Home > मॅक्स रिपोर्ट > डान्सबारमध्ये मुली येतात कुठून ?

डान्सबारमध्ये मुली येतात कुठून ?

डान्सबारमध्ये मुली येतात कुठून ?
X

डान्सबारमध्ये मुली येतात कुठून ?

राजेरजवाड्यांच्या काळापासून मद्य आणि नृत्य ही परंपरा चालत आलेली आहे. काळानुरूप करमणुकीची साधनं बदलत जातात. मात्र, मद्य आणि नृत्य या परंपरेचे आधुनिक रूप म्हणजे डान्सबार म्हणता येईल. या डान्सबारचा इतिहास रंजक आहे... १०० वर्षांपेक्षा अधिकची परंपरा असलेल्या मुजरा संस्कृतीतून बारबाला आल्याचा दावा अनेकांनी केला आहे...

मुजरा या कलाप्रकाराला राजमान्यता होती, मात्र लोकमान्यता फारशी मिळाली नाही. पुढे याच मुजऱ्यामध्ये वेश्यावृत्तीचा समावेश झाला आणि हा कलाप्रकारही बदनामीच्या झळा सोसू लागला. अशा मुजरा सेंटर्समध्ये काम करणाऱ्या मुलींना मुंबईतील डान्सबारचं आकर्षण निर्माण झालं तेच मुळात पैशामुळे...कित्येक तास नाचून-गाऊन मिळणाऱ्या पैशांपेक्षा डान्सबारमधल्या नृत्यातून मिळणारे पैसे कैक पटीने अधिक होते. त्यामुळे हळूहळू या मुली डान्सबारकडे वळायला लागल्या. १९८३ च्या सुमारास मुंबईत सहा डान्सबार होते. त्यातला पहिला डान्सबार हा सोनिया महल नावाचा होता. याबारमध्ये आजच्या ग्रँट रोड इथल्या काँग्रेस हाऊस (सध्या वेश्यावस्ती), ओपेरा हाऊस, बच्चुकी वाडी, बनारस की चाळ, नॅकस्की चाळ इथून मुली डान्सबारकडे वळायला सुरूवात झाली होती.

महिला तस्करी की परंपरा ?

मुळात डान्सबार मध्ये नाचणाऱ्या बारबालांची तस्करी होते की कुठल्यातरी कलापरंपरेतून त्या या व्यवसायात आल्या याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. काहींच्या मते डान्सबारमध्ये तस्करी करून आणलेल्या महिलांचं प्रमाण अधिक आहे तर काहींच्या मते त्या मुजरा, किंवा नृत्याच्या परंपरेतूनच या व्यवसायात आल्या आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या वर्षा काळे यांनी प्रत्यक्ष या बारबालांच्या कुटुंबियांकडूनच याविषयी जाणून घेतलं.

नट, बेडीया आणि डेरेदार समाजाच्या मुली भेटायला लागल्या. यावेळी त्यांनी आम्हांला सांगितलं की त्यांचे पुर्वजामधील स्त्रिया या या नवाबांच्या दरबारा मध्ये नाचत होत्या... मग अगदी २००२ ते २००५ पर्यत या समाजातील लोकं उदरनिर्वाहासाठी नाचगाणं करायचे हाच त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत होता. यामध्ये महिला मुख्यत: फक्त नाच गाणं नाही तर त्या श्रृंगारिक नृत्य करतात म्हणजे पुरूषांचं मनोरंजन करणं परंतू पुरूष प्रधान संस्कुतीमध्ये संपत्तीचा कोणताही भाग स्त्रियांकडे नसल्यामुळे स्त्रिया स्वत:च्या मनोरंजनावर आजही पैसे उधळत नाहीत आणि यांच तर पोटच मनोरंजनावर अवलंबुन असल्यामुळे पुरूषांसमोर श्रृंगारिक नृत्य आणि त्यावर पोट भरणं हा त्यांच्या व्यवसायाचा भाग होता. हा त्यांचा इतिहास. नट, बेडीया आणि डेरेदार समाजातील मुलींचं बारबाला असण्याचं प्रमाण अधिक असण्यामागे कदाचित ही परंपरा असावी, असंही कित्येक जाणकारांना वाटतं. मुजरा, वेश्यावस्ती, तमाशा, लावण्या, कोठ्या आणि नृत्यपरंपेरतून डान्सबार संस्कृतीला बारबाला मिळाल्या असा ढोबळपणे अंदाज बांधला जाऊ शकतो.

काय आहे नटनी प्रकार ?

नटनी म्हणजे बारबालांची व्हर्जिनिटी विकणे असा समज आहे. मुळात बारबाला आणि विवाह हे समीकरणचं या क्षेत्राला मान्य नाही. त्यामुळे नटनी हा सोहळा त्यांच्यामध्ये एखाद्या विवाहासारखाच साजरा केला जातो. नटनीमध्ये कौमार्य शाबित असलेल्या मुलीला कौमार्य भंग करेपर्यंत विकलं जातं. त्यानंतर जो पुरूष तिचं कौमार्य भंग करेल त्याने मुलीशी संबंधित लोकांना भरपूर पैसे द्यायचे असतात. या नटनीच्या विधीनंतर ती मुलगी या व्यवसायात येते...अशी माहिती बारबालांसाठी संघर्ष करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या वर्षा काळे यांनी दिली आहे.

Updated : 18 Jan 2019 7:08 PM IST
Next Story
Share it
Top