धनगर आरक्षणासाठी सुप्रिया सुळेंचा लोकसभेत आक्रमक पवित्रा...
X
लोकसभेत धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी केली आहे. २०१४ च्या निवडणुकीपुर्वी सध्याचे मुख्यमंत्री तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, चार वर्ष पूर्ण होऊन देखील महाराष्ट्र सरकारने अद्याप पर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाची शिफारस केंद्राकडे पाठवलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत आक्रमक पवित्रा घेत फडणवीस सरकारला त्यांच्या आश्वासनांची आठवण करुन दिली आहे.
आता २०१९ ची निवडणुक येत असताना सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत धनगर आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करत फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
वंचित धनगर समाजाला आरक्षण द्या…
१९६६ आणि १९७९ साली राज्य सरकारने पाठविलेला प्रस्ताव सरकारकडे आहे.या प्रस्तावाची त्वरित दखल घेऊन धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समाविष्ट करावे. धनगड व धनगर हे दोन्ही जातीसमुदाय एकच असून धनगड समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. पण धनगर समाज यापासून वंचित आहे.
२०१४ च्या निवडणुकीत धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन देत देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाची मतं मिळवली. मात्र, आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर धनगर समाजाच्या मतांसाठी राजकारण सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत आक्रमक पवित्रा घेतल्याने फडणवीस सरकारला सुळे यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.