि त्यानंतर आजपर्यंत आयसीसी कडून बीसीसीआयला अशाप्रकारचे पत्र कधीही आले नाही. खेळपट्टी तयार करण्यामागील शास्त्र समजून घेण्यासाठी सुधीर नाईक यांच्या दादर येथील खास भेट घेतली.
नमस्कार सर... नमस्कार असा प्रतिसाद देत झहीर खान या भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाच्या शिक्षकांनी बसण्यास सांगितले. सर खेळपट्टी तयार करणे म्हणजे काय अशा बाळबोध प्रश्नाला उत्तर देताना सुधीर नाईक म्हणाले, खेळपट्टी म्हणजे ज्याला आमच्या क्रिकेटच्या भाषेत विकेट म्हणतात. क्रिकेट या खेळाचा विकेट हा आत्मा आहे. आणि ती विकेट व्यवस्थित नव्हती त्यावेळेस आयसीसीने आपल्यावर दट्ट्या आणला होता. जगभरात विकेट तयार करणे हे अतिशय महत्वाचे आणि जबाबदारीचे काम मानले जाते. विकेट तयार करणाऱ्या व्यक्तीला “क्युरेटर” म्हणतात. मी गेली सुमारे तीस वर्षे विकेट तयार करत आहे. “इट इज अ सायन्स”... एम.एस्सी (ऑरगानिक केमिस्ट्री) असलेले आणि सुमारे पंचवीस वर्षे “टाटा केमिकल” मध्ये क्वालिटी कंट्रोल अधिकारी म्हणून जबाबदारी पार पडलेले सुधीर नाईक सांगत होते. क्युरेटरच महत्वाचे काम विकेट तयार करण आणि त्यासाठी त्याला माती, गवत आणि हवामान याचे ज्ञान असावे लागते. मी स्वतः क्रिकेट खेळल्यामुळे विकेट कशी असावी याचा अंदाज होताच. परंतु माझ्या सायन्सच्या शिक्षणामुळे मी त्याला शास्त्रीय बैठक दिली. वानखेडेच्या मातीची रीतसर प्रयोगशाळेत तपासणी केली. वेगाने वाढणाऱ्या गवताचा अभ्यास केला आणि सर्वप्रथम नेहमीचे गवत पूर्णपणे कापून “बर्मुडा” गवत लावले. हे बर्मुडा गवत... सर पुढे समजावून सांगू लागले. हे गवत भारतीय नाही. हे बर्मुडा बेटावर तयार होते म्हणून याला बर्मुडा गवत म्हणतात. हल्ली क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच देशात हेच गवत लावतात. भारतीय गवतासारखे हे झटपट वाढत नाही. जास्तीतजास्त याची उंची १ते १.५ इंच इतकीच वाढते. याला पाणीदेखील कमी लागते. हे गवत आम्ही विकेटच्या बाजूने मैदानात लावले. आता खेळपट्टी तयार करण्यासाठी वेगळा अभ्यास करावा लागतो. आपल्या वानखेडेला एकूण तेरा खेळपट्ट्या आहेत. महत्वाच्या सामन्यासाठी मधली विकेट राखून ठेवतो. तर या तेरा विकेट्स एकाच प्रकारच्या असणे हे आव्हान असते. प्रत्येक विकेट १०फुट बाय १३०फुट म्हणजे १३०० चौरस फुट असते. सर्वप्रथम ही संपूर्ण विकेट चार फुट खोल खणून काढतो. आणि घाणेरडी माती उपसून काढून टाकतो. या मध्ये जीवजंतू असतात ते नष्ट करण्यासाठी जंतुनाशक फवारणी करावी लागते. पुन्हा काही दिवसांनी ती माती प्रयोगशाळेत पाठवून जंतुविरहित असल्याची खात्री करून घ्यावी लागते. एखाद्या कसलेल्या शिक्षकाप्रमाणे सुधीर नाईक विकेट तयार करण्याची प्रक्रिया समजावून देत होते. आता त्या चार फुट खोल खड्ड्यात सर्व प्रथम दगडाची खडी टाकायची, त्यावर वाळू पसरवायची आणि त्यावर विटा अंथरायच्या. पुन्हा एकदा जवळपास तीन फुट चांगली लाल माती पसरायची. आपल्याकडे बऱ्याचवेळा लाल माती कल्याणवरून मागवतो. हे सर्व काम ३१ मे पूर्वी म्हणजे पावसाळ्यापूर्वी संपवावेच लागते. कारण त्यानंतर मुंबईत पावसाला सुरवात होते. क्रिकेट खेळणाऱ्या देशामधील मातीमध्ये साधारण ४०% ते ५०% क्लेचा अंश असतो. त्यामुळे ती माती विकेटला चिकटून राहते. परंतु आपल्या वानखेडेमधील मातीमध्ये क्ले चा अंश फक्त १८% ते २०% इतकाच आहे. त्यामुळे या विकेटवर पाच दिवसीय कसोटी सामने खेळणे तर खूप कठीण असेल कारण दोन किंवा तीन दिवसांनी माती विकेटवरून सुटेल आणि विकेट खराब होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. आणि ही विकेट अक्षरशः आखाडा होईल असे मत जाणकारांनी व्यक्त केले होते. अशा वेळेस माझे ऑरगानिक केमिस्ट्रीचे ज्ञान उपयोगी पडले. या मातीमध्ये आपल्याकडे मिळणारा मुरूम मिसळून मातीतील क्लेचे प्रमाण वाढवले. आज वानखेडेची विकेट एक आदर्श विकेट म्हणून ओळखली जाते. या विकेटला आयसीसीचे तत्कालीन मुख्य क्युरेटर अन्डी अत्किंसन यांनी लेखी प्रशस्तीपत्र पाठवून आमचे कौतुक केले होते.
विकास नाईक
Updated : 2 Jun 2017 10:04 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire