Home > मॅक्स रिपोर्ट >  ...म्हणून स्त्री भ्रूण हत्येसाठी ओळखला जात होता बीड जिल्हा

 ...म्हणून स्त्री भ्रूण हत्येसाठी ओळखला जात होता बीड जिल्हा

 ...म्हणून स्त्री भ्रूण हत्येसाठी ओळखला जात होता बीड जिल्हा
X

स्त्री भ्रूण हत्येसाठी ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या महत्त्वपूर्ण प्रकरणाचा आज निकाल लागला आहे.

राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या बीडमधील स्त्रीभ्रूण हत्यप्रकरणी डॉ. मुंडे दाम्पत्याला न्यायालयाने दोषी ठरवले. डॉ. सुदाम मुंडे, डॉ.सरस्वती मुंडे यांच्यासह पीडित महिलेच्या पती महादेव पटेकर याला दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलीय. या प्रकरणातील 11 आरोपींना सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे.

न्यायालयाने सुनावली शिक्षा

या प्रकरणात मृत विजयमाला पट्टेकर यांचे नातेवाईक फितूर झाले होते. मात्र कोर्टाने मुंडे याच्या दवाखान्यातून मिळालेली कागदपत्रे, मुंडे हॉस्पिटलची तपासणी केल्या नंतर १० बेडची परवानगी असताना आढळून आलेल्या ६० रूम्ससह ११० बेड आदी परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरली. यावर मुंडे याने स्त्री भ्रूण हत्येचा कारखानाच उघडला होता असे मत नोंदवले. तसेच आरोपी मुंडे दांपत्याने वय जास्त आहे आणि विविध आजार जडलेली आहेत याचे कारण देत शिक्षेपासून केलेला बचाव फेटाळला. मुंडे दांपत्य आणि विजयमाला पट्टेकर यांचा पती आरोपी महादेव पट्टेकर या तिघांना कलम ३१२, ३१४, ३१५, ३१८ तसेच एमटीपी कायद्याखाली १० वर्ष सक्त मजुरी आणि ५० हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील अ‍ॅड.मिलिंद वाघिरकर यांनी दिली.

नेमकं काय आहे प्रकरण...

धारूर तालुक्यातील रहिवाशी विजयमाला महादेव पट्टेकर या महिलेला चार मुली होत्या. पाचव्यांदा गर्भवती असताना महादेव पट्टेकर याने 17 मे 2012 रोजी त्यांना डॉ सुदाम मुंडे याच्या परळी येथील मुंडे हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला. त्यानंतर जळगाव येथील डॉ राहुल कोल्हे यांच्या रुग्णालयात गर्भलिंग निदान करण्यात आले. यात पाचवे अपत्य मुलगी असायचे निष्पन्न झाल्याने 18 मे 2012 रोजी परळी येथील मुंडे दांपत्याच्या हॉस्पिटल मध्ये विजयमाला यांचा गर्भपात करण्यात आला. या दरम्यान अति रक्तस्त्रावाने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण खूप तापले आणि पोलिसांनी परळी पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवध तसेच अवैध गर्भलिंगनिदान चाचणी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास केला असता डॉ. मुंडे याने याआधीही अनेक गर्भपात करून ती अर्भके प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून स्वत:च्या शेतातील पडक्या विहीरीत टाकल्याचे समोर आले.

Updated : 8 Feb 2019 7:05 PM IST
Next Story
Share it
Top