Ground Report : महाप्रलयातून 200 लोकांना वाचवणारे वाईल्ड वॉटर अडव्हेंचर पथक
रायगड जिल्ह्यात अनेक रस्तेच बंद झाल्याने बचाव पथकांना लोकांना वाचवण्यासाठी पुढे जात येत नव्हेत. त्या काळात महाड तालुक्यात तब्बल २०० लोकांना एका स्थानिक पथकाने वाचवण्याची कामगिरी केली आहे. हे बचावकार्य कसे झाले आणि त्यावेळची परिस्थिती याची माहिती देणारा आमचे करस्पाँडन्ट धम्मशील सावंत यांचा Ground Report
X
रायगड : जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातल्यानंतर सावित्री नदीने रौद्ररुप धारण केले. त्यात सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड शहराला महापूराचा सर्वाधिक फटका बसला. सलग ४८ तास शहरात पूरस्थिती होती. या महापूरात अडकलेल्या शेकडो लोकांना वाचवण्यासाठी NDRF तसेच इतर सरकारी मदत पोहोचेपर्यंत कोलाड येथील वाईल्ड वॉटर अँडवेंचरचे पथक जीवावर उदार होऊन पाण्यात उतरले आणि त्यांनी तब्बल २०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. कोलाड येथील वाईल्ड वॉटर अँडवेंचरचे महेश सानप आणि त्यांच्या पथकाने मोठ्या धाडसाने या लोकांना वाचवले आहे, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाड शहर आणि आसपासच्या परीसरात अभुतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक भागात १२ ते १३ फूट पाणी होते. अनेक घरे पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. आपला जीव धोक्यात घालून त्यांनी महापूरात अनेकांचे जीव वाचविले. एनडीआऱएफ आणि इतर बचाव पथके दाखल होण्यापुर्वी महेश आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महापूरात अडकलेल्या अनेक लोकांना सुरक्षित बाहेर काढले, या पथकांच्या सतर्कतेमुळे महाड शहरातील अनेकांचे जीव वाचले. या कर्तृत्वान कामगिरीचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
महाड शहर आणि महाडकर यांना पूर नवीन नाही. दरवर्षी शहराला दोन ते तीन वेळा पूरस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे ही पूरस्थिती दोन ते तीन तासांनी ओसरेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र तसे झाले नाही. बुधवारी रात्री शहरात पूराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. गुरवारी दुपारनंतर पूराचे पाणी झपाट्याने वाढत गेले. बघता बघता महाड शहराला पूराचा वेढा पडला. आसपासचे रस्तेही पाण्याखाली गेले. शहरात शिरण्याचे आणि बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले. संपर्क यंत्रणा कोलमडल्या, वीज पुरवठा खंडीत झाला. गुरुवारी संध्याकाळनंतर पूरपरिस्थिती अधिकच बिघडत गेली. घरात अडकलेल्या लोकांना छतावर कौलावर चढून बसण्याची वेळ आली. मदतीचे सर्व मार्ग एव्हाना बंद झाले होते. एनडीआरएफचे पथक मुंबई गोवा महामार्गावर पाणी असल्याने अडकून पडले होते. अशा परीस्थितीत कोलाडच्या महेश सानप आणि त्यांच्यां पथकाने मदत व बचाव कार्याची जबाबदारी संभाळली.
शहरात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या अनेक लोकांना त्यांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी जमेल तसा संपर्क करून ते स्वतः अडकलेल्या लोकांची माहीती घेत होते. त्यानंतर तिथे जाऊन अडकलेल्या लोकांना बाहेर काढत होते. रिव्हर रार्फ्टींगचे कौशल्य पणाला लाऊन त्यांनी या सर्वांची सुटका केली. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले. स्वतःचे जीव धोक्यात घालून मुसळधार पावसात त्यांनी सलग ३६ तास बचाव कार्य सुरु ठेवले.