Max Maharashtra Impact : वाळीत टाकलेल्या कुटुंबांना न्याय, पोलिसांनी दखल घेऊन मिटवला वाद
X
रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नवघर येथे कोळी समाजातील कुटुंबावर जाती अंतर्गत सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. गेली सात महिने कोळी समाजातील देवेंद्र कोळी व त्यांच्या तीन कुटुंबांवर कोळी गावकमिटीने सामाजिक बहिष्कार टाकला होता. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने हे प्रकरण सर्वांसमोर आणले. त्यानंतर रायगडसह राज्यातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पीडित कुटूंबांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला.
मॅक्समहाराष्ट्रच्या बातमीची दखल प्रशासनानेही घेतली, वाळीत टाकलेले कुटुंब व गावकमिटी यांच्यासमवेत प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी विभा चव्हाण, पेणचे तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल, पांडुरंग पुरुषोत्तम पाटील, संदीप ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. प्रशासनाच्या मध्यस्तीने गाव पंचकमिटीला महत्वपूर्ण व कायदेशीर सूचना देण्यात आल्या. त्यानंतर गावातील तणाव आता निवळला आहे. इते ऐक्य व सलोख्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
पार्श्वभुमी :
दि. 27/04/2021 रोजी हनुमान जयंती निमित्ताने गावात पालखी सोहळा खूप मोठ्या उत्साहात चालू होता, कोरोना प्रादुर्भावामुळे जमावबंदी असल्यामुळे गावात पालखी सोहळा होणार नव्हता परंतु गावातील पंच मंडळीने पालखी मिरवणूक काढली आणि खूप जल्लोशाने मिरवली. सदर पालखी सोहळ्यामध्ये दिवसा गावातील तरुणांची भांडण झाली असताना देखील या पंच मंडळीने रात्री देखील पालखी मिरवणूक काढली आणि त्या मिरवणुकीत अशोक कोळी आणि गावातील एका पंच मंडळी (नरेश ध कोळी) यांच्यात काही वाद घडून आला. सदर वाद सोडविण्यासाठी देवेंद्र मा. कोळी आणि त्यांच्या घरातील गजानन मा. कोळी, दत्तात्रेय भ. कोळी हे गेले होते. त्या नंतर काही वेळाने हा वाद शांत झाला. परंतु थोड्याच वेळाने देवेंद्र कोळी यांना पेण पोलीस ठाणे मधून फोन आला कि देवेंद्र जमावबंदी असताना पण तुमच्या गावात पालखी मिरवणूक होतेय. असं आम्हाला कळलंय. तू तिथेच थांब आम्ही तिथे येतोय.
काही वेळाने पोलीस गावात आले आणि त्यांनी विचारले कि गावात पालखी कोणी काढली, ती पालखी पंच मंडळी यांनीच काढली असं समजताच पोलीस अधिकाऱ्यांनी सदर पंच मंडळी आणि त्या पालखीत झालेली भांडणे यांना त्वरितच गाडीत बसवून पेण पोलीस ठाणे येथे हजर केले. सदर पालखी मिरवणूकीचा कोणताही गुन्हा दाखल न होता फक्त पालखी मध्ये झालेल्या भांडणाचा अदखल पात्र गुन्हा पेण पोलीस ठाणे यांनी घेतला. सदर पालखी सोहळ्या बद्दलची माहिती आम्हीच दिली आणि गावात पोलीस बोलावले असा मनात राग धरून गावातील पंच मंडळी ने दि. 28/04/2021 रोजी सकाळी 9 वाजता गावातील वयोवृद्ध महिला सोबत घेउन गावपंचाच्या बैठकीत सदर कारवाईचा ठपका ठेवून अशोक कोळी, दत्तात्रेय कोळी, गजानन कोळी यांची कोणतीही बाजू ऐकू न घेता या 3 कुटुंबाना वाळीत टाकण्याचे निर्णय पंच मंडळीने घेतले. त्यामध्ये त्यांचे रेशनिंग दुकानातून रेशन कोणी घेऊ नये, यांच्या बोटीत कोणी जाऊ नये, यांच्या टेम्पोत कोणी जाऊ नये, समुद्रात असताना यांना काही अडचण आली तरी मदत कोणी करू नये, यांच्या सुख दुःखात कोणीही सहभागी होऊ नये, यांच्या कडून मच्छी कोणी खरेदी करू नये,यांच्या सोबत कोणी बोलू नये, जर कोणी यांच्या सोबत असे करताना दिसेल त्याला प्रत्येकी 30000 रुपये चा दंड आकरण्यात येईल असा निर्णय सदर बैठकीत आम्हाला सांगण्यात आला असून दि. 06/05/2021 रोजी तशी जाहीर दवंडीचं संपूर्ण नवघर कोळीवाडा गावामध्ये देण्यात आली होती. अशी दवंडी दिली असता देवेंद्र मा. कोळी दि. 7/5/2021 रोजी सदर पंच मंडळीची भेट घेण्यास गेले असता पंच मंडळी यांनी त्यास टाळाटाळ केली असल्याचे देवेंद्र यांनी सांगितले, त्यांच्याशी कोणी चर्चाच केली नाही परंतु त्यांच्या कडे विनंती करीत या वाळीत संदर्भात मला तुमच्यासोबत बोलायचं आहे असं बोलले असता त्यांनी देवेंद्र कोळी यांना आश्वासन दिले कि आज नको उद्या तुला जे काही बोलायचं आहे ते तू बोल असं देवेंद्र यांना पंच मंडळीने आश्वासन दिले.
दि. 8/05/2021 रोजी देवेंद्र कोळी पूर्ण दिवस पंच मंडळीने दिलेल्या आश्वासना नुसार त्यांची वाट पाहत होते, परंतु कोणीही त्यांना दाद दिली नाही. असे त्यांचे म्हणणे आहे. तरीसुद्धा ते दुसऱ्या दिवशी दि.9/05/2021 रोजी पंच मंडळीची वाट पाहून स्वतः गावच्या पाटील यांच्याशी संपर्क साधून पंच मंडळी सोबत बोलायचं होत म्हणून त्यांना सांगितले असता पाटील म्हणाले कि गावपंच मंडळी तुझं ऐकायला तयार नाही असं त्यांनी देवेंद्र यांना सांगितले. शेवटी या 3 वाळीत कुटुंबाची व्यथा कोणाला सांगायची हा प्रश्न त्यांना पडला, म्हणून कोणताच पर्याय शिल्लक राहिला नाही म्हणून त्यांनी सदर वाळीत प्रकरणाचा पहिला तक्रार अर्ज पेण पोलीस ठाणे येथे दाखल केला. त्याची प्रत उपविभागीय अधिकारी पेण, उपविभागीय पोलीस अधिकारी पेण, तहसीलदार पेण, जिल्हाधिकारी अलिबाग रायगड, पोलीस अधीक्षक अलिबाग रायगड यांच्या कडे दिला. सदर अर्ज नुसार पेण पोलीस ठाणे यांनी पंच मंडळी आणि वाळीत कुटुंब यांना बोलावून घेतले असता सदर वाळीत कुटुंबियांना या गावच्या पंच मंडळीने खरंच वाळीत टाकले आहे आणि त्यांच्या बद्दल तशी जाहीर दवंडी देखील दिली आहे, हे सर्वं तिथे सिद्ध झाले होते. असे वाळीत कुटुंबियांचे म्हणणे आहे, त्यानंतर हा वाद आपण गाव पातळीवर मिटवून टाकू असे काही ग्रा. पं. अंतर्गत येणाऱ्या नागरिकांनी या कुटुंबाला सांगितले असता सदर तक्रार दप्तरी दाखल केली. गेली 14 दिवस झाले तरीही या पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा न्याय काही मिळाला नाही. त्यानंतर दि 14/06/2021 रोजी गावच्या गाव पंच मंडळीने देवेंद्र कोळी आणि त्यांचे वडील यांना गावकी मध्ये बोलावून घेतले आणि आमच्या कडून आमचे मोबाईल फोन काढून घेउन जमा केले. आणि गावकमिटी म्हणाली की देवेंद्र तुला यांना मदत करायचे अधिकार कोणी दिले? तू यांना मदत का केलीस? तू यांच्या सोबत का फिरलास? असे प्रश्न उभारून गावपंच मंडळीने देवेंद्र कोळी यास 5000 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला. परंतु देवेंद्र हे ह्या धपटशाही धोरण व मुजोरीखोरीला बळी पडले नाहीत. देवेंद्र कोळी यांनी सदर दंड भरला नाही, म्हणून या लोकांनी वाळीत कुटुंबासोबत देवेंद्र कोळी यांना देखील वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला. अशी व्यथा देवेंद्र कोळी यांनी मॅक्स महाराष्ट्र्र जवळ बोलताना मांडली. तेव्हापासून देवेंद्र कोळी यांच्यासमवेत कोणी बोलत नव्हते, य कोणीही आर्थिक संबंध ठेवत नव्हते, कोणीही कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम आयोजित करायचे नाहीत. अश्या प्रकारचे विविध निर्बंध लादून या कुटुंबावर देखील गावपंच मंडळीने सामाजिक बहिष्कारला हात घातला.असल्याची व्यथा मॅक्समहाराष्ट्र जवळ मांडली
देवेंद्र कोळी म्हणाले, हे वाळीत प्रकरण गेले ७ महिने सुरू असून हे प्रकरण मी अगदी जवळून पाहिले आहे आणि त्याचे चटके सोसले आहेत. त्यामुळे वाळीत प्रकरण काय असते हे मला चांगलेच कळले आहे. आम्हाला न्याय मिळावा याकरिता या सात महिन्यामध्ये आम्ही खूप प्रयत्न केले. आंदोलन केले, प्रशासना बरोबर पत्रव्यवहार केला, बैठका केल्या. यावेळी मॅक्स महाराष्ट्र आमच्या सोबत होता. त्यांच्या बातमीमुळे आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. त्यांच्यामुळे कुठे २२ तारखेला विभागीय अधिकारी तहसीलदार, पोलिस निरीक्षक, प्रांताधिकारी यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी गावातील पंचकमिटी, पाटनोली ग्रामपंचायतीतील काही सदस्य उपस्थित होते.
यावेळी दोन्ही बाजू ऐकून घेण्यात आल्या आणि आमच्यावर लादलेले निर्बंध मागे घेण्यात आले. मॅक्स महाराष्ट्राच्या बातमीमुळे आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. त्यामुळे बरेचसे बदल घडून आले. रेशनिंग दुकान चालू झाले, आता कामगारांचे बोटीवर येणे सुरू झाले. गावातील लोक आमच्याशी संवाद साधू लागले. आज मॅक्स महाराष्ट्र मुळे खरं आमची बातमी समाजात पसरली, पूर्ण राज्यभर पसरली त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून आम्हाला फोन येऊन प्रत्येक जण आमच्या मदतीसाठी धावून आले. त्यामुळे मॅक्समहाराष्ट्राचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो.
मॅक्समहाराष्ट्र्राने हे वृत्त सर्वप्रथम प्रसारित केले, त्यानंतर रायगड कोकणासह सबंध महाराष्ट्र्र भरातून या कुटुंबाला पाठिंबा मिळू लागलाप्रगती देवेंद्र कोळी आम्ही हा सामाजिक बहिष्कार ७ महिन्यापासून सोसलेला आहे . मॅक्स च्या बातमी मुळे तो आता कुठेतरी संपलेला आहे. त्या दिवशी प्रांत यांच्या दालनात जी मीटिंग झाली. यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि डीवायएसपी यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि या दोन्ही बाजूंना समजावलं आणि याच्यापुढे आम्ही एकत्र राहू असे पंच कमिटीने त्यांना आश्वासन दिले आहे. यापुढे गावात एकोपा टिकून राहावा अशी आशा आमची गावाकडे आहे. या प्रकरणात आम्हाला मॅक्समहाराष्ट्र या न्युज चॅनलने खूप मदत केली त्यांनी आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्यांच्या बातमीमुळे विविध पक्षाचे प्रतिनिधी, संस्था आमच्या मदतीसाठी धावून आल्या. मॅक्स मुळे हे शक्य झाले आहे. तेव्हा त्यांचे मनापासून आभार केली.