विद्यार्थ्यांना भर पावसात नदीतून जाण्याची वेळ, जबाबदार कोण?
X
राज्यातील अनेक भागात सध्य़ा पाऊस सुरू आहे, अनेक नद्यांना पूर आला आहे. पण अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यामधील वडाळी देशमुख या गावातील विद्यार्थ्यांना चक्क नदीमधून चालत जात शाळा गाठावी लागते आहे. या गावातील छत्रपती शिवाजीनगर बोर्डी नदीच्या तीरावर वसलेले आहे. पण या भागाचा संपर्क गावापासून तुटलेला आहे. या भागातील लोकांसाठी असलेल्या पर्यायी मार्गाचे काम रखडल्याने विद्यार्थ्यांना नदीमधूनच शाळेत जावे लागते आहे.
इथल्या लोकांना दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या साहित्यासाठीसुद्धा नेहमीच नदी पार करावी लागते. दररोज सकाळी शाळेमध्ये जाण्यासाठी शिवाजीनगर येथील विद्यार्थ्यांना दररोज नदीच्या गुडघ्याभर पाण्यातून प्रवास करावा लागतो. या नदीला पूर आला तर विद्यार्थ्यांना शाळा बुडवावी लागते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर बोर्डी नदीवर पूल बांधावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.