Home > मॅक्स रिपोर्ट > घोणस अळीमुळे शेतकरी- शेतमजूर झाले भयभीत

घोणस अळीमुळे शेतकरी- शेतमजूर झाले भयभीत

घोणस अळीमुळे शेतकरी- शेतमजूर झाले भयभीत
X

राज्यातील शेतकरी विविध अडचणींचा सामना करीत असताना शेतकरी,शेतमजूर यांच्या समोर घोणस अळीच्या रूपाने नवीन संकट येवून ठेपली आहे. राज्यातील अनेक भागात शेतकरी आणि शेतमजूर शेतात काम करीत असताना घोणस अळीच्या स्पर्शाने अस्वस्थ होवून दवाखान्यात दाखल झाले आहेत. राज्यातील विविध भागातून तशा प्रकारच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळेच शेतकरी,शेतमजूरांत भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे. या घोणस अळीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे केले आहे. या अळीच्या चाव्याने अर्धे शरीर बधीर होते.

ही अळी प्रामुख्याने ऊसाच्या फडात, गवत व मका या पिकांवर जास्त प्रमाणात आढळून येत आहे. या अळीचे वैज्ञानिक नाव 'स्लग कॅटरपिल्लर' असे आहे. ब्लेड सारखी काटेरी आकार असलेली ही अळी विषारी आहे. पिवळा व हिरवा रंगाच्या या अळीच्या अंगावर काटे असतात. पिकांना अपायकारक असलेल्या या अळीचे शेतकर्‍यांसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे. घोणस अळी शक्यतो ऊस व गवतावर दिसून येते. घोणस आळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कोणतेही स्पर्शजन्य किटकनाशक फवारावे. यामुळे अळीचे नियंत्रण होऊ शकते. अळीने चावा घेतल्यास घाबरून न जाता जवळच्या डॉक्टरकडे जाऊन योग्य ते उपचार घ्यावेत. असे कृषी तज्ञांनी आवाहन केले आहे. घोणस अळी विषारी असल्याचे सांगितले जात असल्याने शेतकरी,शेतमजूरात भीतीदायक वातावरण पसरले आहे. या अळीच्या सदर्भाने अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यात मिळून आली अळी

घोणस अळी पहिल्या पासून निसर्गात अस्तित्वात असून या अळीचे तिचे निसर्गतच अस्तिव नष्ट होत होते. परंतु अलीकडे बदलत्या नैसर्गिक वातावरणामुळे या अळीच्या अस्तित्वावर परिणाम झाला असल्याचे तज्ञाकडून सांगण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात तिचे अस्तित्व दिसून आल्याने शेतकरी आणि शेतमजूर भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यानी घाबरून जावू नये. शेतातील कामे करत असताना शेतकरी आणि शेतमजुरी हातात हातमोजे घालूनच काम करावे. यामुळे अळीच्या डंख शरीराला होणार नाही. शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी,असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. या अळीच्या संपर्कात आल्यास त्वरित नजीकच्या दवाखान्यात उपचार करून घ्यावेत,असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

घोणस अळीमुळे शेतकऱ्यांत वाढली चिंता

नैसर्गिक संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता घोणस अळीने नवे संकट उभे केले आहे. घोणस अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांची चिंता वाढली आहे. या अळीच्या व्यवस्थापनासाठी नेमक्या कोणत्या किटकनाशकांची शिफारसही नाही; परंतू काही औषध फवारणी करून नियंत्रण मिळविता येते, असे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले. ही अळी बहुभक्षीय असून, आधाशाप्रमाणे पानावरील हिरवा भाग खाऊन केवळ शिरा शिल्लक ठेवतात. पावसाच्या परतीच्या काळात उष्ण व आर्द्र हवामानात ही अळी दिसून येते. बांधाच्या गवतावर, एरंडी, आंब्याच्या झाडावर तसेच इतर फळपिकावर या अळीचा मुक्काम असतो. सोयाबीन पिकातही ही अळी आढळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

शेतात जनावरे चारण्यासाठी गेल्यानंतर आली घोणस अळी

जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकरी बापू सरवदे हे शेतात जनावरे चारण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या निदर्शनास घोणस आली. या अळीची माहिती त्यांना बातम्यांच्या माध्यमातून मिळाल्याने शेतात अळी दुस्यच त्यांनी लागलीच कृषी अधिकाऱ्यांना या घोणस अळीच्या संदर्भाने माहिती दिली. लागलीच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी बापू सरवदे यांच्या शेताला भेट देवून अळीची पाहणी केली. त्यावेळेस ही घोणस अळी आल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घोषित केले. या अळीमुळे शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये,योग्य ती काळजी घेवून शेतकऱ्यांनी शेतात वावरावे,असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

लंम्पी रोगाने शेतकरी त्रस्त असताना घोणस अळीच्या रूपाने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट

सोलापूर जिलह्यातील शेतकऱ्यांनी सावध होण्याची वेळ आली असून मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी येथे विषारी घोणस अळी किंवा डंख अळी (स्लज कॅटरपिलर) आढळून आले आहे. महाराष्ट्रात आधीच शेतकरी लंम्पी चर्म रोगाच्या प्रादुर्भावामुळे पशुधन वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात हे विषारी घोणस अळीचे नवीन नैसर्गिक संकट उभे राहत आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात अष्टी परिसरात वडगाव दक्षिण येथील एका शेतकऱ्याला या आळी मुळे दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे लागले. असे असतानाच 21 सप्टेंबर 2022 रोजी कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ चे पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. पंकज मडावी, मोहोळचे तालुका कृषि अधिकारी अतुल पवार तसेच मंडळ कृषि अधिकारी हनुमंत गावडे यांनी मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी येथिल शेतकरी बापू उत्तम सरवदे यांच्या शेताला भेट दिली असता घोणस / डंक अळी सारखी अळी आढळून आली. डॉ. पंकज मडावी व त्यांच्या इतर चमूने पाहणी केली असता घोणस अळी असल्याचे निदर्शनास आले.

घोणस अळीने डंख केल्यास केसातून शरीरात सोडले जाते रसायन

या अळीच्या शरीरावर केस असतात. या केसामधून एक प्रकारचे रसायन बाहेर पडते. ते विषारी असते. अशा प्रकराच्या बऱ्याच अळ्या असतात. पण काही अळ्या या विषारी रसायन बाहेर सोडत असतात. या आळीपासून सावध राहायला पाहिजे. अन्यथा या आळीशी संपर्क आल्यास संपर्क झालेल्या भागास काळा डाग पडून असाह्य वेदना होण्यास सुरुवात होते. पुरळ देखील येतात. तसेच ही विषारी घोणस अळी डंक देखील मारते. डंक मारल्याने अनेकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. असे असले तरी शेतकऱ्यांनी न घाबरता काळजीपूर्वक शेतात काम करावे. घोणस अळी ही एक बहुभक्षी कीड असुन बांधावरील गवतावर, एरंडी, आंब्याच्या झाडावर, सोयाबीन,ऊस यासारखे पिके व इतर फळपिकावर तुरळ ठिकाणी एखादी अळी दिसून येत असते.

अळीच्या डंखाने काही मिनीटातच डंख केलेल्या भागाची होते आग

स्पर्श केला किंवा त्या अळीच्या संपर्कात आपली त्वचा आली तर काही मिनीटातच त्या भागाची आग होते. काही व्यक्तींमध्ये या रसायनाला ॲलर्जी गुणधर्म असतात, त्यामुळं अशा लोकांना या अळीचा खू त्रास होता. त्यामुळं ज्या ठिकाणी अशा अळ्या असतील तिला स्पर्श करु नका.

घोणस अळीचे निसर्गात होते नियंत्रण

या किडीचे नैसर्गिक नियंत्रण मोठ्या प्रमाणात निसर्गातील विविध मित्र किडी करत असतात. त्यामुळे घाबरून न जाता बांधावरील गवत काढत असताना किंवा शेतातील इतर कामे करतांना या किडीचे निरीक्षण करून ही कीड आपल्या त्वचेच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी.

अळीचा डंख झाल्यास खालील प्रकारचे करावेत उपचार

काही अपवादात्मक परिस्थितीत आपल्या त्वचेशी या किडीचा किंवा तिच्या केसाचा संपर्क आल्यास आपण घरी वापरतो तो चिकट टेप हा दंश झाल्याच्या ठिकाणी हलक्या हाताने लावून काढून घ्यावा, यामुळे या अळीचे केस सहजपणे निघून जाऊन दाह कमी होण्यास मदत होते. ज्या ठिकाणी दंश झाला आहे त्या ठिकाणी बर्फ लावणे व काही प्रमाणात बेकिंग सोडा व पाण्याची पेस्ट करून लावणे हे देखील फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे.


घोणस अळीमुळे शेतकरी- शेतमजूर झाले भयभीतघोणस अळीमुळे शेतकरी- शेतमजूर झाले भयभीत

या किडीच्या नियंत्रणासाठी विशिष्ट अशा रसायनाची किंवा कीटकनाशकाची शिफारस नसली तरी नेहमीच्या वापरातील कीटकनाशक जसे की क्लोरोपायरीफॉस (25 मिली प्रती 10 लि. पाणी), प्रोफेनोफोस (20 मिली प्रती 10 लि. पाणी), क्वीनॉलफॉस (25 मिली प्रती 10 लि. पाणी), इमामेक्टिन बेंजोएट (4 ग्रॅम प्रती 10 लि. पाणी ), 5 टक्के निमार्क हे उपयुक्त ठरतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी या फवारण्या केल्यास अळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल,असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


Updated : 4 Oct 2022 8:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top