अंगणवाडीसाठी मानखुर्दमधल्या तरुणींचा पाठपुरावा, घरोघऱी फिरुन सर्वेक्षण
X
ग्रामीण भागात अंगणवाड्यांमुळे पोषण आहार पुरवला जाऊन कुपोषणाची समस्या कमी करण्यात यश आल्याचे दाखले दिले जात आहेत. पण कुपोषण ही केवळ ग्रामीण महाराष्ट्राची समस्या नाहीये. तर शहरातही कुपोषणाचा प्रश्न आहेच. त्यामुळे गरीब वस्तीमधील मुलांसाठी अंगणवाडी झालीच पाहिजे अशी भूमिका घेत मुंबईतल्या मानखुर्दमधील भीमनगर वस्तीमधल्या तरुणी सध्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत.
या तरुणी या भागात अंगणवाडी सुरू करावी या मागणीसाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन मुलांची माहिती घेत आहेत. किती लहान मुलं आहेत, किती गरोदर माता आहेत याची माहिती घेत आहेत. अंगणवाडीच्या माध्यमातून या भागातील गरीब कुटुंबातील मुलांपर्यंत आणि त्यांच्या मातांपर्यंत सरकारच्या योजना, पोषण आहार पोहोचावा यासाठी या तरुणींचा हा सगळा प्रयत्न आहे. या वस्तीतील मुलींना मदत करत आहेत सामाजिक कार्यकर्त्या रत्ना माने.....या भागात अंगणवाडीची गरज का आहे हे रत्ना माने आग्रहाने सांगतात.
यासंदर्भात आम्ही ट्रॉम्बे केंद्राच्या महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी संतोष शिंदे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा इथे अंगणवाडी झाली पाहिजे असा अहवाल दिल्याचे सांगितले पण त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगितले.