Ground Report : भाकरी करायला शिकवणाऱ्या कुलाळवाडीतील चटके देणारे वास्तव !
विद्यार्थ्यांना भाकरी शिकवणारी शाळा संपूर्ण राज्यात व्हायरल झाली आहे. सांगली जिल्ह्यातील कुलाळवाडी गावातील विद्यार्थी भाकरी बनवत असल्याने त्यांचे कौतुक होते आहे. पण या दृश्यांमागील वास्तव सरकारच्या धोरण अभावाची साक्ष देणारे आहे...आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा EXCLUSIVE ग्राऊंड रिपोर्ट....
X
भाकरी बनवायला शिकवणारी शाळा सध्या राज्यात चर्चेत आहे. सांगली जिल्ह्यातील कुलाळवाडी गावातील मुलांची भाकरी बनवण्याची स्पर्धाही गाजली...पण या मुलांना भाकरी का कराव्या लागतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी तिथे जाऊन घेतला आणि एक वास्तव समोर आले.
कुलाळवाडी हे 1 हजार 594 लोकसंख्येचे गाव. जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावातील बहुतांश लोक ऊस पट्ट्यात ऊस तोडीसाठी स्थलांतरित होत असतात. कुटुंब स्थलांतरित झाल्यावर त्यांच्यासोबत त्यांची शाळा शिकणारी मुले देखील उसाच्या फडात फिरत असायची. या दरम्यान जिल्हा परिषद शाळेत मुलांची संख्या कमी व्हायची. या मुलांच्या शिक्षणाचा मोठ्ठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांचा हाच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न शाळेतील शिक्षक भक्तराज गर्जे यांनी केला. मग मुलांची भाकरी कोण करणार या पालकांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर शोधून काढले.
भाकरीच्या स्पर्धांमुळे शाळेतील किमान २०० विद्यार्थी प्रत्यक्ष भाकरी करतात. भाकरी बरोबरच भात भाज्या बनवायला देखील हे विद्यार्थी शिकलेले आहेत. विशेष म्हणजे भाकरी करायला शिकल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांचे पालकांसोबत होणारे स्थलांतर आता पूर्णपणे थांबले आहे. कारण त्यांच्या भाकरीचा प्रश्न आज या शाळेनेच सोडवला आहे. काशिनाथ लोखंडे आणि काजल लोखंडे या भावंडांची आई या जगात नाहीये. वडील ऊसतोड मजुरी करतात. त्यामुळे ही दोन्ही भावंडेच स्वयंपाक करतात. आई वडील ऊस तोडीला गेल्यावर बाजारहाट तसेच स्वयंपाकही मुलेच करतात.
शिक्षण थांबू नये यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व ही मुलं करत आहेत हे त्यांचे कौतुकच आहे... पण ऊसतोड कामगारांची होरपळ गेल्या अनेक वर्षात थांबलेली नाही हे वास्तव देखील यामुळे अधोरेखित होते. ऊसतोड कामगारांची मुलं गावातच थांबली आणि शिकली तर ते ऊसतोडीच्या चक्रातून बाहेर पडतील, पण या मुलांसाठी योजना नसल्याने त्यांनाच स्वयंपाक करुन घ्यावा लागणे, घर सांभाळणे, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने त्यांचे लवकर लग्न लावून देणे यासारख्या वास्तव यामागे झाकोळले जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे.