1930 साली पारतंत्र्यात सोलापूर शहराने उपभोगले होते चार दिवस स्वातंत्र्य
X
सोलापूर : देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमोहोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबवला जात आहे. यानिमित्ताने सोलापूर शहराचा स्वातंत्र्याचा क्रांतिकारी इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या 1930 साली सोलापूर शहराने चार दिवस स्वातंत्र्य उपभोगले होते. 9,10,11 आणि 12 मे 1930 रोजी सोलापूर शहरात एकही इंग्रज अधिकारी नव्हता. क्रांतिकारकांच्या आंदोलनामुळे इंग्रज अधिकारी शहर सोडून गेले होते. याच दरम्यान सोलापूर शहराचा कारभार सोलापूर शहरातील जेष्ठ स्वातंत्र्य सेनांनीनी पाहिला होता. ही देशातील एकमेव घटना होती.
1930 साली सविनय कायदे भंगाची चळवळ देशभरात सुरू झाली होती. याचे पडसाद सोलापूर शहरात ही उमटू लागले होते. याच दरम्यान महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा सुरु केली होती. दरम्यान, महात्मा गांधी यांना अटक करण्यात आली. याचे तीव्र पडसाद सोलापूर शहरात उमटले. क्रांतिकारकांनी आंदोलने अधिक तीव्र केली होती. शहरातील रुपा भवानी मंदिर परिसरात असणारी शिंदीची झाडे आंदोलकांनी तोडण्यास सुरुवात केली. या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर नाइट यांनी येवून अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे क्रांतिकारक अधिकच आक्रमक झाले होते. याच दरम्यान कलेक्टर नाइट यांच्या दिशेने एक युवक हातात तिरंगा झेंडा घेवून धावत येत होता.
या युवकावर इंग्रज अधिकाऱ्यांनी अमानुषपणे गोळीबार केला. यामध्ये शंकर शिवदारे क्रांतिकारक युवक ठार झाला. या युवकाचे बलिदान सोलापूर शहरातील पहिले बलिदान होते. स्वतंत्र लढ्यातील तो शहरातील पहिला हुतात्मा ठरला. या घटनेमुळे जमाव अधिकच आक्रमक झाला आणि त्यांनी शेजारीच असणाऱ्या मंगळवार बाजाराशेजारील मंगळवार पेठ पोलिस चौकी जाळली. यामध्ये दोन पोलिस कर्मचारी मृत्युमुखी पडले. आक्रमक आंदोलकांचा जमा पुढे गोल चावडी कोर्टाकडे वळाला त्या ठिकाणी आंदोलकांनी गोल चावडी कोर्टातील कागदपत्रे पेटवून दिली.
शहरातील आंदोलन अधिक तीव्र झाल्याने इंग्रज अधिकारी शहर सोडून पळून गेले होते. शहरातील सबंधित इंग्रज अधिकाऱ्यांनी मुंबई येथील इंग्रज अधिकाऱ्यांना कळवून सोलापूर शहरात इंग्रज सैनिक बोलावण्यात आले. 13 मे 1930 रोजी सोलापूर शहरात ब्रिटिश लष्करी कायदा ' मार्शल लॉ ' लागू करण्यात आला. दरम्यान, शहरातील नगर पालिकेच्या इमारतीवर तब्बल सव्वा महिना तिरंगा झेंडा फडकत होता. अशी माहिती सोलापूरातील अभ्यासक, संपादक किरण बनसोडे यांनी दिली.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सोलापूर शहराचे महत्वपूर्ण योगदान
भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी देशभरातून अनेक आंदोलने झाली. अनेक क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनांनिनी,महापुरुषांनी स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात हौतात्म्य पत्करले. या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांचे मोठे योगदान आहे. सोलापूरच्या भूमीत लढल्या गेलेला स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. स्वातंत्र्याच्या पूर्व काळात मे 1930 चा काळ सोलापूरकरांसाठी क्रांतिकारी असाच ठरला. 1930 साली महात्मा गांधी यांनी सविनय कायदे भंगची चळवळ सुरू केली. या चळवळीला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत होता. याच दरम्यान महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा सुरू केली. या काळात सोलापूर शहरातील क्रांतिकारकांनी सविनय कायदेभंग चळवळीच्या अनुषंगाने सोलापुरातील स्वातंत्र्य सेनानी यामध्ये भाग घेतला होता. महात्मा गांधींच्या आवाहनाला सोलापूरातत चांगला प्रतिसाद मिळाला होता.
रुपा भवानी मंदिर परिसरातील शिंदीची झाडे आंदोलकांनी तोडली
4 मे 1930 रोजी सविनय कायदे भंगाच्या चळवळीचा प्रभाव कमी करण्यासाठी ब्रिटिशांनी महात्मा गांधी यांना अटक केली. याची बातमी साधारण 5 मे 1930 रोजी सोलापूर शहरात पोहचली. महात्मा गांधी यांच्या अटकेची बातमी सोलापूर शहरात वाऱ्या सारखी पसरली. त्यावेळी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामकृष्ण जाजू होते. त्यांनी याबाबतची अधिकृत माहिती सोलापूर शहरवासीयांना दिली. महात्मा गांधींना अटक झाल्याने सोलापूर शहरातील नागरिकांत मोठा असंतोष निर्माण झाला होता. सविनय कायदे भंगाची चळवळ सोलापूर शहरातील नागरिकांनी मोठ्या आक्रमकपणे राबवली. महात्मा गांधीच्या अटकेचा निषेध करताना स्वातंत्र्य प्राप्तीचा हा लढा सोलापूर शहरवाशियानी मोठ्या हिमतीने लढविला. त्याच दरम्यान आंदोलकांनी हरताळ, मोर्चे काढले. तसेच सोलापूर शहरातील रुपा भवानी मंदिर परिसरातील शिंदीची झाडे तोडली. या घटनेची माहिती मिळताच तत्कालीन कलेक्टर नाइट हे रुपा भवानी मंदिर परिसरात दाखल झाले. त्यांच्या समवेत पोलिसांचा मोठा फौजफाटा होता.
याच दरम्यान नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना पोलिसांनी सोडावे अशी मागणी सर्वांनी केली. इंग्रजांच्या विरुद्ध संतापाची लाट उफाळून आली असतानाच त्यामध्ये कलेक्टर नाइट यांनी आंदोलकांना सोडण्यास नकार दिला. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले. याच दरम्यान स्वातंत्र्य सेनानी मल्लप्पा धनशेट्टी यांनीही आग्रहाने आंदोलकांची सुटका करण्याची मागणी केली. परंतु कलेक्टर नाइट यांनी त्यास नकार दिला. या दरम्यान कलेक्टर नाइट यांच्या दिशेने एक युवक हातात तिरंगा ध्वज घेऊन येत होता. त्याच क्षणी त्या युवकावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये तो युवक धारातिर्थी पडला. या युवकाचे नाव शंकर शिवदारे होते. तो सोलापूर शहराचा पहिला हुतात्मा ठरला.
आंदोलकांनी मंगळवार पेठ पोलिस चौकी आणि गोल चावडी कोर्टाला लावली आग
ब्रिटिशांच्या गोळीबारात शंकर शिवदारे धारातिर्थी पडल्याने आंदोलक अधिकच आक्रमक झाले.संतप्त जमावाने आगेकूच करत शेजारीच असलेली मंगळवार पेठेतील पोलिस चौकीला आग लावली. यामध्ये दोन पोलिस मृत्युमुखी पडले. त्यानंतर आंदोलक एवढ्यावरच न थांबता त्यांनी आगेकूच करत गोल चावडी कोर्टाकडे धाव घेतली. त्याठिकाणी आंदोलकांनी ही चावडी जाळली. या कोर्टातील सर्व कागदपत्रे जळाली. त्यावेळी आंदोलक अधिकच आक्रमक झाले होते.
आंदोलक अधिक आक्रमक झाल्याचा संदेश इंग्रज अधिकाऱ्यांनी मुंबई येथील ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळविला. बरेच इंग्रज अधिकारी सोलापूर शहर सोडून पळून गेले होते. यावेळी इंग्रज अधिकाऱ्यांनी आंदोलकांवर अमानुषपणे गोळीबार केला. यामध्ये 103 फायरी झाडण्यात आल्या होत्या. यात अनेकांनी हौतात्म्य पत्करले होते. असा हा क्रांतिकारी लढा त्यावेळी आंदोलकांनी लढला होता.
पारतंत्र्यातही सोलापूर शहराने उपभोगले होते स्वातंत्र्य
6 ते 8 मे 1930 च्या दरम्यान हरताळ,संप यासह अनेक आंदोलने तीव्र झाली होती. याच दरम्यान अनेक ब्रिटिश अधिकारी सोलापूर शहर सोडून गेले होते. याच दरम्यान दिनांक 9,10,11 आणि 12 मे 1930 रोजी सोलापूर शहराने 4 दिवस पारतंत्र्यातही स्वातंत्र्य उपभोगले होते. ही देशातील पहिलीच क्रांतिकारी घटना होती. या चार दिवसाच्या कालावधीत सोलापूर शहराचा कारभार शहरवाशियानी पाहिला होता. सोलापूरच्या जनतेने या जगाला आणि ब्रिटिशांच्या साम्राज्याला असा संदेश दिला,की आम्ही स्वतंत्र कारभार पाहू शकतो. ही घटना सोलापूरवासियांच्या दृष्टीने निश्चितच उर्जादायी आणि अभिमानास्पद होती.
ब्रिटिशांनी देशात पहिल्यादा लष्करी कायदा सोलापूर शहरात लागू केला
सोलापूर शहरातील ब्रिटिश अधिकारी,पोलिस शहर सोडून गेल्यानंतर शहरात ब्रिटिश सैनिक पाठवण्यात आले. ब्रिटिशांनी सोलापूर शहरात देशात कोठेही लागू न केलेला लष्करी कायदा म्हणजेच मार्शल लॉ लागू केला. याच दरम्यान सोलापूर शहरातील नगर पालिकेच्या इमारतीवर तब्बल सव्वा महिना तिरंगा झेंडा फडकत होता. ही बाब ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. 13 मे 1930 रोजी तत्कालीन नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी फर्मान सोडले,की या नगर पालिकेच्या इमारतीवरील तिरंगा ध्वज तात्काळ खाली उतरण्यात यावा. मात्र तिरंग्याचे अभिमानी असणारे नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांनी त्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. विजापूरच्या तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. त्यांना 6 महिने तुरुंगवास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला.
मंगळवार पेठ पोलिस चौकी जाळल्या प्रकरणी चार क्रांतिवीरांना फाशीची शिक्षा
मंगळवार पेठ पोलिस चौकी आंदोलकांनी जाळली होती. यामध्ये दोन पोलिसांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चार जणांवर ब्रिटिशांनी ठपका ठेवला होता. यामध्ये थोर स्वातंत्र्य सेनानी मल्लप्पा धनशेट्टी,श्रीकिसन सारडा,जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन यांचा समावेश होता. या चार क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा देण्यात आली. या चार हुतात्म्यांना 9 जानेवारी 1931 रोजी फाशी देण्यात येणार होती पण ब्रिटिशांनी अचानक निर्णय रद्द करत 12 जानेवारी 1931 रोजी श्री सिध्देश्वर यात्रेच्या दिवशी फाशी दिली. या मागचा ब्रिटिशांचा हा उद्देश हा होता,की सोलापूर शहरवाशियांत दहशत निर्माण व्हावी.
सोलापूर शहराने चार दिवस पारतंत्र्यातही स्वातंत्र्य उपभोगले. हा जाज्वल्य इतिहास आजही सोलापूरकराना प्रेरणा देत आहे. त्याच्या स्मृती आजही सोलापूर शहरातील नागरिकांनी जपून ठेवल्या आहेत.