Home > मॅक्स रिपोर्ट > महिला आयोगाच्या विधीज्ञ समितीवर अॅड. वर्षा देशपांडे

महिला आयोगाच्या विधीज्ञ समितीवर अॅड. वर्षा देशपांडे

महिला आयोगाच्या विधीज्ञ समितीवर अॅड. वर्षा देशपांडे
X

राष्ट्रीय महिला आयोगाने वरिष्ठ विधीज्ञ म्हणून विधीज्ञ समितीवर वर्षा देशपांडे यांची नियुक्ती केली आहे. वर्षा देशपांडे या महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाशी संलग्न असलेल्या सातारा येथील मोफत कायदेविषयक सल्ला केंद्राच्या संचालिका आहेत. वकीलांच्या पॅनलमधील सदस्य म्हणून त्या राज्यातील महिलाविषयक प्रकरणांचे कामकाज पाहणार आहेत. गेल्या २५ वर्षांतील मोफत सल्ला केंद्रातील कामकाजाचा अनुभव आणि मुली वाचवण्याच्या कार्यातील योगदान विचारात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.

अॅड.वर्षा देशपांडे यांचे कार्य

वर्षा देशपांडे यांचे गेल्या २० ते २५ वर्षात महिलाविषयक कायद्यांच्या अंमलबजावणीत मोठे योगदान राहिले आहे. महिलांना त्यांच्याविषयक असलेल्या कायद्यांची माहिती व्हावी, तसंच या कायद्यांचे महिलांना प्रशिक्षण मिळावे यासाठी त्या सतत प्रयत्नशिल असतात. महिलांच्या सुरक्षिततेसाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांची महिलांना माहिती व्हावी आणि त्यांना कायद्याचे संरक्षण मिळावे, या हेतूने मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र त्या सातारा येथे चालवतात. पीसीपीडीएनटी कायद्यांतर्गत मुली वाचवण्यासाठी केवळ स्टिंग ऑपरेशन करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यासाठी विशिष्ट कार्यपद्धती तयार करून न्यायदान होईपर्यंत प्रत्येक प्रकरणाचा पाठपुरावा केला. या कायद्यांतर्गत सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेपक म्हणून जाऊन न्यायालयाला मदत करण्याचे कामही त्यांनी केले.

पीसीपीडीएनटी कायद्याच्या प्रशिक्षणासाठी ओलांडल्या राज्याच्या सीमा...

भोपाळच्या ज्युडिशियल अकादमीत न्यायाधीशांना गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचे (पीसीपीडीएनटी) प्रशिक्षण देण्यात त्यांचा सहभाग होता. याशिवाय, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, राजस्थान, ओडिशा, गुजरात, बिहार, झारखंड या राज्यांत न्यायाधीशांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमांतूनही त्यांनी सहभाग घेतला. कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याचे प्रशिक्षण संरक्षण अधिकाऱ्यांना देण्यात अॅड. देशपांडे यांचा सहभाग होता.

पीसीपीडीएनटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुस्तकाचे लेखन

महिलांविषयक कायदे महिलांना त्यांच्या भाषेत समजावे म्हणून वर्षा देशपांडे यांनी पीसीपीडीएनटी कायद्याची स्टॅण्डर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर (एसओपी) म्हणजेच आदर्श कार्यप्रणाली या विषयावरील पुस्तक संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या सहकार्याने मराठीत लिहिले. या पुस्तकाला राज्यातील महिलांना मोठा फायदा झाला. महिलांना राज्यभरात प्रशिक्षण व संदर्भासाठी हे पुस्तक मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले. या पुस्तकाची उपयुक्तता लक्षात घेता आरोग्य विभागाने ते इंग्रजीत भाषांतरित करून देशभर वितरित केले. त्याचबरोबर प्रशिक्षण साहित्य निर्मितीतही त्यांचे योगदान आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने वरिष्ठ विधीज्ञ म्हणून विधीज्ञ समितीवर अॅड. वर्षा देशपांडे यांची निवड करण्यात आल्यानंतर विधी व अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Updated : 16 Jan 2019 10:49 AM IST
Next Story
Share it
Top