जगातील सगळ्यात स्वस्त DATA भारतात, पण भारताला पडतोय महागात !
जगात सर्वात स्वस्त मोबाईल डाटा भारतात उपलब्ध होतो आहे, पण तरीही भारताला तो महाग का पडतो आहे, याचा आढावा घेणारा रिपोर्ट....
X
मोबाईल डाटा हा शब्द माहिती नाही, अशी व्यक्ती सापडणे दुर्मिळ...कारण आता मोबाईल, डाटा हे शब्द आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग झाले आहेत...एक इंटरेस्टिंग डाटा अर्थात माहिती आता समोर आली आहे......जगात सध्या १ जीबी डेटा कोणत्या देशात किती रुपयांना उपलब्ध होतो, कोणत्या देशांमध्ये स्वस्तात तो उपलब्ध होतो आणि कोणत्या देशात हा डेटा महागात पडतो, याची विस्तृत माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार जगात सध्या असलेल्या लोकसंख्येपेक्षा मोबाईल्सची संख्या जास्त आहे. तर आफ्रिकेतील ३ देशांमध्ये १ जीबी डेटा हा किमान २७ डॉलर्सला म्हणजे भारतीय रुपयात जवळपास दोन हजार रुपयांना उपलब्ध होतो आहे. हाच १ जीबी डाटा अमेरिकेत ८ डॉलर्सना उपलब्ध होतो आहे. कॅनडामध्ये १२.५५ डॉलर्सना मिळतो आहे.
आता एक नजर टाकूया जगातील सगळ्यात स्वस्त मोबाईल डेटा मिळणाऱ्या ५ देशांवर....यामध्ये पाचवा क्रमांक आहे तो युक्रेनचा...युक्रेनमध्ये ४६ सेंट्सना १ जीबी डाटा मिळतो, तर इटलीमध्ये ४३ सेंट्सना हा डाटा मिळतो...त्यानंतर कझाकस्तानमध्ये २१ सेंट्स तर इस्त्रायलमध्ये ११ सेंट्सना डाटा उपलब्ध होतो. तर जगात सर्वात कमी किंमतीत १ जीबी डाटा उपलब्ध होतो तो भारतात....भारतात अमेरिकन चलनाच्या तुलनेत बोलायचे तर केवळ ९ सेंट्सना १ जीबी डाटा उपलब्ध होतो आहे. ज्या देशांमध्ये मोबाईल नेटवर्क क्षेत्रात स्पर्धा असते तिथे दर कमी होतात, त्यामुळे भारतात हे दर खूप कमी आहेत.
पण आता या स्वस्त डाटाचा फायदा आहे तसे तोटेही आहेत...गेल्या काही वर्षात मोबाईल हा भारतातील जवळपास प्रत्येकाच्या हातात पोहोचला आहे..पण हा स्वस्त डाटा भारताताला किती महागात पडतो आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण याच स्वस्त डाटामुळे कोणतीही खातरजमा न करता माहिती प्रसारित केली जाते आहे आणि लोकांचा त्यावर विश्वास बसतो आहे. भारताची युद्धात उडी, अमेरिका-भारताचे युद्ध अशा खोट्या बातम्या देणारी ही यु ट्यूब चॅनेल्स सरकारने नुकतीच बंद केली आहेत...पण स्वस्त डाटामुळे गैरसमज पसरवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे अनेक व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत.
आता सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी शस्त्रांस्त्रांची गरज राहिलेली नाही. केवळ या डाटाच्या आधारे सोशल मीडियाचा वापर करुन तेढ निर्माण केली जाते आहे. त्यामुळे जगातील सगळ्यात स्वस्त डाटा वापरत असताना आपल्यावर एक सामाजिक जबाबदारी आहे, याचे भानही ठेवावे लागेल, सोशल मीडियावर आलेले मेसेजेस, व्हिडिओ फॉरवर्ड करताना ते खरे आहेत का, त्यातून अफवा तर पसरणार नाही ना, याचा विचार करुनच ते फॉरवर्ड करा.... देशातील विद्वेषाला स्वस्त डाटा इंधन म्हणून पोषक ठरतोय का? याचा विचार नक्की करा...