पंतप्रधान मोदींसाठी कल्याण झालं चकाचक
X
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या १८ डिसेंबर रोजी कल्याण येथे मेट्रो ट्रेनच्या भूमीपूजनासाठी येत आहेत. त्यामुळे कल्याण शहर, त्यांचे प्रश्न चर्चेत आले आहे. साडे चार वर्षांपूर्वी ज्या वासुदेव बळवन्त फडके मैदानात निवडणुकीची सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली होती, त्याच मैदानात ही सभा होत आहे. यासभेच्या निमित्ताने ज्या रस्त्याने पंतप्रधान जाणार आहेत, ते रस्ते, त्या ठिकाणचा कचरा, रस्त्याच्या दोन्ही बाजूस पांढरे पट्टे, , रस्त्याच्या दुभाजकांना पिवळा-काळा रंग देण्याचे काम गेली ८ दिवस महापालिका, सार्वजनिक बांधकाम खाते, एमएमआरडीए असे सर्वच सरकारी संस्था करीत आहे.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मेट्रो प्रकल्पाचे भूमी पूजन करण्यासाठी येत आहेत त्या प्रकल्पाचा आराखडा अध्याप तयार नाही, ही मेट्रो नेमकी कुठून कशी जाणार, भूमी अधिग्रहण झालेले नाही आणि तरीही भूमी पूजनाचा घाट घालण्यात आला आहे त्यामुळे विरोधकांना चांगलेच फावले आहे
याबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आणि प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रकल्पातील नेमक्या त्रुटीवर बोट ठेवले आहे.
मात्र भाजपचे खासदार कपिल पाटील आणि आमदार नरेंद्र पवार मात्र कल्याणकर नागरिकांसाठी ही सुवर्णमयी भेट पंतप्रधान देत असून कल्याणकारांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे, असा दावा करीत आहेत.
दुसरीकडे शिवसेना पक्षाने संपूर्ण कल्याण डोंबिवली मध्ये हा प्रकल्प आपल्या अथक मेहनतीने झाल्याची बोंबाबोंब करीत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचा हा दौरा मोठ्या चर्चेत तर आहेच त्यामुळे उद्या पंतप्रधान आपल्या भाषणातून काय बोलतात याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे.