बंधारा फुटला, अग्रणी नदीचे पाणी शेतात
पाणी अडवा पाणी जिरवा अशा घोषणा देत विविध योजना राबवल्या जातात.
X
सांगली जिल्ह्यातील करंजे या गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण झाले असते तर शेतांचे नुकसान झाले नसते अशी तक्रार गावकरी करत आहेत. अग्रणी नदीत बांधण्यात आलेले करंजे येथील बंधारे पाण्याने वाहून गेले आहेत. यातील काही ठिकाणी नदी एका बाजूला तर बंधारे एका बाजूला अशी अवस्था झाली आहे. पोपट सूर्यवंशी यांचे अग्रणी काठावर शेत आहे. या शेतात त्यांची द्राक्षाची बाग होती. या बागेच्या पूर्वेला बांधलेला बंधारा सोडून नदीचा प्रवाह त्यांच्या बागेकडे गेला. यामुळे अर्धी बाग वाहून गेली आहे. बंधाऱ्याचे काम योग्य पद्धतीने न केल्याने हा बंधारा फुटला आहे असा आरोप ते करत आहेत. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत हा बंधारा बांधला गेला नसला तरी या नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण केले गेले होते असा दावा केला जातो. पण या घटनेने हे काम खरंच झाले होते का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पाणी अडवण्याच्या उद्देशाने लाखो रुपये खर्च करुन बांधलेले बंधारे निरुपयोगी झाले आहेत. इथले नागरीक भानुदास सूर्यवंशी सांगतात की जलयुक्त शिवार योजनेचा डांगोरा पिटला गेला. मात्र प्रत्यक्षात या कामात गैरप्रकार झाल्याचा आरोप ते करत आहेत. नदीच्या खोलीकरणाच्या नावाखाली वाळू काढली गेल्याचा आरोप ते करतात. नदीचे खोलीकरण केले नाही. पात्रातील अतिक्रमण हटवले नाही. त्यामुळे कृत्रिम अडथळे निर्माण झाल्याने नदीने पात्र बदलले आहे. बंधारा बांधत असताना तिथली जागा तपासली नसल्याने ते फुटण्याच्या घटना घडल्या आहेत, असे काही शेतकरी म्हणत आहेत. प्रत्यक्षात अग्रणी नदीमध्ये अनेक ठिकाणी कृत्रिम अडथळे निर्माण केले आहेत. याकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याने आज शेतकऱ्यांचे शेत उध्वस्त झाली आहे. दरम्यान मॅक्सम महाराष्ट्रच्या प्रतिनिधीने संबंधित विभागांकडे प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने सदर घटना घडली आहे असे उत्तर देण्यात आले आहे.

जलयुक्त शिवार योजनेवर कॅगने आक्षेप घेतलेले असताना राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीने जलुयक्त शिवार योजनेतील काही बंधाऱ्यांच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. पाणी अडवण्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नद्यांवर बंधारे बांधले गेले आहेत. या बंधाऱ्यामुळे पाणी अडवले जावे आणि याचा शेतीला उपयोग व्हावा हा मुख्य उद्देश होता. तर जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत काही नद्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले होते.