Home > मॅक्स रिपोर्ट > डाव्यांनीच 'आयपीएल'चे मैदान मारले....!

डाव्यांनीच 'आयपीएल'चे मैदान मारले....!

डाव्यांनीच आयपीएलचे मैदान मारले....!
X

अखेर इंडियन प्रिमीअर लीग म्हणजेच आयपीएलचा दहावा हंगाम संपला. 5 एप्रिलपासून सुरु झालेल्या 'मनोरंजक क्रिकेट'चा शेवट झाला. या 'मनोरंजक क्रिकेट'चा बादशाह ठरला मुकेश अंबानींचा मुंबई इंडियन्स. पण मुंबई इंडियन्स जरी आयपीएलचे 'जिओ' रे बाहुबली ठरले असले तरी या स्पर्धेचे खरे हिरो आहेत 'डावे'.

आता डावे म्हणजे कोण? डावे म्हणताच लगेच डोक्यात राजकारण येतं. पण येथे राजकारणाचा काहीही संबंध नाही. राजकारणातल्या डाव्यांशी यांचा काही संबंध नाही. तर हे क्रिकेटमधील आक्रमक डावे आहेत. आधी क्रिकेटच्या मैदानात खूप कमी डावे फलंदाज किंवा गोलंदाज दिसायचे. मात्र सध्या डावेच खेळाडू आपल्या आक्रमक फलंदाजीने गोलंदाजांशी फुल टू राडा करतांना दिसत आहे. आयपीएलमध्ये याचा अनुभव आला. आयपीएलमध्ये यावेळी एकूण 60 सामने खेळले गेले. यात सर्वाधिक धावा काढणारे पहिले तीन खेळाडू हे डावे आहे. आक्रमकता काय असते? हे या डाव्या फलंदाजांनी दाखवून दिले आहे. सर्वाधिक धावा काढणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांना विचारात घेतल्यास, यामध्येही चार खेळाडू हे डावे आहेत.

डावा डेव्हिड...

यंदा आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक धावा काढल्या. मूळचा हा कांगारु. सध्या तो सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार आहे. यंदाच्या हंगामात तो एक सेनापती म्हणून सलामीला आला आणि सेनापतीप्रमाणे लढला. त्याने एकूण 14 सामने खेळले. यामध्ये एकूण 641 धावा केल्या. यात 1 शतक आणि 4 अर्धशतकाचा समावेश आहे. एका सामन्यात सर्वाधिक 126 धावा काढण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. असा हा डावा डेव्हिड..

डावा गंभीर - गौतम गंभीर हा शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली केकेआर यंदा आयपीएलमध्ये बाजी मारेल, असे चित्र सुरुवातीला निर्माण झाले होते. मात्र तसे झाले नाही. तरीदेखील यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये गंभीरने दुसरे स्थान पटकावले. गौतम गंभीरने एकूण 16 सामने खेळले. त्यात त्याने एकूण 498 धावा काढल्या. 76 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे.

डावा धवन - एकीकडे डेव्हिड वॉर्नर तडाखेबंद फलंदाजी करत असताना त्याला शिखर धवनने साथ दिली. दोघेही सनरायजर्स हैदराबादसाठी सलामीला यायचे. दबंग डावखुऱ्या शिखर धवनने एकूण 14 सामने खेळले. त्यात त्याने 479 धावा केल्या. 77 ही धवनची सर्वाधिक धावसंख्या आहे.

याशिवाय डावा सुरेश रैना हा यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये पाचव्या स्थानी आहे. त्याने 442 धावा केल्या. मुंबईचा डावा पार्थिव पटेलही 395 धावांपर्यंत पोहोचला.

एकीकडे अशा दिग्गज डाव्या फलंदाजांकडून आक्रमक खेळाचे प्रदर्शन होत असताना गोलंदाजही मागे नव्हते. विशेष म्हणजे सुनिल नरेन हा कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज सलामीला येऊन फलंदाजी करून गेला. त्यातही सुनिल हा डावखुरा फलंदाज आहे. त्याने अनेकवेळा केकेआरच्या झोळीत सामना टाकला. सुनिलने एकूण 224 धावा काढल्या. आयपीएलमध्ये सुसाट सुटणारं डावखुरं वादळ म्हणजे ख्रिस गेल. पण यावेळी गेल नावाचं वादळ शांत होतं. त्याला एकूण 200 धावाच करता आल्या. टी-20त सहा चेंडूवर सहा षटकार खेचणाऱ्या डाव्या युवराज सिंगने सनरायजर्स हैदराबादसाठी यावेळी 252 धावा केल्या. तरूण डावखुरे फलंदाजही यावेळी मागे नव्हते. त्यांनीही तडाखेबंद फलंदाजी केली. यात डावखुऱ्या रिषभ पंतने (वय-19) दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळतांना 14 सामन्यात 366 धावा केल्या. तर गुजरात लॉयन्सकडून खेळताना इशान किशनने (वय-18) 11 सामन्यात 277 धावा केल्या.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंबई इंडियन्सला आयपीएलचा चॅम्पियन्स बनवण्यात मोलाची भूमिका पार पाडली, ती डावखुऱ्या कुणाल पांड्या आणि डावखुऱ्या मिशेल जॉन्सनने. जेव्हा मुंबईची फलंदाजी कोलमडली तेव्हा लेफ्ट हँट बॅट्समन कुणाल पांड्याने 47 धावांची खेळी केली. त्यामुळेच मुंबईला 129 धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटी पुण्याला शेवटच्या षटकांत 11 धावा हव्या होत्या. यावेळी चेंडू डावखुऱ्या मिशेल जॉन्सनच्या हाती होता. त्यानं भेदक गोलंदाजी करत पुण्याचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न मोडले अन् मुंबई तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले.

आयपीएलच्या फायनलमध्ये 47 धावांची खेळी करणाऱ्या कुणाल पांड्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. एक प्रकारे आयपीएलमध्ये बाहुबली ठरलेल्या संपूर्ण डावखुऱ्या फलंदाजांचाच हा गौरव होता.

एम. एस...!

Updated : 22 May 2017 12:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top