गोदी मीडियाला शेतकऱ्यांचं भय का ?
शेतकरी आंदोलनात गोदी मीडियाला तोंड लपवत वार्तांकन करण्याची वेळ का आली? गोदी मीडियाला शेतकऱ्यांची भीती का वाटतेय? जमिनीत अंकुर फुलवणाऱ्या शेतकऱ्यांनी गोदी मीडियाला जागा दाखवत भारतीय माध्यमांमध्ये आशेचा अंकुर निर्माण केला आहे का? वाचा मॅक्स महाराष्ट्राचा स्पेशल रिपोर्ट
X
भारतात याआधी अनेक आंदोलने झाली आहे. सरकारविरोधातला रोष दर्शवण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. त्यांच्या बातम्या सर्व माध्यमांनी दाखवल्या. पण दिल्लीतील आंदोलनात मात्र आंदोलक शेतकरी माध्यमांना सांगत आहेत तुम्ही आमची बातमी कव्हर करु नका....असे का घडत आहे. माध्यमांबद्दल शेतकऱ्यांच्या मनात एवढा राग का आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यात माध्यमे कमी पडत आहेत का, की शेतकऱ्यांची बाजू समजून न घेता काही माध्यमे केवळ एकतर्फी वार्तांकन करत आहेत, या प्रश्न आहे.
'We are farmers not a terrorist',
'Bycott गोदी मीडिया'
यांसारख्या पोस्टरने सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. पंजाब आणि हरियाणाची जनता सरकारची चाटुगिरी करणाऱ्या चॅनलच्या प्रतिनिधींना पिटाळून लावत आहे. सरकारची तळी उचलणारे चॅनेलच्या प्रतिनिधींसमोर गोदी मीडिया गो बॅक असे नारे लावले जात आहेत. त्यामुळे गोदी मीडियाची शेतकरी आंदोलनामध्ये चांगलीच गोची झाल्याचे दिसून येत आहे.
चॅनल्सची ओळख असलेले बुम काढून आपली ओळख लपवण्यासाठी काही पत्रकारांकडून लेपलचा वापर केला जात आहे. तरीही प्रतिनिधींची ओळख लपवण्यात चॅनल्स अपयशी ठरल्यानंतर त्यांनी महिला पत्रकारांना या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी पाठवले आहे. काही माद्यमांनी पंजाबची पार्श्वभूमी असलेली किंवा पंजाबी भाषा येत असलेल्या प्रतिनिधींना वार्तांकनासाठी पाठवले. हे करुनही शेतकऱ्यांचा रोष काही थांबलेला दिसत नाही. ही बाब लक्षात घेता आता महिला प्रतिनिधींना वार्तांकनासाठी आंदोलनाच्या मैदानात धाडले आहे.
पण तरीही आंदोलक शेतकरी अनेकवेळा आक्रमक होत महिला पत्रकारांसमोर गोदी मीडिया गो बॅकचे नारे लावताना दिसत आहे. त्यामुळे गोदी मीडिया आंदोलक शेतकऱ्यांसमोर हतबल झाल्याचे चित्र आहे.
गेल्या काही वर्षात भारतीय माध्यमांची प्रतिमा जनमानसात मलीन झाली आहे. त्यामुळे अनेक भारतीय माध्यमांना जनतेच्या रोषाला सामोरे जावं लागतं आहे. जगभरात देखील यामुळे मुख्यप्रवाहातील अनेक माध्यमांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थितीत केले जात आहेत.
अनेक राष्ट्रीय माध्यमांचं वार्तांकन करण्यासाठी महिला पत्रकारांना पाठवण्यात आलं आहे. महिला पत्रकार असल्यामुळे शेतक-यांचा विरोध कमी झाला असला तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम असल्याचं चित्र आहे. एकंदरित शेतकऱ्यांच्या मनामध्ये माध्यमांबद्दलची प्रतिमा मलिन झाली असल्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
शेतक-यांमध्ये Media literacy कुठून आली?
पंजाब-हरियाणातील जनतेमध्ये माध्यमांची साक्षरता ( Media literacy ) अधिक आहे का? कोणत्या चॅनलच्या संपादकांवर शंभर कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे? इथंपासून ते कोणत्या चॅनलची मालकी कोणाकडे आहे? कोणत्या चॅनलला भाजप खासदाराने पैसे लावले आहेत? इथपर्यंतची माहिती पंजाब हरियाणातील शेतक-याला कुठून मिळते?
शेतकऱ्यांमध्ये हे एवढ्या मोठ्या प्रमाणात Media literacy कुठून आली? आंदोलक शेतकऱ्यांचं भारतीय माध्यमांबद्दल नक्की काय मत आहे?यासंदर्भात आम्ही आंदोलक शेतकऱ्यांशी बातचीत केली असता आंदोलक शेतकरी तरुण म्हणतो की ...
"गोदी मीडियामुळे हे आंदोलन म्हणजे सत्य आणि असत्य या मधली लढाई झाली आहे? कारण सरकार लोकांपर्यंत असत्य कसं पोहोचेल ? याची व्यवस्था करण्यात व्यस्त आहे. सरकारच्या मते शेतकऱ्यांसाठी असलेले कायदे हे त्यांच्या फायद्यासाठी आहेत आणि दुसरीकडे ज्यांच्यासाठी हे कायदे केलेले आहेत ते शेतकरी स्वतः म्हणतात की, आम्हाला या कायद्याची गरज नाही. त्यामुळे ही सत्य आणि असत्याची लढाई आहे असं म्हणता येईल. सरकारने आम्हाला खलिस्तानी असल्याचं सुद्धा संबोधलं. त्यानंतर आतंकवादी सुद्धा म्हटलं. पण इथला प्रत्येक शेतकरी हा रस्त्यावर झोपतो आहे. रस्त्यावर खात पीत आहे. हे माध्यमं का दाखवत नाहीत. आम्हाला या कायद्यांचा त्रास होत आहे. म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. पण सरकारला या आंदोलनाला माध्यमांचा वापर करून बदनाम करण्याच्या प्रयत्नात आहे."
दुसऱ्या युवक शेतकरी म्हणतो, *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला पाहिजे. पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर त्यांना देता येणार नाहीत. हे त्यांना माहित असल्याने ते प्रेस कॉन्फरन्स घेत नाहीत . पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. ज्यांनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डरपोक आहेत. ते एकूण लोकसंख्येपैकी जास्त लोकसंख्या असलेल्या धर्मातील लोकांचा भावनिक आधार बनून निवडून येतात. पण आम्ही पंजाबमधील युवक आहोत. कोणतीही लढाई सुरू होत असताना ती पंजाबमधून सुरू होते आणि आम्ही या लढाईचा प्रारंभ केला आहे. यामध्ये सुद्धा फतेह मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही."
Farmer agitation : Media literacy म्हणजे काय रे भाऊ?
सध्या भारतीय माध्यमांबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात असताना लोकांचं माध्यमांच्या भूमिकांबाबत सतर्क होणं चांगल्या लोकशाहीचं लक्षण आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून पंजाबमध्ये आंदोलन सुरु असताना एकही नॅशनल मीडिया आमच्याकडे फिरकला नाही. हे कशाचं लक्षण आहे? असा सवाल करत माध्यमांनी सरकारची चाटुगिरी सोडून त्यांची भूमिका निभावणं गरजेचं आहे. असे पंजाब ओनलाईनचे संपादक सिद्धू यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बातचीत करताना सांगितले.
एकंदरीत वरील सर्व प्रतिक्रिया पाहता भारतीय माध्यमांबाबत आंदोलक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळते. त्याचबरोबर सरकारची चाटुगिरी करणाऱ्या माध्यमांना जनता पिटाळून लावत असल्याने एक आशेचा किरण पाहायला मिळतो आहे.
या सगळ्यावरुन एक गोष्ट सिद्ध होते आहे ती म्हणजे माध्यमांना कृषीविषयक बातम्या करण्याची पद्धत बदलावी लागणार आहे. सध्या प्रसारमाध्यमांमध्ये कृषी विषयक बातम्या दाखवण्याचे प्रमाण नगण्य आहे. पत्रकारांना शेतीविषयी माहिती नसल्याने केवळ सरकारी दावे किंवा सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांना सत्य मानून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहण्याची चूक काही माध्यमे करतात आणि मग शेतकऱ्यांचा माध्यमांवरील विश्वास उडतो. म्हणूनच गोदी मीडियाला या आंदोलनात विरोध सहन करावा लागतोय. त्यामुळे की कृषी क्षेत्राबाबत निष्पक्ष पत्रकारिता का गरजेची आहे हा धडासुद्धा या आंदोलनाने घालून दिला आहे.