Home > मॅक्स रिपोर्ट > माथेरान: ई-रिक्षा सुरू करण्याची नागरिकांची मागणी, तर घोड्यावाले म्हणतात आमच्या पोटावर पाय देऊ नका

माथेरान: ई-रिक्षा सुरू करण्याची नागरिकांची मागणी, तर घोड्यावाले म्हणतात आमच्या पोटावर पाय देऊ नका

माथेरान: ई-रिक्षा सुरू करण्याची नागरिकांची मागणी, तर घोड्यावाले म्हणतात आमच्या पोटावर पाय देऊ नका
X

माथेरान, महाराष्ट्रात एकादा क्वचितच व्यक्ती असेल ज्याला माथेरान हे नाव माहित नसेल. माथेरानचा शोध १८५० मध्ये ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन कलेक्टर म्हणजेच जिल्हाधिकारी सर ह्युज पॉईंत्ज मँलेट यांनी लावला. ते चौक मार्गे वन ट्री हिल पॉइंटच्या दरीतून (नाळीतून) वर पायी चढत असताना त्यांना माथेरानचा शोध लागला. त्यानंतर १८८५ सालापासून ब्रिटिश कालीन राजवट व त्यांनी बनवलेल्या नियम व अटीनुसारच आजही माथेरानचं जन जीवन चालतं.

आजही दळणवळणाची साधने म्हणून या ठिकाणी घोडा व माणसाने माणसाला खेचणारी हात रिक्षा या साधनांचा वापर केला जातो. इंग्रज काळात बनवले गेलेले नियम व अटी आजही पाळल्या जातात.

माथेरानमध्ये आपली वाहन फक्त दस्तुरी नाक्यापर्यंतच येतात. तिथून पुढे मध्य बाजारपेठेत जाण्यासाठी घोडा व हात गाडी याच साधनांचा वापर केला जातो. म्हणजे कोणतंही साहित्य घेऊन जाण्यासाठी हातगाडीचाच वापर केला जातो. माथेरान हे इको सेन्सेटीव्ह झोन मध्ये (पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील) येत असल्याने या ठिकाणी वाहनांना बंदी आहे. त्यामुळं लोकांना जाण्यायेण्यासाठी घोड्यांचा वापर करावा लागतो. आता लोकांनी इ रिक्षाची परवानगी शासनाकडे मागितली आहे.

ई रिक्षाचा प्रवास…

माथेरान नगरपालिकेने 2012 रोजी ई रिक्षा सुरू करण्याचा एकमताने ठराव मंजूर केला. रायगड जिल्हाधिकारी, महसूल सचिव, नगरविकास सचिव, पर्यावरण सचिव यांची शिफारस घेतल्या नंतर राज्य सरकारने ई रिक्षाचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालय नवी दिल्ली यांना पाठवला. फेब्रुवारी २०१८ केंद्रीय पर्यावरण कायदेशीर सल्लागार ललित कपूर यांनी ई रिक्षासाठी सर्वोच्च न्यायालयातून परवानगी घ्यावी असे राज्य सरकार ला पत्र लिहून कळवले.





माथेरानच्या वाहतूकीच्या संदर्भात आम्ही स्थानिक लोकांशी बातचीत केली. माथेरान स्थानिक हात रिक्षा संघटनेचे माजी अध्यक्ष गणपत रांजणे यांनी माथेरान वाहतूक योजने संदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले

गेली तीस ते पस्तीस वर्ष मी हात रिक्षा ओढण्याचे काम करत आहे. हे अतिशय कष्टाचे काम आहे. माझी उपजीविका याच व्यवसायावर चालते. गेले तीस ते पस्तीस वर्ष मी या व्यवसायात आणि वाहतूक संदर्भात खूप उतार-चढाव पाहिले आहेत. माणसाला माणसाने ओढण्याची ही हात रिक्षा आता नवीन पिढी करेल असं मला वाटत नाही. म्हणून माथेरान चे आकर्षण समजणारे हात रिक्षा बंद करून आम्हाला या जीवघेण्या कामातून मुक्त करावं. आता या ठिकाणी ही रिक्षा बॅटरी वरील रिक्षा चालू करून द्यावी हीच शासनाकडे मागणी आहे. असं मत गणपत रांजणे यांनी व्यक्त केलं आहे.

श्रमिक रिक्षा संघटना सचिव सुनिल शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका जून महिन्यात याचिका दाखल केली होती त्याची सूनवाई दि 1 जुलै 2021 रोजी झाली न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. या संदर्भात आम्ही काही राजकीय प्रतिनिधींच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेतल्या...

माथेरान नगरपरिषद काँग्रेस चे नगरसेवक शिवाजी शिंदे यांच्याशी आम्ही या संदर्भात बातचीत केली. ते म्हणाले माथेरान चा शोध 1885 साली ब्रिटिशांनी लावला आणि माथेरान मध्ये जीवन जगण्याच्या नियम व अटी बनवल्या गेल्या. त्यामध्ये वाहतूक व्यवस्था म्हणून माणसाला माणसाने ओढणारे हात रिक्षा तसेच घोडा ही साधनं आजही माथेरानमध्ये वाहतुकीच्या साठी वापरली जातात.





ब्रिटिश कालीन नियम अटी आजही पाळल्या जातात. देश बदलतोय जग बदलतंय. परंतु माथेरानच्या व्यवस्थेमध्ये काहीही बदल दिसत नाही. माथेरानमध्ये आरोग्याची समस्या असो भाजीपाल्यापासून बांधकाम साहित्याची समस्या असो... ती कायम आहे. इथल्या लहान मुलांना पाच ते सहा किलोमीटर चालत जाऊन शिक्षण घ्यावे लागते. अशा अनेक समस्या आहेत.

1989 चाली माथेरान च्या स्थानिक व्यापाऱ्यांनी एक आंदोलन केले होते की, माथेरानची वाहतूक मध्यवर्ती ठिकाणी यावी. परंतु त्यावेळेच्या राजकीय अनास्थामुळे शक्य झाले नाही व हा प्रश्न फक्त कागदावरच राहिला. नंतर 2003 साली काही पर्यावरणवादी लोकांनी इको सेन्सिटिव्ह झोन लागू व्हावा. यासाठी मागणी केली व येथे 2004 साली इको सेन्सिटिव्ह झोन कायदा लागू झाला. येथील दळणवळण व वाहतुकीचा मुद्दा अजूनच गुंतागुंतीचा झाला आणि भाजीपाला जीवनावश्यक वस्तूंपासून ते कन्ट्रक्शन साहित्यांपर्यंत कोणत्याही गोष्टी माथेरानमध्ये आणायाचे असल्या तरी शासन दरबारी जाऊन मान्यता घ्यावी लागते.

या सर्व बाबींना सामान्य नागरिक काय तोंड देणार? व ट्रान्सपोर्टेशन व वाहतूक सामान्य व्यक्तीला न परवडणारी बाब आहे. म्हणून इ रिक्शा सारखे पर्यायी वाहतूक व्यवस्था माथेरानमध्ये चालू व्हावी. हा एक मार्ग आहे. यातून आम्ही पूर्ण माथेरान शहरांमध्ये वाहन फिरावे. याला आमचा विरोध आहे किंवा चार चाकी वाहन माथेरानमध्ये यावे. असे आम्ही केव्हाच म्हणणार नाही. परंतू इ रिक्शा सारखे माध्यम यासाठी योग्य पर्याय असून वाहतूक समस्येवर ठोस मार्ग निघावा. अशी शासनाकडे आमची विनंती आहे. अशी मागणी शिवाजी शिंदे यांनी केली आहे.

माथेरान हात रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे या संदर्भात बोलताना सांगतात... ब्रिटिश कालीन नियम व अटी आजही येथील कष्टकरी रिक्षा चालक या नियमांचे पालन करीत माणसाला माणसाने खेचणारी रिक्षा ओडत आहेत. मालवाहतूक करण्यासाठी दस्तुरी नाका ते माथेरान येथील कच्चे रस्ते व चढण मार्ग अतिशय खडतर जीवन जगणारी समस्या आहे. आणि यासाठी पर्याय वाहतूक व्यवस्था म्हणून मी ई रिक्षा चे माध्यमं माथेरानमध्ये यावं. याकरिता शासन दरबारी न्याय मागत असून लवकरात लवकर वाहतुकीचा रिक्षा चालकांच्या भावना जाणून माथेरानमध्ये ई रिक्षा चालू व्हावी असे माझं स्पष्ट मत आहे. बैल जसे बैलगाडी ओढतात ती प्रथा माथेरानला लागलेली आहे. ती बंद व्हावी आणि ई रिक्षा सुरु व्हावी. असं मत सुनील शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

माथेरानचे जेष्ठ नागरिक अध्यक्ष हरिभाई मेहता सांगतात... माथेरान चे पर्यावरण कायम अबाधित राहून आम्हा ज्येष्ठ नागरिकांच्या भावना व समस्या लक्षात घेता माथेरानमध्ये वाहतुकीचा प्रश्न सोडवावा. आजारपणाच्या वेळेस वाहतुकीची व्यवस्था नसल्याने आमच्यासारख्या वयोवृद्ध व्यक्तींनी औषध उपचार करण्यासाठी मुंबई पुणे शहरापर्यंत जाईपर्यंत कित्येक लोकांनी प्राण गमावले आहेत. दस्तुर ते माथेरान मध्यवर्ती ठिकाण येथे रिक्षाने किंवा घोड्यावर येण्यासाठी किंवा वेळे अभावी ॲम्बुलन्स न मिळाल्याने जो होणारा खर्च आहे. तो आम्हा सर्वसामान्य व्यक्तींना परवडणारा नाही तरी शासन दरबारी आम्हा ज्येष्ठ नागरिकांची कळकळीची विनंती आहे की, ई रिक्षा किंवा माथेरान च्या पर्यावरणाला हानी न होता कोणतेही वाहन सुरु व्हावं ही अशी आग्रहाची विनंती. असं हरीभाई मेहता सांगतात.

एकीकडे लोक इ रिक्षा ची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे माथेरान स्थानिक अश्व पाल संघटनेच्या अध्यक्ष आशाताई कदम यांनी इ रिक्षा प्रतिक्रिया देताना आमच्या पोटावर पाय देऊ नका. असं आवाहन केलं आहे.

जगभरातून येणारे प्रवासी घोड्यावर बसून साईट सीन व पॉईंट बघण्यासाठी घोड्यावरुन रपेट करीत असतात. माथेरान मधूनच जगभरात होणाऱ्या घोड्यांच्या रेस आणि घोडे स्वार जॉकी हे माथेरान च नावलौकिक करीत आहेत. येथील घोडेस्वारी व्यवसाय हे आम्हा घोडा व्यावसायिकांचे मुख्य साधन असून आमची उपजीविका या प्रवासी घोडा व्यवसायावरच अवलंबून आहे. माथेरानची वाहतूक व्यवस्था हा अतिशय जटिल प्रश्न असला तरी आम्ही माथेरान च्या विकासाच्या आड येणार नाही. परंतु विकास जरूर व्हावा. परंतु आम्हा घोडेवाले व्यावसायिकांचे जीवन भकास होता कामा नये. असं मत आशाताई कदम यांनी व्यक्त केलं आहे.





या संदर्भात माथेरान गिरिस्थान नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली... माथेरान हे भारतातले दुर्गम पर्यटक स्थळ असून माथेरानला नियमित हजारो पर्यटक येत असतात आणि त्या पर्यटकांना जाण्या येण्याच्या सोयी सुविधा पुरवल्या जातात. या करिता जी जीवनावश्यक मालवाहतूक केली जाते. त्याकरता सुविधा ब्रिटिश कालापासून उपलब्ध आहेत. त्यामध्ये वाहतूक व्यवस्थेसाठी सर्वात जास्त वापर घोड्यांच्या द्वारे केला जातो. यामध्ये मालवाहतूक घोडे व प्रवासी घोडे असे दोन प्रकार असून रेल्वे विभागामार्फत अमन लॉज ते माथेरान ठिकाणापर्यंत शटल सेवा सुविधा असून पर्यटक व जीवनावश्यक वस्तू म्हणजेच भाजीपाला व इतर वस्तू आणल्या जातात. या सर्व वाहतूक प्रक्रियेत माथेरान नगर परिषद सर्वतोपरी मदत करीत असते.

यामध्ये जिल्हाधिकारी असतील किंवा विभागीय आयुक्त असतील हे वरिष्ठ अधिकारी मदत करीत आहेत. शटल सेवा सुरू करण्यापासून त्याची सेवा वाढवण्यासाठी डी आर एम रेल्वे अधिकारी मदत करीत असतात आणि अजून चांगल्या पद्धतीची वाहतूक व्यवस्था द्यायची असेल तर इलेक्ट्रिक वेहिकल E सेवा सुरु होणे आवश्यक आहे. यासाठी नगरपरिषद माथेरान प्रयत्न करीत आहे. या साठी पर्यावरण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी व हेरिटेज कमिटीचे अध्यक्ष हे देखील पाठपुरावा करत आहेत. तरी E व्हेहिकल जर आपल्याकडे सेवा सुरू झाली तर अधिक चांगल्या पद्धतीने स्थानिकांना व पर्यटकांना सुविधा देता येतील. असं मत प्रशांत जाधव यांनी व्यक्त केलं आहे.

या संदर्भात माथेरान नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याशी देखील आम्ही बातचीत केली त्या म्हणाल्या माथेरान हे पर्यावरण पूरक आणि इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येणारे पर्यटक स्थळ आहे. येथील माल वाहतूक व्यवस्था मानवी श्रमशक्ती द्वारे केली जाते. यामध्ये पर्यावरण जपण्याचे फायदे आहेत आणि आम्ही पर्यावरण जपतो. म्हणजेच माथेरानमध्ये मालवाहतूकीला आतमध्ये येण्यास बंदी आहे. म्हणून येथील पर्यावरण जपले गेले आहे. ही चांगली बाब आहे. त्याच्या दुसऱ्या बाजूने राज्य शासनामार्फत महाविकास आघाडी सरकारच्या मार्गदर्शनाने जो निधी विकास कामांसाठी उपलब्ध झाला आहे. त्या अंतर्गत माथेरानमध्ये अनेक विकास कामे सुरू आहेत. ही कामे सुरू ठेवण्यासाठी जो प्रत्यक्ष मालवाहतूक ही साईट वर पोहोचण्यासाठी जो कालावधी लागतो. कारण घोड्यांच्या मार्फत मालवाहतूक होते. ही अत्यंत जटील समस्या आहे. यासाठी एक पर्याय मार्ग म्हणून तसंच ही विकास काम मुदतीत पूर्ण व्हावेत.



त्यासाठी ठराविक मुदतीसाठी आम्हाला एखाद्या ठिकाणी वाहन आणण्यासाठी परवानगी शासनाने द्यावी. ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत. त्या आणण्यासाठी सुद्धा एक पर्यावरण पूरक मार्ग म्हणून जर येथे आम्हाला शासनाने जर सुविधा केली तर निश्चितच मला वाटते आदित्य ठाकरे यांनी जी ट्रम मुंबईमध्ये सुरू केली आहे. तशाच प्रकारे माथेरान लाही सुरू होईल. याकरिता त्यांचे प्रयत्न चालू आहेत

निश्चितच लवकरात लवकर हा प्रकल्प माथेरानमध्ये सुरू होईल व माथेरान कर यांना दिलासा मिळेल माथेरान पर्यटनाच्यादृष्टीने जसे आहे. तसेच आम्ही जपणार आहोत हे नक्की परंतु काळाप्रमाणे बदल होणे गरजेचे आहे. यामध्ये राज्य शासन माथेरान करांना मदत करीन अशी आशा आहे.


Updated : 2 Aug 2021 12:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top