लोप पावत चाललेल्या मातीतील कुस्तीला ऊर्जितावस्था देतोय सोलापूरचा पैलवान
पूर्वीच्या काळी गावा गावात पैलवान असायचे,गावोगावी कसरत करण्यासाठी तालमी दिसून यायच्या. सद्या या तालमी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याच कुस्तीने ऑलंपिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. पण ही कुस्ती सध्या माहिती आणि तंत्रज्ञान युगाच्या काळात लुप्त पावत चाललेल्या मातीच्या कुस्तिला उर्जीतावस्था देणाऱ्या युवराज कारंडेचा संघर्ष मांडला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...
X
पूर्वीच्या काळी गावा गावात पैलवान असायचे,गावोगावी कसरत करण्यासाठी तालमी दिसून यायच्या. सद्या या तालमी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याच कुस्तीने ऑलंपिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. पण ही कुस्ती सध्या माहिती आणि तंत्रज्ञान युगाच्या काळात लुप्त पावत चालली आहे. या युगात तरुणाई प्रचंड प्रमाणात कामात व्यस्त असून त्यांना स्वतःकडे ही लक्ष द्यायला वेळ नाही. आजचा युवा तासनतास कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या पुढे बसून असतो. तो सातत्याने कामात व्यस्त असतो. तासन-तासच्या कामामुळे येणाऱ्या ताण-तणावामुळे अलीकडच्या काळातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहेत,असे अनेकांना वाटत आहे. त्याचे अनेक किस्से ही समोर आले आहे. आजच्या युगातील तरुणांची ताण तणावातून मुक्तता व्हावी,या हेतूने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रुक येथील युवराज कारंडे यांनी स्वतःच्या जागेत,स्वखर्चाने तालीम निर्माण केली आहे.
आजच्या तरुणाईला व्यसनापासून परावृत करण्यासाठी मुलांना कुस्तीचे धडे देवू लागले आहेत. त्यांच्या या तालमीचे नाव छत्रपती शाहू महाराज कुस्ती संकुल असून या ठिकाणी त्यांच्या गावच्या आसपास असणाऱ्या गावातील मुले मातीतील कुस्तीचे धडे गिरवू लागले आहेत. एकीकडे मातीतील कुस्ती लोप पावत चालली असताना युवराज कारंडे यांनी हाती घेतलेला उपक्रम कौुकास्पद आहे. त्यांच्या या तालमीत तीस ते पस्तीस मुले सध्या प्रशिक्षण घेत आहेत. या ठिकाणी मुलांना मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. लोप पावत चाललेल्या मातीतील कुस्तीला उर्जिस्तावस्था प्राप्त करून देण्याचे काम सध्या युवराज कारंडे आणि त्यांचे सहकारी करत आहेत.
गावागावातील तालमी झाल्या लुप्त
पूर्वीच्या काळी शरीराला खूपच महत्त्व देण्यात येत होते. शरीर दणकट आणि मजबूत ठेवण्यासाठी विशेष अशी काळजी लोक घेत असत. नित्यनेमाने गावच्या तालमीत जावून जोर,बैठका,कुतीचे डाव शिकले जात होते. गाव खेड्यातील लोकांना जास्त प्रमाणात या कुस्तीचे आकर्षण होते. म्हणूनच प्रत्येकाच्या घरात पैलवान पहायला मिळायचा. गावातील तालमी पैलवाणानी भरून जात असत. त्यांच्यात व्यायाम करण्यासाठी चढाओढ लागायची. या तालमीत पहाटे पासूनच तरुणांची रांग लागलेली असायची. या ठिकाणी गावातील ज्येष्ठ पैलवान प्रशिक्षण देण्याचे काम करत असत. पैलवानाच्या खुराकावर विशेष लक्ष दिले जात होते. देशी शुद्ध अन्न,पाणी पैलवानाना मिळत होते. अलीकडच्या काळात मनुष्य यंत्राच्या वेगाप्रमाने काम करू लागल्याने त्याचे या मातीतील कुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. कामाच्या शोधात गाव खेड्यातील मुले मोठ्या प्रमाणात शहरात स्थायिक झाली आहेत. त्यांच्यातून कुस्ती प्रेम कमी झाले आहे.
बदलत्या जीवन शैलीचा ही परिणाम आजच्या युगातील तरुणाईवर झाला आहे. त्यामुळे या तरुणाईचा कल जिम आणि इतर व्यायामाच्या साधनाकडे वाढला आहे. कमी वेळात शरीर फुगले पाहिजे,असे तरुणाईला वाटत आहे. पूर्वीच्या काळी पहाटेच गावच्या तालमीत जाणारी मुले आज शहरातील जिम मध्ये व्यायाम करण्यासाठी जात आहेत. पूर्वीप्रमाणे गाव खेड्यातील पैलवांची संख्या ही रोडावली आहे. त्यांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. गावातील पैलवानाची संख्या कमी झाल्याने सध्या गावोगावच्या तालमी लुप्त झाला आहेत. त्या मोडकळीस आल्या आहेत. शासनाने या मोडकळीस आलेल्या तालमींना ऊर्जितावस्था दिल्यास नक्कीच त्याचा फायदा गावातील तरुणांना होईल,असे ग्रामीण भागातील लोकांना वाटत आहे.
छत्रपती शाहू महाराज कुस्ती संकुलात तीस ते पस्तीस मुलांना दिले जाते मोफत प्रशिक्षण
युवराज कारंडे यांच्या छत्रपती शाहू महाराज कुस्ती संकुलात वाघोली,शिंगोली, कोरवली,कुरुल, दादपुर, कामती आदी आसपासच्या गावातील मुले कुस्ती शिकण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी सर्व वयोगटातील मुले आहेत. काही मुले तर कुस्ती संकुलात राहून कुस्तीचे धडे घेत आहेत. मुलांना दररोज दुधाचा खुराक मोफत दिला जात आहे. त्यांना पहाटे पासूनच व्यायाम आणि कुस्तीचे धडे दिले जात आहेत. याच बरोबर या ठिकाणी रशीवर चढने यासारखे खेळ ही शिकवले जात आहेत. त्याच बरोबर पुल अप्स काढण्यासाठी लहान मुलापासून मोठ्या मुलापर्यंत प्रशिक्षण दिले जात आहे. या ठिकाणी युवराज कारंडे यांचे सात ते आठ सहकारी प्रशिक्षण देण्याचे काम करत असून कुस्ती शिकण्यासाठी येणाऱ्या मुलांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही. उलट त्यांना खुराक म्हणून मोफत दूध दिले जात आहे. या तालमीतील मुलांना त्यांचे वडील कुस्ती शिकण्यासाठी घेवून येतात. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर परत आठ ते दहा किलोमीटरचा प्रवास करून घरी घेवून जातात. मुलांच्या कुस्ती शिकण्यामागे मुलाचे पालक ही खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येते.
पालकांना कुस्तीचे आवड असणे गरजेचे
या कुस्ती संकुलात मुलांना घेवून येणाऱ्या पालकांनी बोलताना सांगितले,की तरुण पिढीचा कल व्यसनाधीनतेकडे वाढू लागला आहे. त्यामुळे तरुण पिढी कुस्ती पासून दूर जावू लागली आहे. ज्याच्या घरात पूर्वी पैलवान होते त्यांच्याच घरातील लोक मुलांना पैलवान करू लागले आहेत. पैलवानकी लहानपणापासूनच शिकावी लागते. तरच चांगला पैलवान तयार होतो. या पैलवानाना चांगल्या प्रकारचा खुराक ही द्यायला पाहिजे. तरच चांगल्या प्रकारचे पैलवान तयार होतील. असे पालकांचे वाटत आहे.
कुस्तीतून मुलांना व्हायचे आहे अधिकारी,चांगला कुस्तीपटू
यावेळी मुलांनी बोलताना सांगितले,की कुस्ती खेळत असताना या कुस्तीतून आम्हाला अधिकारी व्हायचे आहे. तर काही मुलांचे पुढे जावून राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळण्याचे स्वप्न आहे. या कुस्ती संकुलातील पैलवानाने खेलो इंडिया या स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. यातील दोन मुले पुणे येथे कुस्तीचे धडे गिरवत आहेत. येणाऱ्या काळात या कुस्ती संकुलातून आणखीन चांगले कुस्तीपटू तयार होती,असे प्रशिक्षक पैलवान यांना वाटत आहे.
पैलवान युवराज कारंडे बोलताना झाले भावूक
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना पैलवान युवराज कारंडे म्हणाले,की गेल्या दहा वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतीकडे तालमीसाठी जागा मागत आहोत. पण ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिली नाही. तरुण मुले व्यसनाच्या आहारी जावू नये,यासाठी स्वतः कुस्तीसाठी संकुल उभे केले. त्याच्या शेड साठी एक लाख रुपयांच्या पुढे खर्च आला आहे. ग्रामीण भागातील अनेक पालकांना आपल्या मुलांना कुस्ती शिकवू वाटते. परंतु पैशाअभावी मुलांना कुस्तीचे प्रशिक्षण देवू शकत नाहीत. ते मुलांना कोल्हापूर सारख्या ठिकाणी कुस्ती शिकायला पाठवू शकत नाहीत. म्हणून या ठिकाणी मोफत कुस्ती शिकवण्याचे काम केले जात आहे.
या कुस्ती संकुलात अनेक सोयी सुविधांचा अभाव असून मुलांना म्याटची गरज आहे. तिची व्यवस्था जिल्हा क्रीडा अधिकारी आणि शासनाने करावी. कुस्ती संकुलाच्या अडचणी संबधी सांगताना पैलवान युवराज कारंडे भावूक झाले होते. त्यांनी सांगितले,की मी कुस्ती खेळत असताना अनेक अडचणींना मला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे मी माझी स्वप्ने पूर्ण करू शकलो नाही. ती स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न कुस्ती संकुलात शिकायला आलेल्या मुलांकडून करत आहे. या संकुलातील अनेक मुलांनी राज्यस्तरीय कुस्त्या खेळल्या आहेत. येणाऱ्या भविष्य काळात यातील मुले राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना दिसतील.