Home > News Update > बीडमध्ये पिण्यासाठी पाण्याची चोरी

बीडमध्ये पिण्यासाठी पाण्याची चोरी

बीडमध्ये पिण्यासाठी पाण्याची चोरी
X

बीड जिल्ह्यातल्या दुष्काळावर एकीकडे उपाययोजना सुरू आहेत तर दुसरीकडे प्रशासनाच्या नियोजनातील ढिसाळ कारभाराचा फटकाही नागरिकांना बसतोय. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं ग्रामस्थांना अक्षरशः पिण्यासाठी पाण्याची चोरी करावी लागत आहे.

दुष्काळग्रस्त महिलांच्या जीवाला धोका...

बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागात जिथं पाण्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. अशा ठिकाणी ग्रामस्थांना किमान पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जाणं अपेक्षित आहे. त्याअनुषंगानं अंबाजोगाई तालुक्यातील दैठणा गावच्या ग्रामस्थांनाही प्रशासनाकडून टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. वारंवार पाण्याच्या टँकरसाठी मागणी करूनही प्रशासनानं ग्रामस्थांच्या मागणीकडेच दुर्लक्ष केलं. त्यामुळं सुमारे २ हजार लोकसंख्येच्या दैठणा गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय.

पिण्यासाठी पाण्याची चोरी

दैठणा गावच्या महिलांना दीड ते दोन किलोमीटर पायपीट करून पिण्याच्या पाण्याची गरज भागवावी लागत आहे. इतकी पायपीट केल्यानंतर ग्रामस्थांना एका खासगी शेततळ्यातून पिण्याचं पाणी चोरून आणावं लागतंय. ज्या शेततळ्यातून या महिला पाणी आणतात तिथं गाळ मोठ्याप्रमाणावर आहे. त्यामुळं गाळामध्ये अडकून त्या महिलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, ही परिस्थिती माहिती असूनही केवळ नाईलाज म्हणून या महिला जीव धोक्यात घालून शेततळ्यातून पाणी आणायला जात आहेत. या संपूर्ण परिस्थितीवरून दुष्काळाची तीव्रता लक्षात येते. प्रशासनानं दैठणाच्या ग्रामस्थांना टँकर सुरू करण्याच आश्वासन दोन महिन्यांपूर्वीच दिलं होतं. मात्र, त्याची अंमलबजाणीवच होत नसल्यानं ग्रामस्थांचा संयम सुटत चाललाय. अशा परिस्थितीत दैठणामध्ये तात्काळ पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराच ग्रामस्थांनी दिलाय.

पाणी विक्रीचा व्यवसाय जोमात...

एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे प्रशासनाच्या तोकड्या उपाययोजना. अशा परिस्थितीत शहरी आणि ग्रामीण भागात पाणी विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ७५० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय. सुमारे १४०० गावं बीड जिल्ह्यात आहेत. त्यातल्या अर्ध्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. तर इतर गावं पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. ज्यांच्या खासगी बोअरवेलला पाणी आहे, त्यांनी पाणी विक्रीला सुरूवात केलीय. ग्रामीण भागात बोअर मालक पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांकडे दरमहा २०० रूपयांची मागणी करतात. तर शहरी भागांमध्ये १००० लिटरची टाकी भरून देण्यासाठी २५० रूपयांची आकारणी केली जाते. मात्र, दुष्काळामुळं हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना पाणी विकत घेणं शक्य नसल्यानं त्यांना जीव धोक्यात घालून मिळेल तिथून आणि मिळेल तसं पाणी घेऊन जगावं लागत आहे.

Updated : 6 May 2019 10:29 PM IST
Next Story
Share it
Top