आपण कायम कुपोषितच राहू काय?
X
डॉ. अरुणा ढेरे यांनी झुंडशाही झुगारण्याचे आवाहन केले आणि त्याच मंडपात पोलिसांच्या झोंडगिरीला काहीही विरोध न झाल्याचे चित्र लागलीच पाहायला मिळाले. ज्या तीन निमंत्रित महिलांनी नयनतारा सहगल यांचा कागदी मुखवटा चढवून निषेध नोंदवला त्यांना पोलिसांनी जबरीने मंडपाबाहेर काढले. मंत्र्याचे भाषण चालू असताना कुणाच्या झुंडशाहीच्या निषेधामुळे कॅमेरे तिकडे वळत असतील तर कसे चालेल?
हा गोंधळ थांबवण्यासाठी त्या तिघींना सभास्थानाबाहेर काढावे असा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा निर्देश आल्याचे कळते. त्याचबरोबर सभेतून कुणीतरी त्यांना बाहेर काढा अशी हाळी दिल्याचेही कळते. या निमंत्रित स्त्रिया आम्ही गोंधळ न घालता शांतपणे बसलो आहोत असे सांगत असतानाही त्यांना महिला पोलिसांनी बाहेर काढले. आणि श्रोतृवृंद बघ्याची भूमिका घेत याविरुद्ध निषेध न नोंदवता गप्पपणे पालकमंत्र्यांचे भाषण ऐकून घेऊ लागला.
व्यासपीठावर तेव्हा कोण होते? त्यांनी का नाही यात हस्तक्षेप केला? झुंडशाही झुगारायचे आवाहन करणारे भाषण ऐकणारे कान तसे बहिरेच होते...साहित्यप्रांत हा काही केवळ लेखकांमुळे कणखर होत नाही. वाचकांमुळेही होतो- लेखक वाचक बव्हंशी लिबलिब वर्तन करणारे असल्यास झुंडशाही झुगारणे कसे शक्य होईल?
सरस्वतीचा मंडप वगैरे भाषा मोठ्या गुलझारपणे वापरली जाते. सजावटीच्या उपयोगी आहेच ती भाषा. खरे तर हे सारे मंडप नैतिकतेचे असतात, नीतीतत्वांची राखण त्यांच्या छायेत व्हावी हेच सारसर्वस्व असते. या तथाकथित सरस्वतीच्या मंडपांत पोलिसांची अरेरावी कशी काय चालवून घेतली गेली? नीतीमत्तेच्या बोलांची कढी... निर्भयतेच्या बोलांचा भात...
आपण कायम कुपोषितच राहू काय?
- मुग्धा कर्णिक