सेव्हन हिल्स हॉस्पिटलची मुजोरी, रुग्णांच्या जीवाशी खेळ
X
मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मुंबई महापालिकेच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलचा धक्कादायक कारभार समोर आला आहे. कोरोनाच्या पेशंटसाठी बेड उपलब्ध असतानाही बेड नसल्याचे सांगत रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला आहे.
रुग्णांच्या विविध तक्रारींमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधीत रुग्णाला एडमिट करण्यासाठी बेड नसल्याचे इथले डॉक्टर सांगतात....तर त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध असल्याचे माहिती अधिकारातून समोर येते, असा धक्कादायक प्रकार इथे घडलाय. या कागदपत्रांच्या माध्यमातून तुम्हाला कळू शकेल की हॉस्पिटलचे ज्येष्ठ डॉक्टर महारुद्र प्रताप यांना सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव यांनी ३० जुलै २०२० रोजी एका कोरोनाबाधीत रुग्णांला एडमिट करुन घेण्याची विनंती केली. पण बेड उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. पण ज्यावेळी आरटीआयमधून जाधव यांनी माहिती विचारली तेव्हा ३० जुलै रोजी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होते याची माहिती समोर आली.
या हॉस्पिटलचा उर्मटपणा इथेच संपत नाही...काही दिवसांपूर्वी एका रुग्णाला त्रास होऊ लागल्याने तो एडमिट असलेल्या हॉस्पिटलने त्याला व्हेंटिलेटर असलेल्या रुग्णालायत नेण्यास सांगितले, त्याचे कुटुंबिय त्याला सेव्हल हिल्स हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. पण तिथे बराचवेळ या रुग्णाला हॉस्पिटलबाहेरच ताटकळत ठेवले गेल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केलाय. असाच प्रकार रावल नावाच्या रुग्णाच्या बाबतीतही घडल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय.
याहून धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर फोन केला तर सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये फक्त कोरोना आणि डायलिसिस असा एकत्र त्रास असेल तरच दाखल करुन घेतो असे उत्तर मिळाले. हॉस्पिटलचा मुजोरपणा इथेच थांबला असे नाही तर एका पोलीस कर्मचाऱ्याला आणि खासगी डॉक्टरलाही दाखल करुन घेण्यास इथे स्पष्टपणे नकार देण्यात आल्याचा आरोप अमोल जाधव यांनी केला आहे.
सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे डीन डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांच्याशी आम्ही संपर्क साधला तेव्हा त्यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. पण सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. दुसरीकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या पीएने हा महापालिकेचा विषय असल्याचे सांगत उत्तर देणे टाळले. उपमहापौर सुहास वाडकर यांनीही बोलण्यास नकार दिला.
कुणीच दाद देत नाही म्हटल्यावर सामान्यांच्या प्रश्नासाठी आम्ही थेट राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक सुप्रिया सुळे यांना संपर्क साधला....पण कुणाची काय व्यथा आहे ते आम्ही पाहून घेऊ तुम्ही येऊ शकता..असे उत्तर देत सुप्रीम सुळे यांनी बोलण्यास नकार दिला. महापालिका, उपमहापौर, आरोग्यमंत्री, गृहमंत्री आणि खासदार सगळ्यांना संपर्क साधूनही कुणी काहीही केले नाही, मग सामान्यांना वाली कोण?