Home > मॅक्स रिपोर्ट > डोंबिवली अभयारण्य आग : १०० एकर जमिनीवर कुणाची नजर?

डोंबिवली अभयारण्य आग : १०० एकर जमिनीवर कुणाची नजर?

एकीकडे जंगल बचाव असा नारा सरकार देतंय पण दुसरीकडे सरकारचेच वनखाते जंगलाला लागलेल्या किंवा लावल्या जाणाऱ्या आगीकडे दुर्लक्ष करत असल्याचे उघड कऱणारा आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांचा ग्राऊंड रिपोर्ट पाहा....

डोंबिवली अभयारण्य आग : १०० एकर जमिनीवर कुणाची नजर?
X

जस जसे नागरीकरण वाढते आहे तसा तसा पर्यवरणाचा विनाश होताना दिसतो, जल, जंगल जमीन आणि हवा सर्वांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. यात जगलांना आग लागणे किंवा काही दुष्प्रवृत्तींनी आग लावणे हे प्रकारही समोर आले आहेत. मध्यंतरी दक्षिण आफ्रिकेत जंगलांना लागलेली आग हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला होता.

असाच अचानकपणे आग लागण्याचा प्रकार डोंबिवली येथील पक्षी अभयारण्यात गेल्या आठवड्यात घडला. दावडी, उंबरली, खोणी यांच्यामध्ये शंभर एकरावर जंगल आहे. उंबरली गावाच्या गावदेवी मंदिर, दावडी आणि खोणी या प्रत्येक गावात या टेकडीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. मात्र गेली 5/6 वर्ष झाली निसर्गप्रेमी, पक्षीतज्ज्ञ आणि पर्यावरण प्रेमी यांनी इथे काम करण्यास सुरुवात केली, तसे हे प्रकाश झोतात येऊ लागले. इथल्या वनस्पती, वेगवेगळी झाडे, प्राणी, पक्षी, फुलपाखरे आणि कीटक यांची विविधता जाणून मुंबई, पुणे आणि इतरही ठिकाणी पर्यावरण प्रेमी फोटोग्राफर इकडे आकर्षित होऊ लागले.

मात्र गेल्या आठवड्यात अचानक या डोंगरावर आगीचे लोळ दिसू लागले. खरे तर ना सोसाटयाचा वारा होता. ना विजांचा कडकडाट होता ना मग ही आग लागली कशी? बरं एकावेळी एका बाजूला आग लागेल, पण मग एकाच वेळी दोन्ही बाजूंनी आग कशी लागली? याबद्दल निसर्गप्रेमी आणि या अभयारण्यात काम करणारे मंगेश कोयन्डे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही आग तब्बल 5 तास अथक प्रयत्न करून आग विझवली.


त्या दिवशी नेमके काय घडले?

मंगेश कोयान्डे यांनी त्या दिवशी नेमके काय घडले याची माहिती दिली आहे, "९ डिसेंबर २०२० डोंबिवली पक्षी अभयारण्यासाठी काळा दिवस होता. याच दिवशी डोंबिवली शहरात एका भंगाराच्या गोडाऊनला मोठी आग लागली आणि पोलीस, फायर ब्रिगेड आणि सगळी यंत्रणा कामाला लागली. पण त्याचवेळी तिथून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या जंगलात सुद्धा मोठी आग कोणीतरी लावली पण कोणाचं तिकडे लक्ष सुद्धा गेले नाही.

"दुपारी अंदाजे २.३० च्या दरम्यान या जंगलाला कोणीतरी आग लावली आणि मला साधारण ३ वाजता कॉल आला लगेच मी काही जणांना कॉल केले आणि आमच्या व्हॉटसअप ग्रुपवर कळवले आणि स्वतः ३.३० वाजता जंगलात पोचलो. फायर ब्रिगेडला कॉल नाही केला कारण त्यांची यंत्रणा भंगार गोडाऊनच्या आगीसाठी लागली होती आणि जंगलात छोटे आणि मातीचे रस्ते असल्यामुळे बंब गाडी तिथपर्यंत येणे शक्य नव्हते. आगीच्या ठिकाणी पोहोचल्यावर पूर्ण अंदाज घेतला की किती मोठ्या स्वरूपाची आग आहे आणि कुठे कुठे पसरली आहे. माझ्या अगोदर सोनारपाडा मधील २ ग्रामस्थ आणि दावडीचे फॉरेस्टच्या कॉन्ट्रॅक्टरचे वन रक्षक पोहोचले होते आणि त्यांच्या परीने दावडी आणि सोनारपाडा बाजूची आग विझव्यासाठी प्रयत्न करत होते. डोंबिवलीचे एक रहिवासी दररोज संध्याकाळी वॉकसाठी येतात ते पण प्रयत्न करत होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून पूर्णपणे या भागाची आग संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नियंत्रणात आणली. मी मग या डोंगराच्या मुख्य टेकडीकडे मोर्चा वळवून अजून कुठे आग आहे का हे शोधले आणि समोर मोठी आग दिसली. उंबार्लीची मागची बाजू, खोणी आणि धामटन बाजूला आगीचे तांडव होते. अख्खं जंगल तिने कवेत घेतलं होतं आणि उरलो मी एकटाच कारण आग विझली म्हणून बाकीचे टीम मेंबर घरी निघून गेले होते. मग परत काही मित्रांना कॉल केला आणि मदतीसाठी बोलावले आणि काही वेळातच अमोद वेंगुर्लेकर, शशिकांत कोकाटे आणि अनिल उद्देवार हजर झाले आणि ते येईपर्यंत मी आग विझवायला प्रयत्न सुरू केले होते. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून रात्री ९ वाजपर्यंत आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.


त्यात कहर म्हणजे ज्या डोंगरावर आम्ही आग विझविण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्याखाली म्हाडाचे कर्मचारी सुरुंग स्फोट करत होते आणि अख्खा डोंगर त्यामे हादरत होता. एकीकडे आग आणि दुसरीकडे सुरुंग स्फोट सुरू होते. त्यांनी तब्बल ४ सुरुंग फोडले पण जीवमुठीत धरून आम्ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि शेवटी आम्ही या सर्व संकटांवर मात करून रात्री ९ वाजता आग पूर्णपणे विझविली.

या सर्व आगीमध्ये पक्षी आणि वन्यप्राण्यांचे खूप मोठ्या प्रमाणात जीव गेला. माझ्या डोळ्यासमोर पक्षांची पिल्लांसकट घरटी जळाली आणि पिल्लांना वाचविण्यासाठी पक्षांची धडपड सुरू होती. साप, विंचू, घोरपड इतर सरपटणारे प्राणी आणि जंगलातला कित्येक जीवांचा या आगीने बळी घेतला आहे. अनेक झाडं आमच्या डोळ्यादेखत आगीमध्ये भस्मसात झाली.

या आगीला आणि पक्षी-प्राण्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

या घटनेनंतर पर्यवरणप्रेमींनी कीह प्रश्न उपस्थित करत या घटनेले नेमके जबाबदार कोण असा सवाल विचारला आहे.

१) भूमाफिया / कचरा माफिया?

२) वन कर्मचारी? ज्यांनी पूर्णपणे गवत न कापता ठराविक गवत कापले आणि जे कापले त्याचे गठ्ठे न उचलता ते इथेच ठेऊन गेले म्हणून त्याला आग लागली.

३) जंगलाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असलेला वनविभाग?

आज या आगीमुळे ८० % झाडं जळून गेली आहेत आणि सगळी वनसंपदा पण जाळून खाक झाली आहे. जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वन्यप्रेमी करत आहेत.

वनविभागाला आगीचा पत्ताच नाही?

सरकारी यंत्रणा म्हणजे वनखाते या आगीकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण आमचे प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी या संदर्भात वनाधिकाऱ्यांना अनेक फोन केले पण त्यानी प्रतिसाद दिला नाही. एवढी आग लागल्यावर निसर्गप्रेमी जीव धोक्यात घालून आग विझवतात, मात्र वनाधिकाऱ्यांना नेमका क़ाय प्रकार आहे, आग कशी लागली, का लागली, कुणी लावली याबद्दल साधी चौकशी देखील कराविशी वाटत नाही. या प्रकऱणाबद्दल आम्हाला बोलता येणार नाही असे उत्तर देऊन ते मोकळे झाले.

वास्तविक जल, जंगल, जमीन आणि हवा याच्या प्रदूषणाचे महाभयंकर परिणाम अख्खे जग कोरोनासाथीत भोगत असताना , आजही पर्यावरणाबाबतचा हलगर्जीपणा काय आहे.


पर्यावरणीप्रेमींची जिद्द

ज्या समाजकंटकांनी ही आग लावली आहे त्यांना मात्र निसर्गप्रेमींनी आव्हान दिले आहे. तुम्ही जेवढ्या आगी आमच्या जंगलात लावाल त्याच्यापेक्षा जास्त झाडं आम्ही लावू आणि त्यांचे संगोपन करू आणि परत एकदा जंगल पूर्ववत करु असा निर्धार केला आहे.


Updated : 16 Dec 2020 8:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top