सामाजिक द्वेष पसरवण्याचा डाव महाराष्ट्राने उधळला?
X
मशिदींवरील भोंग्यांवरुन राज ठाकरेंनी गर्जना केली आणि राज ठाकरेंचा ट्रॅक आता परप्रांतियांच्या मुद्द्यावरुन थेट हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे सरकल्याचे स्पष्ट झाले. अर्थातच राज ठाकरेंच्या या हिंदुत्ववादाच्या ट्रॅकला भाजपच्या समर्थनाचा आधार होताच. राज ठाकरे यांनी तर आणखी एक पाऊल पुढे टाकत सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला. एवढेच नाही तर मशिदींमध्ये काय काय चालते याची उदाहऱणं देत मशिदींबाबत आणि मुस्लिम धर्मीयांबाबत संशय निर्माण होईल अशी वक्तव्य राज ठाकरे यांनी केली.
यानंतर राज्यात सामाजिक तणाव निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. पण मुस्लिम नेत्यांनी इथे संयमाची भूमिका घेतल्याचे दिसले. एमआयएमचे असुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना शांत राहण्याचे आवाहन केले आणि कायदेसीर मार्गाने संघर्षाचे आवाहन केले. तिकडे इम्तियाज जलील यांनी तर राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीला येण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर राज्यातील जनतेनेही या द्वेषाच्या राजकारणाचे समर्थन करणार नाही, असे स्पष्ट बजावले आहे. राज्यातील कोणत्याही मुस्लिम बहुल किंवा हिंदु बहुल भागात गुढी पाडव्यानंतर ते आजतागायात कोणतीही तणावाची घटना घडलेली नाही...त्यामुळे महाराष्ट्राने सामाजिक द्वेष निर्मितीचा डाव उधळून लावल्याचे दिसते आहे.