Special Report : "आम्हाला सरकारने धुरातच कोंडले", उज्ज्वला योजनेच्या प्रतिक्षेत अनेक महिला
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुरमुक्त भारताची घोषणा केली आणि उज्वला गॅस योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आल्याचे आकडे अनेकदा वाढू लागले. पण या योजनेपासून अनेक महिला आजही वंचित आहेत. सांगली जिल्ह्यातील वांगी या गावातील महिलांनी गॅस मिळावा यासाठी अनेकदा गॅस एजन्सीकडे खेटे घातले. पण त्यांना अद्याप गॅस कनेक्शन मिळालेले नाही. पाहा आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा स्पेशल रिपोर्ट...
"घरात आम्ही दोघच म्हातारी माणसं हाय. आमाला गॅस मिळाला नाय. या वयात नद्या वड्या वगळीने जळान गोळा करायला लागतं. डोस्कीवरून जळणाचा भारा न्यावा लागतो. तीन वरस झाली. गॅस मिळावा म्हणून चीचणीला चालत हेलपाट घातलं पण आजुन गॅस मिळाला नाय".
सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यात असणाऱ्या वांगी या गावातील वयाची सत्तरी पार केलेल्या इंदुताई लांडगे यांची हि केविलवाणी प्रतिक्रिया आहे. उज्वला योजनेच्या पहिल्या यादीत नाव येऊनही त्यांना अद्याप गॅस कनेक्शन मिळालेले नाही. या वयातही त्यांना सरपन गोळा करण्यासाठी रानावनात हिंडावे लागते. गॅस मिळावा म्हणून गॅस एजन्सी मध्ये त्या सातत्याने हेलपाटे घालत आहेत. पण तांत्रिक कारणे देत त्यांना केवळ पुढच्या तारखा दिल्या जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या थाटामाटात उज्वला योजनेद्वारे धूरमुक्त भारत करण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबापर्यंत गॅस पोहोचविण्याचे आश्वासन दिले गेले. या योजनेच्या यशस्वीतेचे आकडे अनेकदा माध्यमात प्रसिद्ध झाले. पण सर्व घटकांपर्यंत हि योजना पोहोचलीच नसल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.
उज्वला गॅस योजना आल्यानंतर
सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यात असणाऱ्या वांगी या गावातील दिपाली गुजले, सविता जानकर, इंदुबाई लांडगे, वंदना घोरपडे यासह इतर दहा स्त्रियांना देखील आपल्या घरात चुली ऐवजी गॅस येऊन आपले जगणे धुरमुक्त होईल. सरपन गोळा करण्यासाठी आपल्याला आता कुठेही अनवाणी पायाने हिंडावे लागणार नाही. जगणे सुसह्य होईल अशी आशा निर्माण झाली होती. पण त्यांची हि आशा नदी आणि ओढ्यातून डोक्यावरून वाहून आणलेल्या सरपनाबरोबरच चुलीत जळून खाक झाली. योजना आल्यानंतरही या महिलांच्या आयुष्यात फरक पडलेला नाही. त्यांना पूर्वीप्रमाणेच सरपन गोळा करण्यासाठी रानावनात भटकावे लागते. सरपणाचा भारा डोक्यावरून वाहून आणावा लागतो.
ताई बोडरे सांगतात " आम्ही चिंचणीमध्ये अर्ज केला. तीन वर्षे झाले हेलपाटे घालतोय. पण आमची कुणीही दाद घेत नाही. त्यामुळे आम्ही चुलीवरच स्वयंपाक करतोय. उन्हा तान्हात आम्ही जळणाला जातो. पावसाळ्यात चुली पेटत नाहीत.चुलीत फुकून फुकून जीव नकोसा होतो. पण आमची दाद कुणी घेत नाय."
वंदना घोरपडे यांचे देखील योजनेच्या पहिल्याच यादीत नाव आले होते. पण आजही त्यांना गॅस मिळालेला नाही.
त्या सांगतात " यादीत नाव आल्यावर आम्ही फॉर्म भरला. आता गॅस येईल मग येईल वाट पाहिली. गॅसच्या हाफिसात हेलपाटे घातले. पण अजून गॅस मिळाला नाही. उद्या येईल पुढच्या आठवड्यात येईल पुढच्या महिन्यात येईल अस तिथले सायेब सांगतात".
या महिलांचे उज्वला योजनेच्या यादीत नाव आले. फॉर्म भरला पण कागदी घोड्यात आणि तांत्रिक कारणे देत त्यांना अद्यापपर्यंत गॅस मिळाला नाही. गॅस तर मिळालाच नाही. उलट तुम्ही दोन्ही ठिकाणी अर्ज केलेले आहेत तुम्ही सरकारची फसवणूक करत आहात असा दम त्यांना एजंसीमधून मिळत असल्याचे या महिला मॅक्स महाराष्ट्र सोबत बोलताना सांगतात. ज्या महिलांना गॅस च मिळाला नाही त्या सरकारची कशी फसवणूक करतील? आजही त्यांच्या घरात चूल पेटते. सरपणासाठी त्यांना ओढ्या ओगळीत हिंडावे लागते.
सिंधुताई गुजले सांगतात " चार वर्षे झालं फॉर्म भरलाय. सरकारनं दुनियेचा धूर मुक्त केला आसल पण आम्हाला धुराताच कोंडलय. ज्यांच्या घरात गॅस आहेत त्यांना डबल गॅस मिळाले. पण चुलीवर स्वयंपाक करत असणाऱ्यांना गॅस मिळाला नाही. मग आमचे गॅस गेले कुठ ? " असा सवाल त्या उपस्थित करतात.
गॅस मिळावा म्हणून ग्रामीण भागातील या महिलांनी चिंचणी येथील सोनाहिरा गॅस एजन्सी चिंचणी मध्ये अनेकदा पायी हेलपाटे घातले. पण त्यांना दाद मिळाली नाही.
याबाबत आम्ही या सोनाहिरा गॅस एजन्सी ची प्रतिक्रिया जाणून घेतली. येथील समीर मुलाणी यांनी या महिलांचे नाव यादीत आल्याचे खरे आहे. त्यांना अद्याप गॅस मिळालेला नाही. पण त्यांच्या प्रस्तावाला अद्याप वरून मंजुरी मिळालेली नाही. आमच्यात्यांना आमच्याच गॅस एजन्सी मध्ये गॅस मिळेल पण त्यांना अजून वाट पहावी लागेल.
इंदुबाई लांडगे यांच्यासारख्या वयाची सत्तरी पार केलेल्या वयस्कर महिलांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात गॅसची अजून किती वाट पाहायची. गॅसची वाट पाहत अजून किती काळ नदी ओढ्यामध्ये सरपणासाठी फिरायच असे विचारल्यावर ते आमच्या हातात नाही असे त्यांनी सांगितले.
याबाबत आम्ही कडेगांव तहसीलदार यांची देखील भेट घेतली. तर त्यांनी "हि योजना आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगत हि आमची जबाबदारी नसल्याचे स्टेटमेंट देत हात झटकले. पुरवठा विभागात संपर्क केला असता तेथूनही हा विषय आमच्या अंतर्गत येत नसल्याचेच उत्तर मिळाले.
महिलांच्या प्रश्नावर गॅस एजन्सी तांत्रिक कारण देते. तहसीलदार हि आपली जबाबदारी नाही म्हणून हात झटकतात. मग या महिलांच्या प्रश्नाला वाली कोण ? त्यांची समस्या सोडवणार तरी कोण ?
सरपणासाठी दररोज ओढ्या ओगळीत हिंडणाऱ्या, हातातल्या नळीने चुलीत फुंकर मारणाऱ्या गॅस मिळावा म्हणून चालत गॅस एजन्सिमध्ये हेलपाटे मारनाऱ्या या स्त्रिया याच धुरमुक्त उज्वल भारतातील आहेत. या योजनेपासून या एकाच गॅस एजन्सीमध्ये तब्बल १४० महिलांची यादी आहे. अशीच स्थिती अनेक ठिकाणी आहे.अनेक महिला या योजनेपासून वंचित आहेत. चुलमुक्त, धुरमुक्त भारताचे आश्वासन त्यांच्या घरी कधी पोहचणार ? या वंचित स्त्रियांचे घर उज्वला योजनेने कधी उज्वल होणार ? हा सरकारला खडा सवाल आहे.