इतभर पोटासाठी ऊसतोड मजूरांचा उन्हातान्हात संघर्ष
उन्हाने अंगाची लाही लाही होत असताना वीतभर पोटासाठी भर उन्हात ऊसतोड मजूरांचा संघर्ष सुरू आहे. घेतलेली उचल फेडण्यासाठी रात्री बेरात्री ऊसाच्या फडात जाऊन ऊस तोडावा लागतो, तसंच उन्हातान्हाचा विचारही न करता ऊस तोडणी करावी लागते. हीच उसतोड मजूरांची व्यथा मांडणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा रिपोर्ट...
X
ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. मात्र यंदा एप्रिल महिना संपत आला तरी अतिरिक्त ऊसाच्या प्रश्नामुळे कारखाने अजूनही सुरू आहेत. तर उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असतानाही ऊसतोड मजूर शेतात राबताना दिसतात. मात्र त्यांना उन्हातान्हात कायम उन्हातान्हात हा संघर्ष करावा लागतो. त्यामुळे या उन्हाचा थेट परिणाम ऊसतोड कामगारांच्या आरोग्यावर होतो.
दररोज पहाटे उठून ऊस तोडणीसाठी मजूरांची लगबग सुरू असते. मात्र यात डबे उशीराने येतात. त्यामुळे जेवणासाठी उशीर होतो. तर कधी रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर आला तरी तो भरून द्यावा लागतो. त्यामुळे या सगळ्याचा मोठा त्रास ऊसतोड कामगारांना होत असल्याचे मत तुकाराम शिंदे या कामगाराने व्यक्त केले आहे.
पुढे बोलताना तुकाराम शिंदे सांगतात की, लेकराबाळांच्या शिक्षणासाठी आणि घेतलेली उचल फेडण्यासाठी रात्री बेरात्री ऊसाच्या फडात कामासाठी जावं लागतं. तसंच ट्रॅक्टर भरून दिला नाही तर मुकादम बोलतात. त्यामुळे त्यांची उचल फिटली नाही तर पुढच्या वर्षी याच पैशात ऊस तोडायला यावं लागतं, असं शिंदे सांगतात.
पहाटे उठून ऊस तोडणीला जावं लागतं मात्र त्यात कितीही त्रास झाला तरी नाईलाजाने ऊस तोडावाच लागतो. तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. त्यामुळे ऊसतोडीला येण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही, अशी भावना ऊसतोड कामगार असलेल्या शिंदे यांनी व्यक्त केली.
कितीही ऊन पडलं तरी कितीही घाम आला तरी आम्हाला ऊन्हात ट्रॅक्टर भरायला जावंच लागतं. तर या गडबडीत आम्ही आमच्या लेकरांना साधा चहासुध्दा करून देऊ शकत नसल्याची खंत ऊसतोड कामगार महिला मनिषा शिंदे व्यक्त करतात.
या जीवाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे अनेकांना ताप येतो, डोकं दुखतं, उलटी होते पण या त्रासातही ट्रॅक्टर भरून द्यावाच लागतो. त्याला पर्याय राहत नाही. नाईलाजामुळे कितीही त्रास झाला तरी आम्हाला हे सगळं सहन करावं लागत असल्याचे मालन बुधनर या ऊसतोड महिला कामगार सांगतात. तर ऊन पडतंय मरणाचं पण ऊस तोडल्याशिवाय भागच आहे का? असा प्रश्न ऊसतोड कामगार व्यक्त करतात.
कामगार दरवर्षी मुकादमाकडून उचल घेतात. त्यामुळे कितीही ऊन पडलं तरी, उष्णता वाढली तरी कारखान्याच्या मजूरापुढे दुसरा पर्याय नसतो. कारण मुकदमाची उचल घेतलेली असते. त्यामुळे कितीही ऊन पडलं तरी ती उचल फेडायची असते. त्यामुळे काम करावे लागते. लेकरं बाळं घरी ठेवून ऊस तोडणीला जावं लागतं, असं विनायक पवार सांगतात.
ऊसतोड मजूरांवर ते शेतकऱ्यांची अडवणूक करून पैसे घेत असल्याचा आरोप केला जातो. मात्र ऐन ऊन्हाळ्यातही आम्ही प्रामाणिकपणे काम करूनही आमच्यावरच कारखान्याच्या नावाने दबाव टाकला जातो. आम्ही कोणाचा एक रुपयाही घेत नाही. तर गावाकडं शेतीतील पीकं अतिवृष्टीत वाहून गेल्यामुळे ऊसतोड करायला यावं लागला. नाहीतर असे आरोप करून घेण्यापेक्षा आम्ही ऊसतोडीला आलो नसतो, अशी उद्विग्न प्रतिक्रीया यावेळी ऊसतोड कामगारांनी व्यक्त केली.
सध्या अतिरीक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आणि दुसरीकडे हंगाम संपण्याची वेळ टळून गेली तरीही ऊसतोड कामगारांची ससेहोलपट मात्र सुरूच आहे. त्यांना ऊन्हाचे चटके खात ऊसतोड करावी लागत असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे.