Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : बहिणाबाईंच्या गावाची कहाणी, ३० दिवसांतून एकदा पाणी !

Ground Report : बहिणाबाईंच्या गावाची कहाणी, ३० दिवसांतून एकदा पाणी !

अस्सल गावरान भाषेतील कवितांमधून जीवनाचे तत्वज्ञान मांडणाऱ्या थोर कवयित्री बहिणाबाई यांच्या माहेर असलेल्या गावाची कहाणी....

Ground Report : बहिणाबाईंच्या गावाची कहाणी, ३० दिवसांतून एकदा पाणी !
X

अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर

आधी हाताले चटके, तवा मियते भाकर

जीवनाचे तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत मांडणाऱ्या बहिणाबाई यांच्या कवितांची भुरळ पडली नाही अशी व्यक्ती क्वचितच आढळते...मनाचं वागणं असेल, ग्रामीण जीवनातील संघर्ष असेल, माहेरची ओढ लागलेल्या महिलांच्या मनातील घालमेल असेल...हे सारे भावविश्व बहिणाबाईंनी अस्सल गावरान भाषेत मांडत मराठी साहित्यविश्व समृद्ध केले. आज जळगाव जिल्ह्याची ओळख बहिणाबाईंच्या नावाने आहे. पण बहिणांबाईंचे माहेर असलेल्या आसोदा गावाची कहाणी मात्र वेगळी आहे, म्हणजेच जळगाव शहरापासून फक्त ६ किलोमीटरवर असलेल्या आसोदा गावाला आजही मुलभूत सुविधांची प्रतिक्षा आहे.


पाणी नसल्याने मुलांची लग्न होत नाहीत

बहिणाबाईंचे माहेर असलेल्या या गावात तब्बल 30 दिवसांनी पाणी येते आणि गेल्या ५० वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. अनेक पिढ्या आल्या आणि गेल्या पण इथली पाण्याची समस्या सुटलेली नाही. या गावात आल्यावर प्रत्येक घरासमोर लहान भांड्यांपासून तर पाण्याने भरलेले मोठमोठे ड्रम भरलेले दिसतात. गावातील लोकांना दररोज पाणी विकत घ्यावे लागते आहे. पाण्याची व्यथा मांडताना इथल्या महिलांच्या डोळ्यातल्या पाण्याचा बांध फुटतो..

इथल्या जानकीबाई नावाच्या आजी सांगतात की, " ५० वर्षांपूर्वी लग्न होऊन त्या या गावात आल्या. पण तेव्हापासून पाण्याची समस्या कायम आहे. आजही गावात पाणी नाही येत. २० रुपयांना दररोज पाणी विकत घ्यावे लागते. या गावातल्या मुलांना मुली द्यायला लोक नाही म्हणतात कारण गावात नियमित पाणी नाहीये. एवढंच काय पण या आजींच्या दोन्ही सुनांनी गावातील पाणीटंचाईला वैगातून गाव सोडण्याचा निर्णय़ घेतल्याचेही त्या सांगतात. आम्ही म्हाताऱ्यानी कुठं जायचं, असा सवालही त्या विचारतात. या गावातील एका घरातील ही कहाणी नाही तर आसोदा ह्या गावातील घराघरातील कहाणी झाली आहे. आपल्या व्यथा मांडतांना जानकीबाईंच्या डोळ्यात आपोआप अश्रू तरळतात.

गावातीलच लक्ष्मीबाई म्हणतात की, बहिणाबाईंचे गाव असूनही काहीच फायदा नाही. गावात आल्यापासून पाणीच नाही. प्रत्येक गल्ली आणि गारासमोर फक्त पाण्याच्या बदल्या आणि ड्रम दिसतात. खूप हाल आहेत आमचे असे लक्ष्मीबाई सांगतात. तर शेजारीच राहणाऱ्या कुटुंबात तरुण पती आणि पत्नी हे दोघे अपंग आहेत. मुलं लहान आहेत आणि सासरे म्हातारे आहेत. आम्ही अपंग असल्याने पाणी घेण्यास जाऊ शकत नाही आमचे म्हातारे सासरेच कसं तरी पाणी आणतात हे वास्तव अपंग परिवाराने मांडले.


पाणी पुरवठा विभागाचे म्हणणे काय?

यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रन आसोदा गावातील पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता सुधीर डहाके यांच्याशी संपर्क साधला. मात्र कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला पण ही योजना पूर्ण झाल्याचा दावा मात्र केलाय. गावाला रोज पाणी पुरवठा केला जातो पण ग्रामपंचायत पाणीपट्टी वसूल करत असली तरी ग्रामपंचायतचे नियोजन योग्य नसल्याचा दावा त्यांनी केला.

पाण्याचं नावाने फक्त राजकारण

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक कोणतीही असो पाण्यासाठी मोठमोठी आश्वासने दिली जातात, मात्र गावकऱ्यांना पाणी काही मिळत नाही,0 अशी आसोदा गावाची परिस्थिती आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही पुन्हा तोच पाण्याचा प्रश्न घेऊन गावातील तीन पॅनल समोरासमोर लढले. आता निवडणउका झाल्यानंतर नवीन ग्रामपंचायत सदस्य हेमंत पाटील यांना आम्ही संपर्क साधला तेव्हा आसोदा गावात पाण्याचा प्रश्न खरंच गंभीर आहे पण आता ही समस्या सोडवली जाईल, असे त्य़ांनी सांगितले. सध्या गावात ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागला आहे पण कोणत्याच पॅनलला बहुमत मिळालेले नाही. ग्रामपंचायतीमध्ये त्रिशंकू परिस्थिती आहे. सत्ता कुणाचीही आली तरी गावाची पाण्याची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी इच्छाशक्ती असली तर मार्ग निघू शकणार आहे. 2011-12 ची पाण्याची योजना आहे. मात्र फिल्टर प्लान नव्याने टाकण्यात आला असला तरी कर्मचारी नसल्याने पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. आता पाणी पुरवठ्याचे नियोजन करून कमीतकमी दिवसात पाणी देण्याचं काम ग्रामपंचायतीमार्फत केलं जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.

आसोदा हे गाव जळगाव शहराला लागून आहे. त्यामुळे या गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढली. मात्र पाण्यासाठी लोकसंख्येनुसार भविष्यकालीन योजनेचे नियोजन मात्र झाले नाही. आज जर गावाच्या एका भागात पाणी आलं तर त्याच भागात पुढच्या वेळी तब्बल 30 दिवसांनी पाणी येते. यामुळं लोकांना 30 दिवसांचा पाणीसाठा करून ठेवण शक्य नसते. यामुळं पिण्याच्या पाण्यासाठी मारामारी होते. त्यामुळे इथल्या महिलांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते आहे.

2011-12 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली. मात्र एका बड्या राजकीय नेत्याच्या जवळच्या कंत्राटदाराने काम अपूर्ण ठेवल्याने गावापर्यंत पाणी पोहचले नाही असे गावकरी खासगीत सांगतात., गावातील लोकांनी राजकीय नेत्यांच्या तसेच शासकीय पातळीवर प्रयत्न केले. मात्र राजकीय आणि प्रशासनाची इच्छाशक्ती नसल्यामुळं पाण्याचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. आसोदा पाणीपुरवठा योजनेसाठी 2011-12 मध्ये जलस्वराज योजनेअंतर्गत साडेतीन कोटींची योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र नंतर फिल्टर प्लान नसल्याचे लक्षात आल्यानंतर दीड कोटींचा फिल्टर प्लान बसवण्यात आला, असे एकूण साडेचार कोटी रुपये खर्त करण्यात आले. मात्र सध्या तो प्लांट बंद आहे. यामुळं अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिक सांगतात. पाणी नियमित येत नाही पण पाणीपट्टी मात्र नियमितपणे येते असे इथले गावकरी सांगतात.


नेत्यांच्या कोरड्या भेटी आणि पोकळ आश्वासने

राज्यातील अनेक राजकीय नेते, अधिकारी बहिणाबाईंच्या आसोदा गावाला भेटी देतात. गावातील लोकं नेहमी पाण्याची व्यवस्था करून द्या अशी भाबडी मागणी त्यांच्याकडे करतात. पण फक्त कोरडी आश्वसने मिळतात मात्र पाणी काही मिळत नाही.

सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा खाते आहे. त्यांनी बहिणाबाईंच्या आसोदा गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी इच्छाशक्ती दाखवली तर 50 वर्षांपासून पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या या गावाला मोठा दिलासा मिळू शकेल.

Updated : 21 Jan 2021 8:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top