Home > मॅक्स रिपोर्ट > साईंच्या दरबारी पोषाखाची सक्ती कशासाठी?

साईंच्या दरबारी पोषाखाची सक्ती कशासाठी?

शिडी संस्थानचा सभ्य पोषाखाचा आदेश योग्य की अयोग्य? काय आहे विविध क्षेत्रातील महिलांच्या प्रतिक्रिया? वाचा मॅक्समहाराष्ट्राचा स्पेशल रिपोर्ट

साईंच्या दरबारी पोषाखाची सक्ती कशासाठी?
X

तुम्ही जर साई भक्त असाल तर कदाचीत या बातमीने तुमच्याही भावना दुखवू शकतात. जगाला श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देणाऱ्या शिर्डीतील साई दर्शनासाठी आता ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी आता भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करावा लागणार आहे. मात्र, विविधतेने नटलेल्या आपल्या देशात प्रत्येक समाज वेगवेगळे वेश परिधान करत असताना शिर्डी संस्थान ने जाहीर केलेला सभ्य पोषाख म्हणजे काय? असा सवाल उपस्थित होतो.

त्याचबरोबर ज्या साई बाबांनी 'सबका मालिक एक' अशी शिकवण दिली. सर्व जाती धर्मांचे लोकांना एकतेचा संदेश दिला. तिथं सभ्य वेश कसा परिधान करणार?

काय आहे संस्थानाचा आदेश?

'साई मंदिर संस्थानने 'साईभक्तांना विनंती आहे की, आपण पवित्र स्थळी प्रवेश करीत असल्याने कृपया भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा परिधान करावी.'

इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत हे सूचना फलक लावले आहेत. संस्थानचा कारभार सध्या तरी समितीमार्फत पाहिला जात आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेऊन सूचना फलक लावण्यात आल्याचे सांगण्यात येते.

आता आमचा मूळ विषय जरा समजून घेऊया...

शिर्डी हे जागतिक किर्तीचे धार्मीकस्थळ आहे. इथं जगभरातून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे शिर्डीं संस्थानच्या या निर्णयामुळे त्यांची प्रतिमा जागतीक पातळीवरही खालावेल. शिर्डी साई संस्थान हे जागतीक किर्तीचे एकमेव असे मंदिर की जे हिंदु मुस्लीम ऐक्याचं प्रतिक मानलं जातं. याच मंदिरात स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला जातो.

मात्र, मंदिर प्रशासनाच्या या निर्णयामुळे त्यांची पुरुषी मानसिकता वाढतेय का? असा प्रश्न पडतो. आजकाल अनेक महिला वनपीस, क्रॉप टॉप, शॉर्ट पॅन्ट, स्कर्ट, थ्री फोर्थ असे कपडे घालत असतात. जे आजच्या घडीला सामान्य गोष्ट आहे.

बर हे झालं सध्याच्या पोषाखाचं पण आपल्या प्राचीन संस्कृती नुसार आजही आदिवासी भागातील अनेक स्त्रिया ब्लाउज व परकर परिधान करतात. तो त्यांचा पारंपरिक पोषाख आहे. त्यामुळे या महिला जर साई दर्शनाला गेल्या तर मंदिर प्रशासन त्यांना प्रवेश नाकारणार का? असा प्रश्न पडतो.

या संदर्भात आम्ही भूमाता ब्रीगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की,

"असं जर असेल तर अनेक मंदिरांचे पुजारीसुध्दा अर्ध नग्न असतात. ते फक्त सोवळं घालतात बाकी वरचा भाग हा उघडाच असतो. म्हणून कधी कुठल्या भक्ताने बोर्ड लावला नाही. की, अर्धनग्न पुजाऱ्यांसाठी मंदिरात प्रवेश नाही. त्यामुळे शिर्डी संस्थानचा हा बोर्ड भक्तांचा अपमान करणारा आहे. मंदिर प्रशासनाने तो बोर्ड काढावा अन्यथा आम्हाला शिर्डीत येऊन तो बोर्ड काढावा लागेल." असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे.

"आपला भारतीय पोषाख कुठेही वाईट नाही. त्यामुळे मंदिरा सारख्या ठिकाणी आपण जात असू अशा वेळी भारतीय पोषाख परिधान करणं यात चूक नाही. ही आपली संस्कृती आहे यात काही चुक नाही." अशी प्रतिक्रीया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे.

या संदर्भात बोलताना शिवसेनेच्या विधान परिषद आमदार मनिषा कायंदे यांनी

"देश तसा वेश प्रमाणेच हे आहे. आपण समुद्र किनारी जाताना वेगळ्या प्रकारचे कपडे घालतो. शाळेचा युनीफॉर्म असतो. याचा अर्थ एवढाच आपण कुठे जातोय याचं आपल्याला भान असलं पाहिजे. हा सगळा कॉमन सेन्सचा भाग आहे."

"यात महिलांवर अन्याय करण्याचा काही विषय नाही. या आधी सिध्दीविनायक मंदिराबाहेर मी पुरुषांनी बरमुड्यावर प्रवेश करु नये. असा बोर्ड पाहिला होता. यात महिला पुरुष असा काही भाग नाही. हा डेकोरमचा भाग आहे. दक्षिणात्य मंदिरांमध्ये पुरुषांना लुंगी सक्तीची आहे. महिला सुध्दा आता सलवार कुर्त्यावर आल्या आहेत. त्या आधी तर साडीच सक्तीची होती. अगदी लेदरचा बेल्टही काढायला सांगतात."

प्रत्येकाला कळलं पाहिजे आपण कुठं वावरतोय. आता समजा रस्त्यावर तुम्ही विचीत्र कपडे घालून जाल तर कसं वाटेल? हा पण त्यातलाच प्रकार आहे. तसा आपला हिंदू धर्म प्रगल्भ आहे. ही प्रतिक्रीया पक्षाची नसुन माझी वैयक्तीक आहे."

असं आमदार मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.


कॉंग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील सांगतात...

"मुळात म्हणजे या संस्थानची सभ्यतेची डेफीनेशन काय आहे हे पाहिलं पाहिजे. ती कुणी आणि कशी ठरवायची.. मला जो ड्रेस आवडेल तो समोरील व्यक्तीला आवडेलच असं नाही. माझ्या लहानपणी कंपलसरी साडी नेसलेलीच आई मी पाहिली आहे. पण आजच्या मुलांना साडी नेसलेली आवडणार पण नाही. म्हणजे हा ज्याच्या त्याच्या आस्थेचा भाग आहे. सगळीकडे भगवीकरण सगळीकडे लव्ह जिहाद असं वातावरण असताना शिर्डी संस्थानने यात पडू नये."

मी पाहिलंय जगाच्या पाठिवर म्हणजे फक्त भारतामध्येच नाही. बाहेरच्या देशामध्ये सुद्धा वेगळ्या पध्दतीचं आकर्षण आहे... साई बाबांबद्दल. काही युरोपीयन देशांमध्ये गेल्यावर त्याबद्दल लोक विचारतात. आता तिथल्या जर स्त्रीया आल्या तर त्यांची सभ्यतेची व्याख्या ही जिन्स टी शर्ट अशी आहे. त्यामुळे कुणाला असं एका चौकटीत बसवु शकत नाही. हा सगळा पुन्हा बाबा आदमच्या जमान्यात जाण्याचा प्रकार आहे." अशी प्रतिक्रीया कॉंग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी दिली आहे.

या संदर्भात भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी

"भारतातील दक्षीणेतील मंदिरांमध्ये कित्येक वर्षांपासून अशा प्रकारचे नियम लागू आहेत. आपण जर तिरुपती बालाजी मंदिर गेला असाल तर लक्षात आलं असेल तिथं ते विशिष्ट पेहरावाचा आग्रह धरतात. त्याच दृष्टीकोनातून या निर्णयाकडे पाहायला लागेल. कदाचीत याबाबत शिर्डी संस्थानला या बाबत काही अनिष्ठ अनुभव आले असतील त्यामुळे हा निर्णय घेतला असेल."

"मला नाही वाटत याचा भारतीयांना त्रास होइल. कारण भारतीय संस्कृतीमध्येच आपण कुठे जातोय. याचा विधी निषेध बाळगुन पेहराव करणं हे उपजत आहे. आपण बीच वर जातोय की मंदिरात जातोय एवढ तारतंम्य तर भारतीय बाळतातच. त्यामुळे याचा त्रास होइल असं मला वाटत नाही." असं म्हटलं आहे.

तर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी

"शिर्डी प्रशासनाने हा निर्णय एकंदरच विचार विनीमयाने घेतलेला असणार आहे. प्रत्येक प्रार्थना स्थळाची एक संस्कृती असते आणि या माध्यमातून शिर्डी संस्थान ती संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असेल तर यात काही वावगं वाटत नाही. त्यामुळे हा निर्णय निश्चितच सकारात्मक वाटतो." अशी प्रतिक्रीया दिली आहे.

तर सामाजिक कार्यकर्त्या सुष्मा अंधारे म्हणतात...

असे बोर्ड फक्त शिर्डीतच आहे असं नाही. असे बोर्ड अनेक ठिकाणी आहेत. गणपतीपुळे मंदिराच्या बाहेर असा बोर्ड आहे. एवढंच काय तर मुंबईतील हाजी अली दर्ग्याच्या बाहेरही अशा पध्दतीचा बोर्ड लागलेला आहे. हाजी मलंग इथं डोक्यावर रुमाल असलाच पाहिजे. नांदेडचा जो गुरुद्वारा आहे. त्याच्या बाहेर सुध्दा अशाच प्रकारचा बोर्ड लावलेला आहे. या बोर्डमध्ये पुरा बदन कपडेसे ढका हो असं विस्तृतपणे सांगण्यात आलयं."

"या पेक्षा भयंकर म्हणजे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर च्या बाहेरच एक बोर्ड लावण्यात आला आहे. त्यावर केवळ हिंदू उच्च वर्णीयांनाच प्रवेश असा बोर्ड लावला आहे. या फलकांत आक्षेपार्ह काय? असा प्रश्न अनेक जण विचारतात पण सभ्य म्हणजे नेमकं काय? ती सभ्यतेची व्याख्या या लोकांनी एकदा सांगितली पाहिजे."

"समजा एखादा बंजारा समाजाचा माणूस जर पारंपरिक पोषाखात तिकडे जात असेल तर तो त्याचा पारंपरिक पोषाख आहे. वडार समाजातील अनेक बायका अजूनही चोळी घालत नाहीत. तुमच्या सभ्यतेच्या व्याख्येत हा पोषाख बसतो का?" अशी प्रतिक्रीया सामाजीक कार्यकर्त्या सुष्मा अंधारे यांनी दिली आहे.

तर या संदर्भात साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी

"साईबाबांच्या दर्शनाला देश - विदेशातून साईभक्त येत असतात, श्री साईबाबांचे मंदिर हे पवित्र स्थान असून संस्थान परिसरात व मंदिरात दर्शनाला जाताना अनेक साईभक्त हे आपली वेशभूषा पर्यटनस्थळ असल्यासारखे करतात. वेगवेगळ्या वेशभूषा काही साईभक्त मंदिर परिसरात किंवा मंदिरात पूर्वी जात होते. मात्र, मंदिरात जाताना व परिसरात जाताना प्रत्येक साई भक्ताने पुरुष असो महिला असो त्यांनी भारतीय संस्कृती नुसार आपली वेशभूषा ठेवावी." असं म्हटलं आहे.

आपल्याकडे कोणत्याही धर्मात 'अंत:करण शुध्द होना चाहिए कपडोंमे क्या रखा है' असं म्हटलं जातं.

त्यामुळे या धार्मीक संस्थाच्या सभ्यतेच्या व्याख्येप्रमाणे पोषाख करणं खरंच गरजेचं आहे का? असा प्रश्न पडतो..

Updated : 2 Dec 2020 9:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top