Home > Election 2020 > राज्यात पुन्हा आयात उमेदवारांची चलती

राज्यात पुन्हा आयात उमेदवारांची चलती

राज्यात पुन्हा आयात उमेदवारांची चलती
X

सतराव्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला काही जागा मिळतील असे वाटत असताना गेल्या निवडणूकीपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाताहत झाली. दस्तुरखुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला. राहुल गांधी यांनी राज्यात ८ सभा घेऊन मोदींविरोधात वातावरण ढवळून काढलं, तरीही उमेदवारांना विजयाला गवसणी घालणं शक्य झालं नाही. त्याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सभांचा धडाका लावून राज्य पुन्हा भगव्या रंगात रंगवून टाकलं. तर महाराष्ट्रातून प्रथमच जय सिद्धेश्वर स्वामींच्या रूपानं एखादा धर्मगुरू लोकसभेत पाठवण्याचा इतिहासही या निवडणुकीनं घडवला.

राज्यात यंदा पुन्हा पक्षांतर केलेल्या उमेदवारांना मतदारांनी पसंती दर्शवलीय. त्य़ामुळं पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिविशेषाला महत्त्व आल्याचं दिसतंय. राज्यात पक्षांतर केलेल्या आठ उमेदवारांनी विजयाचा झेंडा फडकवलाय यात प्रताप पाटील चिखलीकर, यांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धूळ चारली ते शिवसेनेतून भाजपात दाखल झाले होते. तर शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आलेल्या आ. सुरेश धानोरकर यांनी चंद्रपूरात बाजी मारली. ते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले होते. राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या भारती पवार यांनी दिंडोरीत विजय मिळवलाय. अभिनेते अमोल कोल्हे, शिरूर मंतदारसंघातून जिंकले त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. सर्वांचे लक्ष लागलेल्य़ा लढतीत सुजय विखे पाटील यांनी नगर मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करून विजय मिळवला. तर कॉंग्रेसमधून भाजपात आलेल्या रणजितसिंह निंबाळकर, यांनी माढा राष्ट्रवादीकडून हिसकावून घेतला. कॉंग्रेसमधून भाजपात आणि भाजपातून शेवटच्या क्षणी शिवसेनेत आलेल्या राजेंद्र गावित यांनी पालघरमध्ये आपली मोहोर उठवली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून शिवसेनेच्या शिवबंधनात अडकलेल्या धैर्यशील माने यांनी हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना धूळ चारत मोठा विजय मिळवला.

या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेसला राज्यात केवळ एकच जागा जिंकता आली तीही आयात केलेल्या सुरेश धानोरकर यांची त्यामुळं काँग्रेसला पक्षांतर केलेल्या उमेदवाराकडूनच विजय मिळाला. शिवसेनेचे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे आमदार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांनी ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. इतके असूनही केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि चार वेळेचे खासदार हंसराज अहीर यांचा पराभव करत धानोरकर हे जायंट किलर ठरले.

महाराष्ट्रातील मतदारांनी शेतक-यांच्या कर्जमाफीचा मुद्दा, हमीभावाचा मुद्दा, आत्महत्याग्रस्त शेतक-यांचा प्रश्न, अवैध सावकारी त्यातून येणारी कर्जबाजारी, बेरोजगारी, सिंचनाचे प्रश्न, उद्योगधंद्यांचे वाढीचे प्रश्न, नोटाबंदीत झालेला त्रास आणि जीएसटी हे सर्व मुद्दे बाजूला सारत तात्कालिक राष्ट्रवादाच्या मुद्द्याला पसंती दिल्याचं दिसतंय.

Updated : 24 May 2019 1:33 PM IST
Next Story
Share it
Top