ऐकावे ते नवलच या गावातील रस्ता चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात दाखल
X
सिनेमामध्ये विहीर चोरीला गेल्याचे आपण पाहिले असेल. शौचालय चोरीला जाण्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील पण नाशिक जिल्ह्यातील टोकडे या गावातील रस्ताच चोरीला गेल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली आहे काय आहे हा धक्कादायक प्रकार वाचा सविस्तर...
या गावातील चोरीला गेलेला रस्ता शोधून देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस.
रस्त्यावर चालणारे वाहन चोरीला गेल्याचे आपण ऐकले असेल. पण नाशिक जिल्ह्यातील् टोकडे या गावात रस्त्यावरील वाहन नव्हे तर रस्ताच चोरीला गेल्याची तक्रार विठोबा द्यानद्यान यांनी मालेगाव पोलीस ठाण्यात केली आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या सरकारी माहितीच्या आधारावरच त्यांनी हा दावा केला आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून टोकडे या गावात अंतर्गत रस्ता मंजूर करण्यात आला होता. त्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली. फेब्रुवारी मार्च दरम्यान हा रस्ता तयार केल्याचे कागदोपत्री दिसून येते. या रस्त्याच्या पूर्णत्वाचे प्रमाणपत्र ( Complition certificate) तयार करण्यात आले. त्यावर उपअभियंते, विभागीय अभियंते, कार्यकारी अभियंते यांच्या सह्या आहेत. या कामाची मोजमाप पुस्तिका भरण्यात आली. देयक अदा केले. परंतु सदर जागेवर हा रस्ताच नसल्याचा आरोप विठोबा द्यानद्यान यांनी केला आहे. पाहूयात ते काय म्हणतायत....
या संदर्भात चोरी झालेला रस्ता शोधून देणाऱ्यास एक लाख रुपये बक्षीस त्यांनी जाहीर केले. या आरोपानंतर आम्ही मालेगाव उप अभियंता सोनवणे यांची याबाबत प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी असा प्रकार घडला नसल्याचे म्हटले आहे. तो रस्ता गावात बनवलेला नसून तो शेतशिवारात बनवलेला असल्याचे त्यांनी सांगितले. ते रस्ता गावात शोधत असून तो रस्ता शिवारात बनवला असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावर विठोबा द्यानद्यान यांना याबाबत विचारणा केली असता अधिकारी खोटे बोलत असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकारी ज्या रस्त्याचा उल्लेख करत आहेत तो गावाबाहेर आहे तसेच तो रस्ता एक किलोमीटर असून चोरीला गेलेला रस्ता दोन किलोमीटर असल्याचे सांगितले. तो रस्ता फक्त मुरूम टाकून बनवलेला असून त्यासाठी सतरा लाख रुपये कसे लागतील असा सवाल केला आहे.
असे रस्ते खाजगी जागेत बनवता येतात का? काय म्हटलंय प्रशासकीय आदेशात ते एकदा पाहूयात.
मंजूर काम हे ज्या जागेत करायचे आहे ती जागा जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीच्या मालकीची असणे अनिवार्य आहे. जागेच्या मालकी हक्काबाबत खात्री केल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात यावी.
मंजूर कामाची जागा ग्रामपंचायतीकडे निर्हीत केली असल्यास सक्षम प्राधिकारी यांची पूर्व परवानगी घेऊनच काम सुरु करावे.....रस्ता चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे. रस्ता चोरीला गेला आहे कि त्याने हळूहळू दुसरीकडे मार्गक्रमण केलेले आहे? मार्गक्रमण करताना त्याची रुंदी लांबी कमी झाली कि ती आणखी कुठल्या वळणाने मार्गक्रमण करत तिने कुणाचा खिसा गाठला हे शोधण्याची जबाबदारी आता पोलिसांची आहे....