दोन तालुक्यांना जोडणाऱ्या बंधाऱ्यावरून नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा तालुक्याला जोडणाऱ्या वडापूर - सिद्धपुर बंधाऱ्याची पुराच्या पाण्यामुळे दुरवस्था झाली आहे. पुराच्या पाण्यात बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला असणारा मुरमाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरून महिला,विद्यार्थी,शेतकरी,नागरिक जीव मुठीत घेवून प्रवास करीत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून मागणी करून ही बंधारा दुरूस्त केला जात नाही, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट....
X
सोलापूर जिल्ह्यातून दोन प्रमुख नद्या वाहतात. त्यामध्ये भीमा आणि सिना नद्यांचा समावेश होतो. यातील भीमा नदीला गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने पुरपरस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे या पुराच्या पाण्याचा फटका या नदीकाठी राहणाऱ्या गावकऱ्यांना बसतो. त्यांच्या जनजीवनावर परिणाम होवून पुराच्या पाण्यामुळे अनेक गावचा एकमेकांशी असणारा संपर्क तुटतो. तसेच नदी काठच्या शेतीवर देखील परिणाम होते. पाण्यामुळे नदीकाठची पिके पाण्याखाली जावून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून सरकारकडून नुकसानभरपाई मिळते,पण नुकसानीच्या प्रमाणात तितकेशी मिळत नाही. भीमा नदीला पूर आल्या नंतर अनेक बंधारे पाण्याखाली जात असल्याने पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे बंधाऱ्याला हानी पोहचली जाते. यामध्ये अनेक बंधाऱ्याचे नुकसान ही झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा तालुक्याला जोडणाऱ्या वडापूर - सिद्धपुर बंधाऱ्याची पुराच्या पाण्यामुळे दुरवस्था झाली आहे. पुराच्या पाण्यात बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला असणारा मुरमाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरून महिला,विद्यार्थी,शेतकरी,नागरिक जीव मुठीत घेवून प्रवास करीत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून मागणी करून ही बंधारा दुरूस्त केला जात नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. या बंधाऱ्यावरून नागरिक रात्री-बेरात्री प्रवास करीत असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी पाठबंधारे विभाग घेणार की सार्वजनिक बांधकाम विभाग,असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. वडापुर-सिद्धपुर बंधारा दक्षिण सोलापूर तालुका आणि मंगळवेढा तालुक्याना जोडणारा असल्याने या दोन तालुक्याचा संपर्क बंधाऱ्याची दुरावस्था झाल्याने तुटला आहे. या बंधाऱ्याचा भराव वाहून गेला असतानाही नागरिक बंधाऱ्यावरून धोकादायक प्रवास करीत आहेत. बंधारा लवकर दुरूस्त करून देण्यात यावा,अशी मागणी वडापुर आणि सिध्दपुरच्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसापासून भराव वाहून जातोय
वडापुर गावचे रहिवाशी सिद्धार्थ कांबळे सांगतात,की गेल्या अनेक वर्षापासून बंधाऱ्याच्या कडेने असलेला भराव वाहून जात आहे. येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे याबाबत वारंवार तक्रारी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला खड्डे पडून मोठ-मोठे दगड वर आले आहेत. या पडलेल्या खड्ड्यातून वाट काढत जात असताना वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा तालुक्यातील लोक या बंधाऱ्याच्या शॉर्टकट रस्ता म्हणून करतात उपयोग
दक्षिण सोलापूर तालुक्यातील लोक या बंधाऱ्याच्या उपयोग मंगळवेढा आणि सांगोला तालुक्याला जाण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून उपयोग करतात. तर मंगळवेढा तालुक्यातील लोक सोलापूरला जाण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून या बंधाऱ्याच्या उपयोग करतात. सध्या या बंधाऱ्याची दुरावस्था झाल्याने त्यांना बेगमपुर मार्गे सोलापूरला जावे लागत आहे. या बंधाऱ्यावरचा भराव वाहून गेल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बंधाऱ्याचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावावा,असे वडापुर आणि सिध्दपुर च्या नागरिकांना वाटत आहे.
बँकिंग व्यवहारासाठी नागरिक करतात बंधाऱ्यावरून ये-जा
वडापुर गावची लोकसंख्या अडिज ते तीन हजारांच्या आसपास आहे. या गावातील बँकिंग व्यवहार सिद्धपुर गावावर अवलंबून आहे. या गावात तीन ते चार पतसंस्था आहेत. या पतसंस्था आणि एका सहकारी बँकेत येथील शेतकऱ्याची खाती आहेत. त्यामुळे बँकेतील पैसे काढण्यासाठी शेतकरी आणि नागरिक सिद्धपुर गावात जाण्या-येण्यासाठी या बंधाऱ्याचा उपयोग करतात. वाहतुकीच्या दृष्टीने हा बंधारा अतिशय महत्वाचा मानला जातो. त्याची दुरावस्था झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यार्थी,महिलांची या बंधाऱ्यावरून असते वर्दळ
दक्षिण सोलापूर आणि मंगळवेढा तालुक्यातील नागरिक पै-पाहुण्याच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी या बंधाऱ्याचा उपयोग करतात. सध्या या बंधाऱ्यावरून जात असताना दोन चाकी वाहनधारकाना उतरून जावे लागत आहे. उतरून जात असताना गाडी ढकलत घेवून जावे लागत असून ती घेवून जात असताना वाहनधारकांची मोठी दमछाक होते. पुरुषाबरोबर या बंधाऱ्यावरून महिला ही जातात-येतात. बंधाऱ्यावरून जात असताना त्यांच्या हातात लहान मुले देखील असतात. बंधाऱ्याच्या दुरावस्थेमुळे दुर्दैवाने एखादा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर सोलापूरला जाण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून विद्यार्थी बंधाऱ्याचा उपयोग करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा बंधारा अतिशय महत्वाचा आहे.
शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक ठप्प
वडापुर आणि सिद्धपुर गावचा परिसर हा भीमा नदी काठचा परिसर असल्याने सर्वत्र बागायती क्षेत्र आहे. सोलापूरला शेतातील माल घेवून जाण्यासाठी शेतकरी वर्ग या बंधाऱ्याचा उपयोग करत होते. परंतु भराव वाहून गेल्याने या बंधाऱ्यावरून चार चाकी वाहतूक सध्या बंद आहे. शेतकऱ्यांना बेगमपुर मार्गे आपल्या शेतातील माल सोलापूरला घेवून जावे लागत आहे. बंधाऱ्यावरून चार चाकी वाहतूक बंद असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. यावर तातडीने उपाय काढावा,असे शेतकऱ्यांना वाटत आहे.
बंधाऱ्यावर संरक्षक पाईप बसवण्याची ग्रामस्थांची मागणी
वडापुर - सिद्धपुर या गावच्या दरम्यान भीमा नदीवर असणारा बंधारा वाहतुकीच्या दृष्टीने असुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. या बंधाऱ्यावरून सातत्याने नागरिकांची ये-जा असते. हा बंधारा लांबीला जास्त असून सुमारे 95 दरवाजे आहेत. बंधाऱ्याला संरक्षक पाईप नसल्याने अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या बंधाऱ्याला संरक्षक पाईप बसवण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांना पाहणी करण्यास सांगतो - आमदार सुभाष देशमुख
या बंधाऱ्याच्या दुरावस्थेची माहिती अधिकाऱ्याकडून घेतो. त्यांना बंधाऱ्याची पाहणी करण्यास पाठवतो. नेमका बंधाऱ्याचा भराव वाहून गेला आहे,की बंधाऱ्याला काही झाले आहे का ? हे पाहण्यास सांगतो. यानुसार हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहे,की पाठबंधारे विभागाचे आहे. हे पाहूनच त्यानुसारच पुढील निर्णय घेण्यात येईल,असे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.