डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या सूत्रधारांचे काय झाले?
X
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 ऑगस्ट रोजी आठ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर दाभोलकर यांच्या खूनाच्या सूत्रधारांच काय झालं? त्यांना कधी पकडणार? असा प्रश्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने सरकारला विचारला आहे. एक प्रसिद्धी पत्रक काढून हा सवाल विचाऱण्यात आला आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमधील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने 2016 मध्ये डॉ. विरेन्द्र तावडे, ऑगस्ट 2018 मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे 2019 मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक केली. तसेच त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे. अमोल काळे या संशयित आरोपीविरुद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपींच्या विरुद्ध देखील अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. या खुनाचा तपास डॉक्टर वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे. या खुनामागील सूत्रधार कोण आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास होऊन डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार कोण आहेत, हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही असे प्रसिद्धी पत्रकात म्हटलेले आहे.
चार विचारवंतांच्या हत्यांमध्ये समान धागा
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा कलबुर्गी व गौरी लंकेश या चौघांच्या हत्यांचे एकमेकांत गुंतलेले धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले आहेत. या गुन्ह्यांमधील काही संशयित आरोपी समान आहेत, तसेच दोन समान शस्त्रे या चार खुनांमध्ये वापरलेली आहेत. बंगळुरू येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालनुसार डॉ दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्यावर एकाच बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत. न्यायालयात दाखल केलेल्या शस्त्रविषयक अहवालानुसार कॉ. पानसरे यांच्या खुनासाठी वापरलेले एक पिस्तुल प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनासाठी देखील वापरले आहे. या चारही खुनांच्या संदर्भातील शेवटची अटक जानेवारी 2020 मध्ये झालेली आहे. कर्नाटक एसआयटीने झारखंड या राज्यातून ऋषिकेश देवडीकर या गौरी लंकेश खुनातील संशयित आरोपीला अटक केलेली आहे. तो तेथे पेट्रोल पंपावर काम करत होता, यावरून हे खून करणार्याय गटाच्या यंत्रणेने किती लांबवर हात पसरले आहेत हे लक्षात येईल. सी बी आय ने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात असे म्हटले आहे की, सदर खुनाचा तपास करताना या प्रकरणातील संशयित आरोपींचा कॉ गोविंद पानसरे, प्रा कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या खुनाशी असलेला संबंध रेकॉर्डवर आलेला आहे व त्यातून हे स्पष्ट झाले आहे की ही फक्त खुनाची घटना नसून हे दहशतवादी कृत्य आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींना Unlawful Activities Prevention Act 1967 हा कायदा लावण्यात आलेला आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार जागर सप्ताह
डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतरदेखील त्यांनी सुरू केलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे व विवेकी समाजनिर्मितीचे काम जोमाने सुरू आहे. गेली आठ वर्षे 20 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व समविचारी संघटनातील साथी एकत्र येऊन संपूर्ण देशभर ठिकठिकाणी डॉक्टर दाभोलकर यांच्या खुनाचा निषेध करतात तसेच हे काम जोमाने पुढे घेऊन जाण्याचा निर्धार देखील व्यक्त करतात. राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून 20 ऑगस्ट रोजी देशात ठिकठिकाणी वैज्ञानिक दृष्टीकोनाचा जागर करणारे कार्यक्रम आयोजित केले जातात.ह्या वर्षी देखील दिल्ली, आसाम मध्यप्रदेश हरियाना पंजाब झारखंड हिमाचलप्रदेश ,पश्चिम बंगाल ,केरळ ह्या राज्यांच्या मध्ये हे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. पुणे येथे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृतिव्याख्यान आयोजित केले जाते. यावर्षी ज्येष्ठ पत्रकार आणि द हिंदू या वृत्त पत्राचे माजी संपादक पी साई नाथ या स्मृतिव्याख्यानासाठी वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते भारतीय लोकतंत्र और विवेकवादी शक्तियों के सम्मुख चुनौतियां या विषयवार विचार मांडणार आहेत.
कोरोना संकटामुळे सदर स्मृतिव्याख्यान हे ऑनलाईन आयोजित करण्यात आलेले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र या ट्रस्टचे अध्यक्ष मा प्रताप पवार हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नरेंद्र दाभोलकर थॉट्स, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र फेसबुकपेजवरून सदर व्याख्यानाचे लाईव्ह प्रसारण केले जाईल, असेही अंनिसतर्फे सांगण्यात आले आहे.
विचार जागर सप्ताहात काय?
रोज संध्याकाळी 6 वाजता
1. शनिवार दि. १४ ऑगस्ट : अंध रूढींच्या बेड्या तोडा अभियान, जाहीर मुलाखत - नंदिनी जाधव, पुणे (२०० महिलांच्या जटा निर्मूलन करणाऱ्या अंनिसच्या धडाडीच्या कार्यकर्त्या) प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री मुक्ता बर्वे उपस्थित असतील.
2. रविवार दि. १५ ऑगस्ट हिंसा के खिलाफ... मानवता की ओर..जाहीर मुलाखत: अंशुल छत्रपती, सिरसा, हरियाणा,(अंशुल यांचे वडील शहीद पत्रकार रामचंद्र छत्रपती यांचा खून बाबा राम रहीमच्या भक्तांनी केला होता, त्या विरोधात अंशुल यांनी अनेक वर्षे निर्भीडपणे खटला लढविला. या खून प्रकरणात बाबा राम रहीमला सजा सुनावली गेली.)
3. सोमवार, दि. १६ ऑगस्ट:जाहीर व्याख्यानसामाजिक चळवळी आणि माध्यमे वक्ते : संजय आवटे
4. मंगळवार, दि. १७ ऑगस्ट: बालसाहित्याच्या पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा
5. धवार दि. १८ ऑगस्ट राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन कार्यक्रम,राष्ट्रीय परिसंवाद: अध्यक्ष : डॉ. विवेक मॉन्टेरो,* (ऑल इंडिया पिपल्स सायन्स नेटवर्क) यामध्ये पंजाब, केरळ, तामिळनाडू, प.बंगाल, आसाम या राज्यातील वैज्ञानिक दृष्टिकोनावर कार्य करणाऱ्या संघटनाचे प्रतिनिधी सहभागी होतील.
6. गुरुवार दि. १९ ऑगस्ट २०२१,सकाळी १० ते दुपारी ४ वा पर्यंत.:डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार संमेलन असे. यामध्य. डॉ. शैलाताई दाभोलकर, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, विनोद शिरसाठ, प्रा. शमसुद्दीन तांबोळी, डॅनियल मस्करनीस सहभागी होणार आहेत.