देशातल्या पहिल्या आधारकार्ड धारक महिलेची कहानी
Max Maharashtra | 26 April 2019 9:08 PM IST
X
X
मुंबईपासून ४१६ कि.मी. अंतरावर सातपुडा पर्वतरागांच्या पायथ्याशी नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातलं टेंभली गाव. आजपासून साधारणत दहा वर्षांपुर्वी टेंभली गाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं होतं. त्याच टेंभली गावात सुविधांचा अभाव आहे. मात्र, सगळ्यांनीच या टेंभलीकडे दुर्लक्ष केलंय.
साधारणतः १६०० लोकसवस्तीच्या टेंभली गावात २९ सप्टेंबर २००९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह केंद्र-राज्यातील डझनभर मंत्री, अधिकारी यांच्या उपस्थितीत टेंभलीच्या १० ग्रामस्थांना आधारकार्डचं वितरण करण्यात आलं. त्यात पहिला मान मिळाला तो रजनी सोनवणे यांना. आता रजनी यांच्यासह संपूर्ण गावचे प्रश्न जैसे थे आहेत.
पायाभूत सुविधांचा अभाव...
टेंभली गावात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. गावात सार्वजनिक शौचालय नाही, घरोघरी शौचालयही नाहीत. गावापर्यंत जाण्यासाठी नीट रस्तेही नाहीत. मात्र, गावातील प्रत्येकाकडे आधारकार्ड आहे. या आधारकार्डमुळं दैनंदिन आयुष्यात फरक पडेल असा ग्रामस्थांचा समज होता. मात्र, तसं काहीच झालं नाही. गेल्या १० वर्षांत टेंभलीच्या ग्रामस्थांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही.
तीव्र पाणीटंचाई
टेंभली आणि परिसरात तीव्र पाणीटंचाई आहे. दुष्काळामुळं ग्रामस्थांना रोजगार मिळत नाही. त्यामुळं ग्रामस्थांचा अर्धा दिवस हा पाणी भरण्यातच जातो. टेंभलीच्या पाणीटंचाईकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं दुर्लक्ष केलेलं आहे.
रोजगारासाठी आदिवासींचं स्थलांतर
टेंभलीच्या ग्रामस्थांना रोजगाराचा प्रश्न सतत भेडसावत आहे. जिल्ह्यात दुष्काळ असल्यानं रोजगारासाठी शेजारच्या गुजरात राज्यात इथल्या ग्रामस्थांना स्थलांतरित व्हावं लागतं. मात्र, गुजरातमध्येही रोजगार नसल्यास ग्रामस्थ पुन्हा टेंभलीमध्ये परत येतात. त्यामुळं टेंभलीच्या ग्रामस्थांना रोजगारासाठी सहा महिने टेंभलीत आणि सहा महिने गुजरातमध्ये काढावे लागतात.
सरकारी योजनेत भ्रष्टाचाराची कीड
टेंभली गावात सरकारी योजनेतून काही शौचालयं बांधण्यात आली आहेत. मात्र, या शौचालयात कुणी बसणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी शौचालय योजनेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. अशीच काहीशी परिस्थिती घरकुल योजनेचीही आहे.
साधारणपणे १० वर्षांपुर्वी आधारकार्डमुळं देशाच्या कानाकोप्यात टेंभली गाव पोहोचलं होतं. मात्र, त्यानंतर सर्वांनाच सोयीस्कररित्या टेंभलीचा विसर पडत गेला. सरकारी यंत्रणेचा लवाजमा पाहून टेंभलीचं भविष्य बदलेल असा विश्वास इथल्या ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळं आधारकार्ड काय आहे, त्याचा उपयोग काय हे माहिती नसूनही ग्रामस्थांनी अजूनही तेव्हा मिळालेली आधारकार्ड अजूनही सुटकेस, गाठोड्यात जपून ठेवलेली आहेत. मात्र, दुर्देवानं तेव्हा मिळालेलं आधारकार्ड काही या ग्रामस्थांचा आधार होऊ शकलेलं नाही, हेच वास्तव आहे.
Updated : 26 April 2019 9:08 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire