तालुक्याला आमदार दोन, पण आमचा पूल बांधणार कोण? मेहकरी गावातील विद्यार्थी आक्रमक
आष्टी तालुक्याला दोन आमदार आहेत. एक विधानसभा आणि विधानपरिषदेचे. परंतू आष्टी तालुक्यातील मेहेकरी गावाकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच या गावाला जोडणारा पूल तुटल्याने नागरिकांची प्रचंड ससेहोलपट सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी तहसिल कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.
X
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला बाळासाहेब आजबे आणि सुरेश धस असे दोन आमदार आहेत. यापैकी बाळासाहेब आजबे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेचे तर भाजपचे सुरेश धस हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. मात्र मेहेकरी गावासह दहा गावांना जोडणारा पूल तुटल्याने नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच नदीच्या पाण्याला ओढ असल्याने मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालक तयार नाहीत. त्यातच नागरिकांनी ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे अखेर मेहेकरी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी आष्टी तहसिल कार्यालयाच्या बाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
पूल नसल्याने दूध व्यावसायिकांना व सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुलांनाही शाळेत जाता येत नाही. त्यामुळे शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी आष्टी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. यामध्ये शालेय विद्यार्थी आक्रमक झाले होते. त्यामुळे अखेर तहसिलदारांनी आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.