Home > मॅक्स रिपोर्ट > Special Report : 9 जणांची हत्या, त्या दिवशी नेमके काय घडले?

Special Report : 9 जणांची हत्या, त्या दिवशी नेमके काय घडले?

सांगलीतील म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील ९ जणांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यामागे गुप्तधनाचे कारण सांगितले जाते आहे. पण ही घटना नेमकी घडली कशी आणि याला जबाबदार कोण आहे, याचा म्हैसाळमधून ग्राऊंड रिपोर्ट सादर केला आहे आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी...

Special Report : 9 जणांची हत्या, त्या दिवशी नेमके काय घडले?
X

"आदल्या दिवशी पाच-सहा वाजेपर्यंत सगळे हसत खेळत होते. कटट्यावर बसून सगळे नारळ सोलत बसलेले होते. साधारण अकरा नारळ होते. त्यांच्या एकूण वागण्यातून घरी काहीतरी कार्यक्रम अथवा पूजा पाठ असावा असे वाटत होते. रात्री अकरा वाजता सर्व दरवाजे तसेच लाईट पण बंद केलेली दिसत होती. दररोज सकाळी माझ्याकडे त्या रेखा वहिनी दुध न्यायला यायच्या. अजून दुध न्यायला येत नाहीयेत म्हणून मी सतत खिडकीतून त्या येण्याच्या रस्त्याकडे पाहत होते. साडेदहा वाजले तरी त्या येईनात म्हणून मी त्यांच्या घरी गेले. तर समोरचा दरवाजा बंद. दार वाजवले तरी कुणी प्रतिसाद देत नव्हते. म्हणून आम्ही घाबरून फोटोग्राफर असलेले त्यांचे चुलत भाऊ अनिल वनमोरे यांना फोन करून दार उघडत नसल्याबाबत सांगितले". माणिक वनमोरे यांच्या शेजारी राहत असलेल्या चौंडजे यांनी म्हैसाळमधील ती धक्कादायक घटना कशी उघड झाली याची माहिती मॅकस महाराष्ट्रला दिली.

चौंडजे यांनी फोन करून अनिल वनमोरे यांना ही माहिती दिल्यावनंतर ते त्यांच्या पत्नीसह तातडीने या घरी आले. त्यानंतर त्यांना समोर जे दिसले ते त्यांच्याच शब्दात "फोन आल्यावर दहा मिनिटांमध्ये आम्ही तातडीने घरी पोहोचलो. पाठीमागचा दरवाजा उघडा असल्याचे आम्हाला दिसले. त्या दरवाज्यातून आम्ही आत गेलो तर आम्हाला पोपट वनमोरे यांचा मुलगा शुभम निपचित पडल्याचे दिसले. आम्हाला धक्का बसला. माझे भाऊ संजू वनमोरे हे घरात गेले तर त्यांना सर्व जन मृतावस्थेत असल्याचे दिसले. किचनमध्ये शुभम, बेडरूममध्ये आई बेडवर तेथेच खाली त्यांची मुलगी, आजी हॉलमध्ये अशाप्रकारे सर्वजण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पडलेले होते. आम्ही तातडीने पोलिसाना बोलावले."

माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे हे दोघे सख्खे भाऊ. दोघांची वेगवेगळी घरं होती. पोपट वनमोरे राजधानी हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या वसाहतीत राहायचे. पोपट वनमोरे यांचा मुलगा शुभम हा माणिक वनमोरे यांच्या घरी मृतावस्थेत आढळला. तिकडे त्याच्या घरात देखील त्याचे आई वडील आणि मुलीचा मृत्यू अशाच प्रकारे झाला. रात्री शुभम इकडे कशासाठी आला असेल याची माहिती घेण्यासाठी आम्ही ते घर गाठले. आजूबाजूला चौकशी केल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास शुभमच्या गाडीचा आवाज आल्याचे तेथील काही नागरिक सांगतात. शुभमची एम एच १० ए जी ३३८९ या क्रमांकाची गाडी माणिक वनमोरे यांच्याच घरी आढळल्याने शुभम कोणाला तरी घेऊन माणिक वनमोरे यांच्या घरी रात्री गेला असल्याचे वाटते.

शुभम हा बदली ड्रायव्हिंगचे काम करायचा. तोच पहिल्यांदा मांत्रिकांच्या नादाला लागल्याचे इथले लोक सांगतात. त्याच्या घरी त्याचे ऐकले जायचे. शुभमच्या करवी पहिल्यांदा वडील आणि नंतर चुलते यांच्यापर्यंत मांत्रिक पोहोचला असावा असा स्थानिकांचा अंदाज आहे. याबाबत शिवशंकर कॉलनीमध्ये राहणारे शुभमचे शेजारी मच्छिंद्र करपे सांगतात , "शुभम बदली ड्रायव्हिंगसाठी सोलापूरला जात असायाचा. त्यानिमित्ताने तो दोन वर्षापासून या मंत्रतंत्राच्या नादी लागला होता. मी त्याच्या वडिलांना याबाबत अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये असे सांगितले होते".

माणिक वनमोरे यांचे कुटुंबीय घटनेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी नारळ सोलत असल्याचे दिसले होते, असे तेथील नागरिकांनी सांगितल्यावर याची खात्री करण्यासाठी आम्ही घराच्या परिसराचे निरीक्षण केले. तर घराच्या डाव्या भिंतीला सोललेल्या नारळाच्या केसरांचा ढीग दिसून आला. ती केसरे साधारण दहा ते बारा नारळांची असावीत, असे दिसते. इतके नारळ त्यांनी कशासाठी सोललेले असावेत, असा प्रश्न निर्माण होतो?

ही घटना आत्महत्या असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानुसार सुसाईड नोटमध्ये आढळलेल्या खासगी सावकारी करणाऱ्या २५ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यातील १९ आरोपींना अटक देखील करण्यात आलेली होती. पोलीस तपासात मांत्रिकाने गुप्तधन देतो म्हणून त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्यानंतर सर्व कुटुंबाचाच विषारी औषध देऊन खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

गुप्तधनाच्या लालचेने झाला सुखवस्तू उच्च शिक्षित कुटुंबाचा घात

ही दोन्ही कुटुंबे उच्च शिक्षित होती. माणिक वनमोरे हे स्वतः पशु वैद्यकीय डॉक्टर तर पोपट वनमोरे हे शिक्षक होते. वनमोरे यांची मुलगी कोल्हापूर येथे बँकेत नोकरी करत होती. दोन्ही कुटुंबे ही सुखवस्तू आयुष्य जगत होती. पण गुप्तधनाच्या लालसेपोटी दोन्ही कुटुंबांचा घात झाला. त्यांनी मांत्रिकाना कर्ज काढून पैसे दिले. १९ जून रोजी गुप्त धन देण्यासाठी पूजाविधी करण्याकरीता आल्यावरच मांत्रिकाने विषारी द्रव्य देऊन ९ जणांचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मांत्रिकाला देण्यासाठी या कुटुंबाने खासगी सावकारांकडून देखील कर्ज काढलेले होते. हे पैसे त्यांनी या मांत्रिकांना गुप्तधनाच्या लालसेपोटी दिलेले होते.

म्हैसाळ येथील खासगी सावकारी उघड

या घटनेमुळे म्हैसाळ येथे उघडपणे खासगी सावकारीचा गोरखधंदा सुरु असल्याचे उघड झाले आहे. येथील एका नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की येथील गावातील पंचवीस टक्के लोक खासगी सावकारीचा धंदा करतात.

या घटनेत पोलिसांनी मांत्रिक असलेला महंमद बागवान व त्याचा चालक धीरज सुरवसे याला अटक केली आहे. गुप्तधनाच्या लालसेपोटी ९ जणांचा बळी घेतला गेला. या घटनेत या दोन मांत्रिकां व्यतिरिक्त अजून कोणी सहभागी आहे का ? त्यांनी किती पैसे घेतले? या कामात त्याना स्थानिक कोणी मदत केली आहे का या बाबींचा तपास होऊन तथ्य समोर आणण्याच काम पोलीस करत आहेत.

अजूनही अंधश्रद्धेची ही पाळेमुळे समाजात खोलवर रुजली असल्याचे या घटनेवरून दिसून येते. अंधश्रद्धा निर्मुलन कायदा अस्तित्वात असूनही असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणी आणि जनजागृतीसाठी सरकार अजूनही कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. उच्च शिक्षित कुटुंबातील नोकरदार असलेले लोक देखील अशा प्रकारांवर विश्वास ठेवत असल्याचे या घटनेतून सिद्ध झाले आहे. समाजामध्ये याविषयी जनजागृती आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Updated : 30 Jun 2022 11:48 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top