Home > मॅक्स रिपोर्ट > जुन्यातून सोनं.. सोलापुरात होतेय पुस्तकांची लाखोंची उलाढाल

जुन्यातून सोनं.. सोलापुरात होतेय पुस्तकांची लाखोंची उलाढाल

जुनं ते सोनं अशी मराठीत एक म्हण आहे.. आधुनिक युगात नव्याची नवलाई असताना सोलापूर मध्ये आजही जुन्या पुस्तकांचा बाजार लाखोंची उलाढाल करत आहे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट..

जुन्यातून सोनं.. सोलापुरात होतेय पुस्तकांची लाखोंची उलाढाल
X

पुस्तकांच्या खरेदी विक्रीसाठी पुण्यातील आप्पा बळवंत चौक प्रसिद्ध असून येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी पुस्तके खरेदीसाठी जातात. येथे नव्या आणि जुन्या पुस्तकांची विक्री होते. त्याच धर्तीवर सोलापुरातील नवी पेठेत जुन्या पुस्तकांचा बाजार पहायला मिळतो. या बाजारात सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील मुले पुस्तके खरेदीसाठी येतात. येथे जुनी पुस्तके निम्म्या किंमतीने विकली असून वीस रुपये किंमतीच्या पुस्तकांपासून ते दहा हजार रुपये किंमती पर्यंतची पुस्तके येथे विकली जातात. एक हजार रुपयांचे पुस्तक असल्यास सहाशे ते सातशे रुपयाला मिळते. त्यामुळेच ज्या गरीब विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके खरेदी करणे शक्य होत नाही. ते याठिकाणी येवून पुस्तके खरेदी करून आपले शिक्षण पूर्ण करतात. गरीब विद्यार्थ्यांबरोबरच मध्यमवर्गीय विद्यार्थी ही या ठिकाणी पुस्तके खरेदीसाठी येतात. याठिकाणी पहिलीच्या पुस्तकांपासून ते मेडिकलच्या पुस्तकापर्यंत सर्व प्रकारची पुस्तके निम्म्या किंमतीने विकली जातात. याच पुस्तकांच्या खरेदी विक्रीतून वर्षाकाठी 50 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती जुनी पुस्तक विक्रेते चरणसिंग ठाकूर यांनी दिली.

पुस्तके ही ज्ञानाची भंडारे

पुस्तके ही ज्ञानाची भंडारे समजली जातात. याच पुस्तकांच्या जीवावर मनुष्याचे जीवनच बदलून जाते. व्यक्तीच्या जीवनाला एक प्रकारचा आकार प्राप्त होते. अज्ञातातून त्याची वाटचाल पुस्तकाच्या सहाय्याने प्रकाशाकडे सुरू होते. पुस्तकामधून व्यक्ती नवनवीन गोष्टी शिकतो. नवनवीन आयडिया शेअर करतो. जगातील चांगल्या वाईट गोष्टींची त्याला जाणीव होते. इतिहास त्याला पुस्तकांच्या रूपाने समजून घेता येतो. पुस्तके ही माणसांची मित्र असल्याचे सांगितले जाते. पुस्तकांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथे राजगृह नावाचे घर बांधले होते. त्यात जवळपास 50 हजार पुस्तके होती,असे सांगितले जाते. याच पुस्तकांच्या सहाय्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे भवितव्यच बदलून टाकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहून भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश अशी ओळख मिळवून दिली. म्हणूनच शिक्षणाचे महत्व पटवून देताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,की ' शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,तो जो प्राशन करेल तो गुर्गुरल्या शिवाय राहणार नाही ' याच पुस्तकांनी जगाचा हजारो वर्षांचा इतिहास जपून ठेवला आहे. म्हणूनच मानवाच्या जीवनात पुस्तकांना अनन्यसाधारण महत्व आहे.

नवी पेठेत पुस्तके खरेदीसाठी विद्यार्थ्यांची होते गर्दी

सोलापुरातील नवी पेठेत जुन्या पुस्तकांचा बाजार एस्टी स्टँड पासून जवळच असल्यामुळे याठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी पुस्तके खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. येथे शालेय अभ्यासक्रमाची सर्व इयत्तेची,महाविद्यालयीन शिक्षणाची पुस्तके आणि सर्व शाखेच्या पुस्तकांसह इंजिनिअरिंग,मेडिकल,पदवी, पदविका,एमपीएससी,यूपीएसस, नेट,जेईई,बीएड,डीएड, शेतीविषयक पदवी,कायदेविषयक पदवी,सीए,विविध प्रकारच्या डिक्शनरी,कथा,कादंबरी यांची पुस्तके या ठिकाणी विक्रीसाठी आहेत. वर्षाकाठी याठिकाणी बारा लाख पुस्तकांची विक्री होत असल्याचे येथील पुस्तक विक्रेते सांगतात. पहिली ते मेडिकल पर्यंतचे,स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी या ठिकाणावरून पुस्तके खरेदी करून अभ्यास करतात आणि यश संपादन करतात. हलाखीच्या परस्थितीतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची याठिकाणी पुस्तके खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे दिसते.

नवी पेठेत मागील 50 वर्षापासून जुन्या पुस्तकांची चालते खरेदी विक्री

विद्यार्थ्यांना जुनी पुस्तके उपलब्ध करून देणारा हा बाजार मागील 50 वर्षापासून नवी पेठेत सुरू आहे. याठिकाणी बारा ते पंधरा जुन्या पुस्तकांचे स्टॉल आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके खरेदी करून तीच पुस्तके परत त्यांच्या स्थितीनुसार विद्यार्थ्याना विकली जातात. शिकण्याची अफाट जिद्द असलेले विद्यार्थी, पार्ट टाईम जॉब करणारे विद्यार्थी,आर्थिक दुर्बल असणारे विद्यार्थी आणि आपले करिअर सुरळीत व्हावे यासाठी धडपडणारे विद्यार्थी या ठिकाणी पुस्तके खरेदीसाठी येतात. शालेय अभ्यासक्रमातून सिल्याबस बाद झाल्यास या जुन्या पुस्तक विक्रेत्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो.

राहिलेली पुस्तके त्यांना रद्दीला विकावी लागतात. त्यातून त्यांना कमी प्रमाणात पैसे मिळतात. पण ती पुस्तके ठेवूनही काही उपयोग नाही. असे या पुस्तक विक्रेत्यांचे म्हणणे आहे विद्यार्थ्यांकडून पुस्तके विकत घेताना त्याची पाने व्यवस्थित आहेत,की नाहीत याची खातरजमा केली जाते. नसेल तर ती पुस्तके दुरुस्त करून परत विक्रीसाठी ठेवली जातात. या पुस्तकांच्या विक्रीतून महिन्याकाठी 20 ते 25 हजार रुपये मिळतात. जून ते ऑगस्ट महिन्यात विद्यार्थ्यांची पुस्तके खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यानंतर इतर वेळी कमी प्रमाणात गर्दी असते,असे पुस्तक विक्रेत्यांनी बोलताना सांगितले.

जुन्या पुस्तकांच्या विक्रीतून वर्षाकाठी 50 लाख रुपयांची होते उलाढाल

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना पुस्तक विक्रेते चरणसिंग ठाकूर यांनी सांगितले,की याठिकाणी शाळा,कॉलेज,स्पर्धा परीक्षा,मेडिकलच्या विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची पुस्तके विकली जातात. या ठिकाणी गोर गरीब विद्यार्थ्यांची पुस्तक खरेदीसाठी गर्दी असते. विद्यार्थ्यांकडून पुस्तके खरेदी करत असताना 50 टक्के किंमतीच्या दराने विकत घेतली जातात. जर पुस्तके खराब असल्यास 40 टक्के दराने खरेदी केली जातात. परत तीच पुस्तके विद्यार्थ्याना 60 टक्के किंमतीच्या दराने विकतो. जी पुस्तकं विद्यार्थ्याना दुकानात एक हजार रुपयाला मिळते ते आमच्याकडे सहाशे ते सातशे रुपयांच्या विकले जाते. त्यामुळे याठिकाणी पुस्तके खरेदीसाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. जुन्या पुस्तकांच्या विक्रीतून वर्षाकाठी या ठिकाणी 40 ते 50 लाख रुपयांची उलाढाल होते. लॉक डाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणामुळे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले. आता काहीशी स्थिती बदलली असून पुस्तकांची खरेदी विक्री वाढली आहे. लॉक डाऊनच्या काळात बरीच पुस्तके रद्दीला दहा रुपये किलोने विकली.


Updated : 19 July 2022 7:50 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top