Ground Report : बुलडाण्यातील महिला बचतगटांची परदेशी बाजारपेठेत छाप
महिलांच्या सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केला जातो. याचाच लाभ घेत बुलडाणा जिल्ह्यातील महिलांनी एकतत्रीत येऊन बचतगट स्थापन केला, बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून त्यातून आपली आर्थिक उन्नती साधली आहे... आज ह्या महिला बचतगटांनी परदेशी बाजारपेठेतही आपली छाप उमटवली आहे, आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांचा ग्राउंड रिपोर्ट
X
महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो आणि समाजात जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम देखील राबवले जातात. महिला सक्षमीकरणाच्या कार्यात सगळ्यात महत्त्वाचे असते ते महिलांचे आर्थिक सक्षमीकरण...कारण महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर समाजात त्यांचा मान वाढतो, कुटुंबात त्यांच्या शब्दाला किंमत वाढते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वत:च्या पाय़ावर उभे राहून कमावणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि या आत्मविश्वासाच्या जोरावर महिला स्वत:चे स्थान निर्माण करु शकतात. शहरी भागात महिलांना रोजगाराचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. पण ग्रामीण भागात मात्र रोजगाराचे जास्त पर्याय उपलब्ध नसल्याने महिलांना जास्त संधी मिळत नाही. त्यासाठी बचतगटांच्या माध्यमांतून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्य़ाचा प्रयत्न शासन पातळीवरुन मोठ्या प्रमाणात केला जातो.
याचाच फायदा घेऊन बुलडाणा जिल्ह्यातील महिलांनी एकतत्रीत येऊन बचत गट स्थापन केला, बचतगटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून त्यातून आपली आर्थिक उन्नती साधली आहे. सध्या सह्या महिला महाराष्ट्रासह विविध राज्यात देखील आपला व्यवसाय पोहोचवत आहेत. एवढेच नाही तर परदेशातील बाजारपेठेतही त्यांच्या उत्पादनांना मागणी आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भाग म्हणून ओळख असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील महिलांनी एकत्र येत एक आदर्श निर्माण केला आहे. दुर्गम भागातील खेड्यात राहणाऱ्या या महिला जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ शकत नव्हत्या, त्या आता विमानाने विविध राज्यात प्रवास करत आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी व मध्यप्रदेश सीमेजवळ असलेलं दुर्गम सूनगाव.. गाव तसं छोटं आहे, पण गावातील महिला मोठ्या कर्तबगार आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या गावात आज जवळपास 122 बचतगट कार्यरत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व बचतगट फक्त महिला चालवत आहेत. यातील रमाई बचतगटाच्या महिलांनी आपला बचतगट 2003 साली स्थापन केला. सुरुवातीला 10 महिलांनी एकत्र येत दुग्ध व्यवसाय सुरू केला. पण त्यात अपेक्षेप्रमाणे यश न आले नाही. पण खचून न जाता त्यांनी सुरुवात केला तो वन औषधी उत्पादन करण्याचा... आणि आज 18 वर्षात त्यांनी देशातीलच नाही तर परदेशातील सुद्धा वन औषधी बाजारपेठ काबीज केलीये.
एकजुटीचे बळ या महिलांना समजल्यावर या महिलांनी गावातीलच एका शेतकऱ्याची एक एकर जमीन लीज वर घेतली... त्यात वनौषधी म्हणजे सफेद मुसळी , पिपळी अशा वनऔषधी वनस्पतीची लागवड केली...सफेद मुसळीला बाजारपेठेत चांगला भाव असल्याने त्यांनी सफेद मुसळीचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली... तब्बल 3 हजार रुपये किलो चा भाव मिळाल्यावर या महिलांनी बचतगटाच्या मार्फत जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने अनेक राज्यात विक्री सुरू केली आणि सुरुवात झाली या बचतगटाच्या उन्नतीची...
रमाई स्वयंसहायता महिला बचतगटाच्या अध्यक्ष ताईबाई हिवराळे सांगतात की, "आम्ही दहा महिलांनी एकत्र येऊन 2003 साली बचतगट स्थापन केला. सुरुवातीला आमच्या बचतगटाला म्हशीचे अनुदान मिळाले. मात्र ते उत्पन्नाच्या तुलनेत परवडत नसल्याने त्या म्हशी आम्ही विकल्या आणि मुसळी शेतीला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही शेतीमध्ये मुसळीची लागवड करून त्याची पावडर तयार करून ती विकायला सुरुवात केली. आज रोजी त्याची विक्री पंजाब, गोवा, दिल्ली, भोपाळ, कोलकाता, हावडा यासह विविध राज्यातील मोठ्या शहरांमध्ये केली जात आहे. सोबतच महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात देखील जाऊन महिला सफेद मुसळीची विक्री करतात. कृषी प्रदर्शनांमध्ये आपला सहभाग नोंदवतात. 2003 पासून आम्ही बचतगटांमधील एकही महिला नवीन घेतलेली किंवा बदललेले नाही. मुसळी शेतीच्या माध्यमातून सर्व महिलांना चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळत आहे." असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर गेल्या दहा वर्षापासून 1 एकर शेतीमध्ये आम्ही मुसळीचे उत्पन्न घेत आहोत. मुसळीचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध फायदे असल्याने लोकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळत असल्याचे ताईबाई हिवराळे सांगतात.
"गेल्या दहा वर्षापासून आमच्या बचतगटाच्या संपूर्ण दहा महिला एक एकर शेतामध्ये मुसळीची लागवड करतात आणि यासाठी जवळजवळ पन्नास हजार रुपये खर्च येतो. त्यापासून दीड लाख रुपयांच्या आसपास आम्हाला उत्पन्न होते. म्हणजे खर्च वजा करता एक लाख रुपयाच्या जवळपास निव्वळ उत्पन्न हे दहा महिलांना मिळते. त्यामुळे आम्ही सर्व महिला उत्साहाने या मुसळीवर प्रक्रिया करून त्याची पावडर तयार करतो आणि सर्व महिला गावोगावी जाऊन त्याची विक्री करतात. राज्यातील विविध जिल्हे आणि परराज्यात देखील कुरिअर पार्सलद्वारे मुसळी पावडर मागणी प्रमाणे पाठवत असल्याचे बचतगटाच्या सचिव रंजना वानखडे सांगतात.
बचतगटाच्या महिला सांगतात की, त्यांच्या वनौषधीला केरळ, पश्चिम बंगाल , दिल्ली , हरियाणा , पंजाब राज्यातून मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने अनेकदा या अल्पशिक्षित महिला आपली औषधी पोहचविण्याचे काम विमानाने प्रवास करून पूर्ण करतात. अनेकदा लघु व्यवसाय मेळावा असल्यास विविध राज्यात त्यांच्या औषधीचे स्टॉल लावतात... त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडून आज या महिला चांगला नफा कमावत आहेत.
या बचतगटाच्या माध्यमातून या महिला सन्मानाचे जीवन जगत आहेत. आपल्या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील त्या चांगल्या पद्धतीने करत आहेत. इतर महिलांनी देखील बचत गटाच्या माध्यमातून उन्नती साधावी असे आवाहन देखील या महिला करत आहेत. महिलांचा आत्मविश्वास वाढला की त्या कुठपर्यंत मजल मारु शकतात याचा आदर्श यामुळे निर्माण झाला आहे. म्हणूनच महिला सक्षमीकरणाच्या या बचतगट पॅटर्नमध्ये राज्यातील उर्वरित भागातील महिलांनीही पुढाकार घेऊन सक्षमपणे उभे राहण्याची गरज आहे.