विकास जात बघून केला जातो का? डोंबारी समाजाचा संतप्त सवाल
शहराचा विकास देखील जात बघून केला जातो का? एखाद्या शहरामध्ये गावांमध्ये भटक्या मागास समाजाच्या वस्तीचा विकास का रखडला जातो. आजूबाजूच्या सर्व गल्ल्यांमध्ये, वेगवेगळ्या नगरांमध्ये विकासाची गंगा पोहोचते मात्र, भटक्या, मागास समाजाच्या वस्तीपर्यंत विकास का पोहोचत नाही. वाचा मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट
X
सोलापूर: एकीकडे देशाची वाटचाल महासत्तेकडे सुरू आहे असे सांगितले जात असताना या देशात अनेक जाती-जमाती अशा आहेत की, अद्यापपर्यंत विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहचलीच नाही. अशा या जाती-जमाती विकासापासून कोसो दूर आहेत. आज २१ व्या शतकात ही त्यांना अन्न, वस्त्र, निवारा यासाठी संघर्ष तर करावा लागतच आहे. पण समाजामध्ये राहत असताना त्यांना वीज, पाणी, गटार, रस्ते या प्राथमिक सुविधांसाठी सुध्दा संघर्ष करावा लागत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राहणाऱ्या डोंबारी समाजाची अशी अवस्था आहे. या वस्तीमध्ये वीज, पाणी, गटार, रस्ते, सार्वजनिक शौचालय यांचा अभाव असल्याने तेथे राहणाऱ्या रहिवाशांनी विकास फक्त जात बघून केला जातो का? आम्ही काय माणसे नाहीत का? आम्ही या देशाचे नागरिक नाहीत का? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. शासन, प्रशासनाने आमच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना केला आहे.
गेल्या ३५ वर्षांपासून राहतात मोहोळच्या दत्त नगर भागात..
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ हे तालुक्याचे ठिकाण असून या शहराच्या मध्यभागी दत्त नगर असून या भागात डोंबारी समाजाची ५० ते ६० कुटुंबे वास्तव्यास आहेत .त्यांची लोकसंख्या सुमारे २५० ते ३०० च्या आसपास आहे. या ठिकाणी ते गेल्या ३० ते ३५ वर्षापासून राहत आहेत. त्यांना जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना त्यांच्या घरांच्या अवतीभवती असणाऱ्या घाण पाण्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आमचे प्रश्न सोडवताना शासन, प्रशासन आम्हाला दुजाभावाची वागणूक देत असल्याची डोंबारी समाजाची भावना आहे.
डोंबारी समाजाकडे स्वतःची स्थावर मालमत्ता नाही
डोंबारी समाज सतत भटकंती करणारा असल्याने त्यांच्याकडे स्वतःची स्थावर मालमत्ता नाही. हा समाज एका गावावरून दुसऱ्या गावात जाऊन कला सादर करून उदरनिर्वाह करीत असतो. यामध्ये तारेवरची कसरत करणे, उड्या मारणे लोकांचे मनोरंजन करणे असे खेळ केले जात असत. बहुतांश वेळा हे खेळ गर्दीच्या ठिकाणी होत. परंतु सध्या मनोरंजनाची साधने वाढल्याने डोंबऱ्यांची कला लोप पावत चालली आहे. त्यामुळे या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.
या वस्तीच्या आजूबाजूच्या भागांचा झाला विकास...
डोंबारी वस्तीच्या आजूबाजूला क्रांती नगर, गुलशन नगर, सोमराय नगर हा भाग आहे. ही वस्ती सोमराय नगर आणि दत्त नगर या भागात आहे. या वस्तीच्या कडेने असलेल्या भागात पाणी, गटार, रस्ते यांच्या सुविधा दिल्या गेल्या आहेत असे नागरिकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे या डोंबारी समाजाच्या वस्तीतील रस्ता, गटार, पाणी, वीज, सार्वजनिक शौचालय या समस्या अद्याप ही सुटलेल्या नाहीत. या वस्तीतील समस्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत.
आरोग्याचा प्रश्न झाला गंभीर
या वस्तीत पत्र्याची घरे असून पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार नसल्याने या भागात पाणी साचत असून शेजारच्या नगरातील पाणी घरात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे लहान मुले आजारी पडू लागली आहेत. या घरांच्या आजूबाजूला घाण पाणी साचले असल्याने डासांची संख्या वाढली आहे. हाताला कामधंदा नसल्याने या मुलांना दवाखाना करायचा कसा असा प्रश्न उपस्थित करून शासन, प्रशासनाने आम्हाला प्राथमिक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
घाण पाण्यात डुकरांचा वाढता वावर
या वस्तीच्या जवळ घाण पाण्याची डबकी साचली असून त्याची दुर्गंधी सुटली आहे. वस्तीतील घरांच्या आजूबाजूला घाण पाणी साचले आहे. या पाण्यात डुकरे सतत लोळत असून घरातील खाण्या-पिण्याच्या वस्तू घेऊन जात आहेत. या वस्तीत जाण्यासाठी घाण पाण्यातून मार्ग काढत जावे लागते. पावसाळ्यात आमची अवस्था वाईट झाली असून प्रशासनाने आमची कैफियत समजून घ्यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्मशानभूमीत चांगल्या सुविधा, पण आम्हाला नाहीत...
डोंबारी वस्तीतील रहिवाशी सुभाष पवार यांनी सांगितले की, शासन, प्रशासन स्मशानभूमीत सुद्धा चांगल्या सुविधा देत आहे. तेथे लाईट, फरशी, पाण्याची सुविधा उपलब्ध करून देते. पण आमच्या डोंबारी वस्तीला गटार, रस्ता, पाणी याची सोय करीत नाही. आम्ही या वस्तीमध्ये आमच्या बाप-दादा पासून राहत असून तेव्हापासून या वस्तीमध्ये गटार, पाणी, रस्ता याची सोय नाही. आमचे बाप-दादा मेले आमचा जन्म संपत चाललेला आहे. परंतु अद्यापपर्यंत कोणत्याच सोयी-सुविधा पोहचल्या नाहीत. आम्ही गेल्या २ महिन्यांपूर्वी यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी या सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु त्याची अद्यापही पूर्तता झालेली नाही.
स्मशानभूमीतील पाणी आणले जाते पिण्यासाठी
ज्या स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. तेथील पाणी आम्ही पिण्यासाठी आणतो. असे शालिनी पवार या रहिवासी महिलेने सांगितले, पुढे त्या म्हणाल्या की, बऱ्याच वर्षापासून आम्ही येथे राहत असून आमचे कोणीच प्रश्न सोडवले नाहीत. आमच्या वस्तीत पाणी, गटार, रस्ते, सार्वजनिक शौचालय याचा अभाव असून घाणीत राहत आहोत. घाणीमुळे आम्ही मरायला लागलो आहोत. पावसाळ्यात आमच्या घरात रस्त्यावरचे पाणी येत असल्याने मुले आजारी पडली आहेत.
निवडून आल्यानंतर कोणताच पुढारी येत नाही वस्तीकडे...
निवडणूक लागल्यानंतर मतदान मागण्यासाठी पुढारी येतात. परंतु निवडून आल्यानंतर आमचे कोणीच प्रश्न सोडवत नाही, आम्ही कोणाला सांगावे, आमच्या समस्या कोणीच सोडवल्या नाहीत. आम्ही डोंबाऱ्यांनी असेच मरावे का? असा संतप्त सवाल करीत जीवन चव्हाण यांनी सांगितले की, घाण पाण्यामुळे लहान मुले आजारी पडू लागली आहेत. नगर परिषदेने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
लॉकडाऊन मुळे आली उपासमारीची वेळ
जीवन चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही कसा तरी प्रपंच चालवत आहोत. पूर्वी आम्ही कला सादर करून पोट भरत होतो. पूर्वीचे दिवस चांगले होते. आता दिवस वाईट आले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून लॉकडाऊन पडल्यामुळे कुठे ही हलता येत नाही. डोंबारी खेळ बंद झाला आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
भारतमाता आदिवासी पारधी समाज व भटके विमुक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले यांनी यांनी सांगितले की, गेल्या १४ वर्षांपासून भटक्या विमुक्त मुलांसाठी वसतिगृह, शाळा चालवत आहे. डोंबारी समाज हा गेल्या ३५ वर्षांपासून या ठिकाणी राहत असून या ठिकाणी, शासन, प्रशासन, नगर परिषद यांनी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत.
या ठिकाणी ५० ते ६० कुटूंबे वास्तव्यास असून यांची एकूण लोकसंख्या २०० ते २५० च्या आसपास आहे. डोंबारी समाज पोटाची खळगी भरण्यासाठी गावो-गावी खेळ करत असतो. सध्या मनोरंजनाची साधने वाढल्याने हे खेळ बंद पडले आहेत. त्यामुळे या लोकांनी उपजीविकेसाठी बँजो पार्टी सुरू केली आहे. पण तेही कोरोना मुळे बंद पडली आहे. लग्न व इतर कार्यक्रम बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
मोहोळ मधील सर्व रस्ते झाले परंतु डोंबारी वस्तीला जोडणारा रस्ता झाला नाही. या ठिकाणी गटार, पाणी याच्या सुविधा नाहीत. यासाठी नगर परिषदेला अनेकदा निवेदने ही दिले परंतु त्यांनी अद्यापपर्यंत दखल घेतली नाही.गे ल्या १० वर्षांपासून या वस्तीसाठी पाण्याची मागणी करीत आहोत तेही पूर्ण होत नाही.
रस्ता,गटार यांची सोय नसल्याने पावसाळ्यात घाण पाणी घरात जाऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. २ महिन्यांपूर्वी मोहोळ नगर परिषदे समोर धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी गटार, पाणी, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु त्याची अद्याप पर्यंत पूर्तता झालेली नाही. नगर परिषदेने लवकरात-लवकर हा प्रश्न मार्गी लावावा.
या वस्तीला भेट देऊन पाहणी करणार-मुख्याधिकारी
नूतन मुख्याधिकारी योगेश डोके म्हणाले की,आजच मी मोहोळ नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार घेतला असून लवकरच या वस्तीला भेट देऊन पाहणी करणार आहे.अधिकाऱ्याकडून माहिती घेतली असता येथे मुरमाचा रस्ता बनवला आहे.या वस्तीत रस्ता बनवण्यासाठी वरिष्ठांना प्रस्ताव पाठवण्यात आला असून येथील इतरही समस्या सोडवण्याचा लवकरच सोडवू