“डास”बंदकीचे उद्धवपुराण! - सचिन सावंत
Max Maharashtra | 22 April 2019 4:04 PM IST
X
X
धारावीमधील भाषणात उद्धव ठाकरेंनी धारावीतल्या लोकांना चावणारा डास हा मातोश्रीवर येऊन मलाही चावतो त्यामुळे धारावीकरांशी माझे रक्ताचे नाते आहे, असे म्हटले आहे. या अगोदर मुंबईमधील वाढत्या डासांचा उपद्रव पाहता आम्ही अज्ञानी लोक उगाच मुंबई महापालिकेच्या कारभाराला दोष देत होतो. परंतु मुंबईकरांमध्ये भाऊबंदकी वाढावी, सद्भावना निर्माण व्हावी एवढ्या मोठ्या उदात्त हेतूने डासांची पैदास होईल या हेतूने पाहिले जात होते. हे समजल्यावर उद्धव ठाकरेंमधील विचारवंत, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आम्ही इतकी वर्ष ओळखू शकलो नाही याबद्दल आम्हाला आता वैषम्य वाटत आहे.
‘डासभाऊ’ हा शोध लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांची महानता जगाने ओळखली पाहिजे याकरता शांती व विज्ञान या दोन्ही क्षेत्रातील कामगिरीसंदर्भात विश्वडासबंधुत्व वाढवण्याकरीता जागतिक नोबेल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सांवत यांनी केली आहे.
सचिन सावंत पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या या शोधामुळे वैज्ञानिक क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे. डासांचा नायनाट करण्यासाठी या अगोदर कासवछाप अगरबत्तीसह विविध उत्पादने वापरुन डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांना पायबंद कसा घालता येईल याकडे जनतेचा प्रयत्न असायचा परंतु डासांचा एवढा महान उपयोग असू शकतो हे कळल्यानंतर प्रेम, बंधुभाव आणि सद्भावना सारख्या महान उद्देशांसाठी आता या उत्पादनांवर बंदी घालायलाच हवी. परंतु नोबेल पुरस्कारासाठी अडथळा निश्चित आहे.
एकच डास दोन व्यक्तींना चावल्याने त्यांच्यात बंधूभावाचे नाते तयार होते, असे उद्धवजींनी आपल्याला सांगतिले असले तरी तोच डास पतीला चावल्यानंतर पत्नीला चावला तर समाजव्यवस्था धोक्यात येऊ शकते. त्यामुळे नोबेल पुरस्कारातील हा अडथळा दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सहकार्याने संशोधन करुन या डासांना काही प्रशिक्षण देता येईल का किंवा पती-पत्नी यांना चावल्यानंतर त्यांच्यात बंधूभाव निर्माण होऊ नये याकरता काही लस किंवा काही प्रतिबंधात्मक उपाय योजता येतील का याचाही शोध उद्धव ठाकरे व मुंबई महापालिकेनं घेतला पाहिजे. परंतु यातून एकमात्र चांगली गोष्ट साध्य होऊ शकेल, कोणत्याही महिलेकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या पुरुषाला हे डास पकडून त्या महिलेला चाववावा आणि त्या पुरुषाला चाववावा लागेल त्यांच्यामध्ये बहिण-भावांचे नाते तयार होण्यास मदत होईल. डासबंदकीतून महिलांमध्ये होणाऱ्या अत्याचारामंध्ये प्रचंड घट होऊ शकेल. परंतु धर्म व जातीच्या नावाने राजकरण करुन समाजव्यवस्था बिघडवणाऱ्या व राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या भाजप शिवसेनेला हे कितपत पचनी पडेल यात शंका आहे,असं होऊ नये याकरता काही प्रतिबंधात्मक उपाय उद्धवजींनी योजले असतीलच, भविष्यात तेही उघड होईल असे उपरोधिकपणे सावंत म्हणाले.
गेली पाच वर्षे भाजप आणि मोदींवर प्रचंड आगपाखड करणाऱ्या शिवसेनेने तसेच ‘चौकीदार चोर है’, म्हणणारे उद्धव ठाकरे अचानक भाजपबरोबर युती करुन मोदींना मोठे भाऊ का म्हणाले? या जनतेल्या पडलेल्या प्रश्नाचे उत्तर जनतेला मिळाले आहे. उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस,यांना एकच डास चावला आहे असे दिसते. अमित शाह व भाजप नेते उद्धवजींच्या मनधरणीला मातोश्रीवर मोदींना चावलेला डास घेऊन जात होते असे समजते. प्रचंड का कू करत शेवटी उद्धवजींनी स्वतःच त्या डासाकडून चाववून घेतले असेही विश्वसनीय सुत्राकडून समजते. परंतु मातोश्रीवरचा डास किरीट सोमय्यांना का चावला नाही? याविवंचनेत सोमय्या असतील. त्यामुळे सोमय्यांनीही एखादा डास पकडून उद्धव ठाकरेंची वेळ मागायला काही हरकत नाही, असेही सावंत म्हणाले.
Updated : 22 April 2019 4:04 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire