Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : पोरांना शिकवायचं कसं, घर चालवायचं कसं? अतिवृष्टीग्रस्त शेतकऱी महिलांचा सवाल

Ground Report : पोरांना शिकवायचं कसं, घर चालवायचं कसं? अतिवृष्टीग्रस्त शेतकऱी महिलांचा सवाल

Ground Report : पोरांना शिकवायचं कसं, घर चालवायचं कसं? अतिवृष्टीग्रस्त शेतकऱी महिलांचा सवाल
X

बीड जिल्ह्यात पडत असलेल्या सततच्या पावसानं शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये कापूस, सोयाबीन, ह्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता अस्मानी संकटाचा सामना करावा लागतो आहे. एकीकडे सर्व शेतकरी हवालदिल झाले असताना अनेक महिला शेतकऱ्यांना तर यामुळे मोठा फटका बसला आहे. परिस्थितीशी संघर्ष करत बीड जिल्ह्यातील अनेक महिला शेतकऱ्यांनी शेतांमध्ये पेरणी केली. सुरूवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे सर्व शेतकरी समाधानी होते. पण त्यानंतर पावसाने ओढ दिली. त्यामुळे दुबार पेऱणीचे संकट आले. यानंतर पावसाचे पुनरागमन झाले. पण गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसाने उसंत न घेतल्याने आणि पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे.

महिला शेतकऱ्यांच्या अवस्था तर खूप गंभीर झाली आहे. शेतीसाठी केलेला खर्च वाया गेलाय, मदत मिळालेली नाही, मुलांच्या शिक्षणाचा खर्च अशा सर्व गोष्टींचा खर्च वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मॅक्स महाराष्ट्रने थेट बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.






सुनिता लकडे या महिला शेतकऱ्याने सांगितले की, "पावसामुळे शेती पार उध्वस्त झाली आहे. मदत कधी मिळणार हा प्रश्न आहे. अधिकारी आले पंचनामे करून गेले पण आम्हाला मदत कधी मिळणार? आमचा सर्व उदरनिर्वाह त्याच शेतावर आहे. आम्ही आता काय करावं, हा प्रश्न आमच्यापुढे आला आहे. त्याच बरोबर जर हे पीक उपटून आम्हाला दुसरे पीक लावायचे असेल तर त्यासाठी सुद्धा खर्च लागणार आहे. शासन आम्हाला नुकसान भरपाई किती देते, त्यावर पुढचं सारं गणित अवलंबून आहे. पण ती भरपाई कधी मिळणार? आता आमच्या पुढे लहान मुलांच्या शिक्षणाचा खर्च, त्याचबरोबर घरासाठी लागणारा किराणा कसा करायचा हा प्रश्न आहे. त्यात शेतीसाठी आतापर्यंत 40 ते 45 हजार रुपये खर्च केले आहेत, पण यामधून आम्हाला एकाही रुपयाचे उत्पन्न मिळालेले नाही.

तर कडूबाई धनगर सांगतात, "खत आनलं, बी आनलं, बी बियाणाला खर्च झाला, खताबियाला किती खर्च होतोय, पाळ्यात खुरपनंय, आमचं कष्ट तर गेलंच गेलं पण आता या पावसानं रोजचं लावून धरलयं. महिना झालं पाऊसयं आजुक पण येतच राहतोय आम्ही करायचं काय... त्याला बघुन गेलेत, देतेत का नाही त्याचं काय सांगावं, आता मागची नुकसान तर झालीच झाली, पण पुढे पेरायचं कुठून? पैसा आणायचा कुठून? आम्हाला लहान लहान मुलं आहेत, पैसा कुठून आणायचा आम्ही, आता काही देतेत का नाहीत त्याचं काय सागता येतं, पाऊस तर येतंच राहतोय, पुढचं पिक येतंय का नाही त्याचं काही सांगता येत नाही, आमची साडे तीन एकर जमीन आहे. साऱ्या शेतात आसंच पाणी हाय, काय करायचं आम्ही आता?"




"शेताची नांगरट पाळी, कापसाची एक एक पिशवी 1 हजार रूपयांची आणलेली, पाच एकर मधी दहा बारा पिशव्या लागत्यात. त्यासाठी दहा-पंधरा क्विंटल खतं घातलयं व पाळ्या फवारण्या ही सगळं आम्हाला लाख रूपापर्यंत खर्च झाला आहे. इथं पाहिलं तर पाच हजार सुद्धा निघायचे नाहीत. घर दार माझ्या लेकायचं वाहुन गेलयं, राहिलच नाही काही, आमचं किती नुकसान झालं आहे." अशी व्यथा बुधनर भास्कर दादाराव यांनी मांडली.

गेल्या जवळपास महिन्यापासून सतत पाऊस सुरू आहे. शेतांमधील पिकं पाण्यात गेली आहेत. अनेक ठिकाणा पाणीच पाणी झालेलं आहे. कापूस आणि सोयाबीनच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. "आमचा शेतात खूप खर्च झालेला आहे, बियाणाचा खर्च, खताचा खर्च, खुरपणी आहे, फवारणी आहे याचा खर्च, कापसाचं वाटुळं झालयं, पुढचं पिक जरी उभा करायचं म्हटले तरी आमच्याकडे काही प्राप्ती नाही, कुठला धंदा नाही, कुठली नौकरी नाही, समजा घर खर्च भागवायचा तर कसं करायचं, सगळ्या गोष्टी करायच्या आणि दुसरं पिक कसं उभं राहायचं, कसं मुलांच्या शिक्षणाचा खर्च करायचा, लोक सांगतात पंचनामे केले, तलाठी आले, आमुक आले, धमुक आले, सगळ्यांनी पंचनामे करून दिले, आश्वासनं दिले पण सरकारनी आमच्याकडे पाहिलं पाहिजे, आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारनं आम्हाला 50 ते 60 हजार रूपये हेक्टरी नुकसान भरपाई दिली पाहिजे, नुकसान भरपाई दिली तर खरीपाचं पिक हातातुन गेलंय पण दुसरं पिक उभारण्यासाठी त्याचा फायदा होईल, सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं सांगतो, आमच्या सर्कलमधील सर्व पिकांचे नुकसान झाले आहे, याते पंचनामे पाचबार झालेत पण सरकारनं यांची मदत दिली पाहिजे" अशा तीव्र भावना एका शेतकऱ्याने व्यक्त केल्या आहेत.



बीड जिल्ह्यात पावसाने बाधित झालेल्या क्षेञाची टक्केवारी 76.76 टक्के एवढी आहे. बीड जिल्ह्यात एकूण 7 लाख 37 हजार 225 शेतकऱ्यांची संख्या आहे. त्यापैकी एकूण बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 5 लाख 19 हजार 425 असून एकूण क्षेत्राची संख्या 5 लाख 96हजार 159 हेक्टर आहे. यात जिल्ह्यातील एकूण नुकसान 39 लाख 8 हजार 713 हेक्टरवर झाले आहे. सरकारी आकडेवारीनुसार गेवराई तालुक्यात पंचनाम्यांचे काम सर्वात कमी म्हणजे जवळपास ६४ टक्के झाले आहे. तर जिल्ह्यातील एकूण ११ तालुक्यांमध्ये पंचनाम्यांचे काम ७६.७६ टक्के झाले आहे.





याचाच अर्थ महिना उलटून गेली तरी पंचनाम्यांचे काम झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार असा प्रश्न आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या या शेतकऱ्यांना सरकार मदत कधी देणार हा प्रश्न आहे. गणपती तर झाले आता दिवाळी जवळ आली आहे. पण या संकटाने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आहे. संकटाशी लढत, परिस्थितीची सामना करत महिला शेतकऱ्यांनी काही स्वप्न उराशी बाळगून पेरणी केली, पण आता हाती काहीच येणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळण्याची गरज आहे,.

Updated : 23 Sept 2021 7:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top