गोष्ट `ती` चा `तो` झाल्याची
मी जन्माने मुलगी होतो. पण मनाने मुलगाच होते. मुलांप्रमाणेच कपडे, राहणे वागणे अगदी बोलणे सुद्धा. मी मुलाप्रमाणेच रहायचो. पण तरीही मला कुणी आश्र्विनी म्हणून हाक मारली की मला राग यायचा. ही गोष्ट कुटुंबीयांना सांगितली. आणि मला माझी हरवलेली लिंग ओळख मिळाली. कसा झाला आश्र्विनी ते अंश असा प्रवास वाचा सागर गोतपागर यांच्या विशेष रिपोर्ट मधून..
X
"मला मुलाप्रमाणे राहायला आवडत होत. मी केवळ नावाने मुलगी होतो. कुटुंबीय मला मुलगी मानायचे. समाज मला मुलगी मानायचा. पण मनाने मी मुलगी नव्हतोच. मुलगी असण्याच्या भावनाच माझ्या मनात नव्हत्या. मी मनातून मुलगाच होतो. मुलाचेच कपडे घालत होतो. आईची घरकामात मदतीची अपेक्षा असायची. पण मी कधीच घरकाम करत नव्हतो. आई पेक्षा वडिलांशी माझी जास्त जवळीक होती. वडिलांचे दुकानातील काम बिनदास्तपणे करायचो. गावात वडिलांचे किराणा दुकान आहे. अगदी कराडमधून बाईकवरून केवळ डोक दिसेल इतका मालाचा गठ्ठा मी आणत होतो. माझ वागणं बोलणं चालणं सर्व काही मुलाप्रमाणेच होत.
मुलाप्रमाणे वागूनही कुणी आश्विनी म्हणून हाक मारली कि मला आतून संताप यायचा. मी मुलासारखे वागतो बोलतो तरीही मला सार्वजनिक जीवनात मुलगी म्हणूनच वागवले जात होते. यामुळे माझी घुसमट होत होती. जवळच्या एक दोन मैत्रिणी सोडल्या तर हे सत्य मी कुणालाही सांगू शकलो नव्हतो. यामुळे मी घरी राहण्यापेक्षा बाहेर जास्त रमायचो. हि गोष्ट घरच्यांना सांगायची कशी? लोकांना सांगायची कशी ? या प्रश्नाने मी अस्वस्थ होत होतो". लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया केलेल्या अंश ची हि प्रतिक्रिया आहे. अंश सांगली जिल्ह्यातील तोंडोली या गावात राहतो. अंश केवळ जन्माने मुलगी होता. समाज त्याला मुलगी मानत होता. पण मुलगी असण्याच्या भावनाच त्याच्या मनात नव्हत्या. हि गोष्ट जवळच्या मित्रांशिवाय कुणालाही तो सांगू शकलेला नव्हता. पण हि गोष्ट कुटुंबियाना सांगण्याची वेळ आलीच.
अंश ची आई शोभा खलिपे सांगते,"आई म्हणून माझी नेहमी अपेक्षा असायची कि माझ्या मुलीने मला माझ्या घरकामात मदत करावी. पण घरात पडलेल्या कामाला ओलांडून ती पुढे जायची. पण त्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती. या उलट वडिलाना कामात मदत करायची. दुकानातील सामान गाडीवरून आणण्याचे काम स्वतः करायची. जस तिला कळायला लागल तेंव्हापासून कधीही मुलीचे कपडे घातले नाहीत. घरात मुलींची समजली जाणारी कामे केली नाहीत. स्कूल युनिफॉर्म सोडला तर तिने कधीही मुलींची कपडे घातले नाहीत. आम्ही यामध्ये तिला कधीही विरोध केला नव्हता. नातेवाईक तसेच इतर लोक आम्हाला तिच्या लग्नाबाबत विचारणा करू लागले होते. तेंव्हा तिचे लग्न करावे असा विचार आमच्या मनात आला. लॉकडाऊन काळात कॉलेज बंद असल्याने ती घरी राहायला आली. आम्ही लग्नाचा विषय तिच्यासमोर काढायला सुरवात केली. तुझ वय होत आहे आम्ही तुझ्या लग्नाचा विचार करत आहोत असे स्पष्टपणे कुटुंबीयांनी त्याला सांगितले".
आजपर्यंत लपवून ठेवलेले सत्य जर सांगितले नाही तर आई वडील ज्या मुलाशी माझे लग्न ठरवतील. त्या मुलाचा काहीही दोष नसताना त्याचे आयुष्य उध्वस्थ होईल तसेच मलाही पुढच्या काळात मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. असा विचार करून अंश ने पहिल्यांदाच आई वडिलांना हि गोष्ट सांगायचं ठरवलं. " मला तुम्ही सर्वजन मुलगी समजता पण तशा भावनाच माझ्या मनात नाहीत. एका मुलासोबत मी आयुष्य काढू शकत नाही." असे स्पष्टपणे सांगत अंश ने अनेक वर्षे लपवून ठेवलेली हि गोष्ट आई वडिलाना सांगितली. यानंतर लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेविषयी देखील त्याने कुटुंबियांना सांगितले.
अस काही असू शकत हेच माहीत नसलेल्या वडिलांचा सुरवातीला संताप झाला. ते अस्वस्थ झाले. परंतु त्यांनी आपल्या मुलाच्या भावना समजून घेतल्या. सोलापूर येथील लिंग परिवर्तन केलेल्या ललित साळवे यांची भेट घेण्यासाठी हे कुटुंबीय सोलापूर येथे गेले. त्यांची भेट घेतली. चर्चा केली. त्यांच्याकडून याबाबत जाणून घेतले. अंश चे वडील श्रीकांत खलिपे सांगतात " माझ माझ्या मुलीवर खूप प्रेम आहे. याविषयी आम्हाला लहानपणापासून माहीतच नव्हत. तिला मुलासारख राहायला आवडत याला आम्ही कधीही विरोध केलेला नव्हता. आमच्या पुढे किरण बेदी असायच्या. त्यांच राहणीमान असायचं. पण जेंव्हा हि गोष्ट कळली तेंव्हा सुरवातीला संताप झाला. पण आम्ही हा प्रकार समजून घेतला. इंटरनेट वरून माहिती घेतली. लिंग परिवर्तन केलेल्या ललित साळवे यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला समजावून सांगितले आणि आम्ही लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करण्याच्या अंश च्या निर्णयाला पाठींबा दिला. त्याची लहानपणापासून होत असलेल्या घुसमटीतून झालेली मुक्तता याचे आज मला समाधान आहे. हे झाले नसते तर आज तो आमच्यापासून कुटुंबापासून दुरावला असता. पोटचे मूल दुरावत असेल तर आपण करत असलेले कष्ट मिळवलेली संपत्ती हि काय कामाची ? असा सवाल देखील ते उपस्थित करतात.
या शस्त्रक्रियेनंतर तिची आई देखील समाधानी आहे. त्यांना आपल्या मुलाची हरवलेली ओळख मिळाल्याचा आनंद आहेच पण आता रक्षाबंधन दिवशी मुलाला राखी बांधायला तसेच उतारवयात काळजी घ्यायला मुलगी नाही याची खंत देखील वाटते. पण याही पेक्षा मोठा आनंद त्यांना त्यांच्या मुलाची यातून सुटका झाल्याचा आहे.
अंश ची लिंग परिवर्तनाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया डॉ भीमसिंग नंदा यांनी गंगाराम हॉस्पिटल, करोल बाग, दिल्ली येथे केलेली आहे. याबाबत या प्रश्नांच्या अभ्यासक असलेल्या मुक्ती साधना सांगतात "ट्रान्सजेन्डर असणे, मुलीच्या जन्माला येऊन पुरुष आहोत अशा भावना असणे हे स्त्री किंवा पुरुष असण्याइतकेच नैसर्गिक आणि सामान्य आहे. परंतु लिंगबदल शस्त्रक्रिया ही तशी सामान्य, सहज करून घेतली जाणारी शास्त्रक्रिया नाही.
कळत्या वयापासून चुकीच्या, आपलं नसलेल्या शरीरात बंद झाल्याची भावना स्वतःच्या कुटुंबापासून लपवून आपल्या आजूबाजूला अशा व्यक्ती प्रचंड घुसमटत जगत असतात. त्या घुसमटीमुळे ऐन वाढीच्या वयात त्यांचे आयुष्य प्रचंड भीती, भावनिक गुंते, त्रास, मानसिक आजाराने ग्रासले जाते.
आपण मनाने स्त्री नाही, फक्त स्त्रीचं शरीर मिळालंय म्हणून स्त्रीसुलभ वागणे, समाजमान्य स्त्रियांचा पेहराव करणे पुरुषासोबत लैंगिक संबंध ठेवणे नैसर्गिकरित्या शक्य होतं नाही. स्त्रीचे शरीर घेऊन पुरुष म्हणून बिनधास्त जगल्यास कौटुंबिक, सामाजिक बोलणी, चेष्टा, चर्चा, छळ या सगळ्यातून कुटुंब व त्या व्यक्तीला जावे लागते. जगभर अनेक व्यक्तींना आपलं सत्य जगासमोर मांडल्याने जीवही गमवावा लागलाय. रोजच्या मरणापेक्षा अनेकजण कुटुंबापासून लांब स्वतःसारख्या लोकांसोबत म्हणजेच तृतीयपंथी समूहासोबत राहणे सुरक्षित समजतात. लिंगबदल शस्त्रक्रीयेची सुविधा, त्यासाठीची औषधे ही आपल्या देशात, सर्व राज्यांमध्ये सहज उपलब्ध होऊ लागली आहेत हे खूपच चांगले झाले आहे. नको असलेल्या शरीरात अडकलेल्या ह्या समाजाच्या महत्वाच्या घटकासाठी लिंगबदल शास्त्रक्रियेची सुविधा हि पिंजऱ्यातून मुक्त होण्याची चावीच आहे.
लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर इतर शस्त्रक्रियांप्रमाणे काही महिन्यात व्यक्ती सुदृढ होते. शारीरिक किंवा हार्मोन्स च्या बदलानंतर हि ह्या व्यक्ती इतरांप्रमाणेच रोजच्या सर्व क्रिया करू शकतात. किंबहुना ह्या व्यक्ती मानसिक त्रासातून मुक्त शांत आणि आनंदी जगू लागतात. त्यांचे जगणे आधीपेक्षा सुलभ होते. अंश च्या कुटुंबाने खूप मोठा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. त्यांचे करावे तितके अभिनंदन कमीच आहे. लिंगबदल शास्त्रक्रिया घरापासून लांब जाऊन पैसे कमावून, मानसिक त्रासातून जात कोणाची सोबत नसतानाचं करत असल्याचे चित्र सगळीकडे दिसते.
अश्या कट्टरतावादी सामाजिक परिस्थितीत समाज, नातेवाईक किंवा कोणाचीही पर्वा न करता माध्यमवर्गीय महाराष्ट्रातील कुटुंबाकडून घेतले गेलेले आपल्या मुलाच्या सोबत उभे राहण्याचे, त्याला संपूर्ण साथ देण्याचे हे पाऊल इतर अनेक कुटुंबाना प्रेरित करणारे आहे आणि समाजाचे डोळे उघडणारे, समजबदलास कारक ठरणारे आहे".
या शस्त्रक्रियेने मी मुलगी नसतानाही मुलगी म्हणून लादलेल्या पिंजऱ्यातून मुक्त झालो असल्याची भावना अंश व्यक्त करतो. या कालखंडात अंश च्या आई वडिलांनी दाखवलेले धैर्य दिलेला पाठींबा याशिवाय हि गोष्टच शक्य झाली नसती. अंशच्या कुटुंबीयांनी केवळ या शस्त्रक्रियेलाच पाठींबा दिला नाही तर मुलगा म्हणून अंश चा स्वीकार केला आहे. त्याचा मोठा भाऊ अमरदीप चे लहान बाळ त्याच्या बोबड्या बोलीत अंश ला आत्या आत्या अशी हाक मारायचे. घरच्यांनी त्याला "आत्या नाही म्हणायचं काका म्हणायचं" अस शिकवायला सुरवात केली. तरी ते बाळ " काका नाही म्हणायचं आत्याच म्हणायचं" अशी प्रतिक्रिया द्यायचं.
यानंतर संपूर्ण कुटुंबानेच त्याला काका म्हणायला सुरवात केली. आत्ता ते बाळ अंश ला हळू हळू काका म्हणू लागलय. कुटुंबियाना सोबत घेत हे परिवर्तन अंश ने घडवून आणल आहे. या सर्वांच्या प्रयत्नाने अंश ची हरवलेली ओळख त्याला पुन्हा मिळाली आहे. आता हि गोष्ट सर्वांपर्यंत पोहचत आहे. आता अंश ला आश्विनी म्हणून कुणी हाक मारणार नाही. किंवा नातेवाईक चर्चा करतील म्हणून दूर उठून जावे लागणार नाही. कारण आश्विनिचा आता अंश झालाय.