Home > मॅक्स रिपोर्ट > सिना नदीच्या पुरानं होत्याचं नव्हतं केलं.. !

सिना नदीच्या पुरानं होत्याचं नव्हतं केलं.. !

परतीच्या पावसामुळे राज्यातील गावा - गावांतील जनजीवन विस्कळित झाले असून सातत्याने पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतातील सर्व कामे ठप्प झाली असून दिसून सोयाबीन,कांदा,मका,पालेभाज्या या पाण्यात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पशूधनावर देखील या पावसाचा परिणाम जाणवत आहे. सतत पाऊस सुरू असल्याने शेळ्या,मेंढ्या,म्हशी,गाय यांना चरण्यासाठी सोडण्याची सुद्धा अडचण शेतकऱ्या उभी राहिली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट..

सिना नदीच्या पुरानं होत्याचं नव्हतं केलं.. !
X


गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू असून या पावसामुळे राज्याच्या अनेक भागांत काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड प्रमाणत नुकसान झाले आहे. हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची दिवाळी कडू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या नजरा शासनाच्या निर्णयाकडे लागून राहिल्या आहेत.

या परतीच्या पावसामुळे राज्यातील गावा - गावांतील जनजीवन विस्कळित झाले असून सातत्याने पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतातील सर्व कामे ठप्प झाली असून दिसून सोयाबीन,कांदा,मका,पालेभाज्या या पाण्यात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पशूधनावर देखील या पावसाचा परिणाम जाणवत आहे. सतत पाऊस सुरू असल्याने शेळ्या,मेंढ्या,म्हशी,गाय यांना चरण्यासाठी सोडण्याची सुद्धा अडचण शेतकऱ्या उभी राहिली आहे.

याच पावसामुळे शहरातील जनजीवन देखील विस्कळित झाले आहे. पुणे,मुंबई या शहराबरोबरच महाराष्ट्रातील अनेक शहरात पाणी साचल्याने चारचाकी,दोन चाकी गाड्या येण्या - जाण्यास अडचणी येत निर्माण झाल्या आहेत. पुणे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पुण्याची तुंबई झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर नदीच्या पाण्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाणी वाहिले असून यामध्ये अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. झोपडपट्टयांमध्ये पाणी शिरल्याने येथील रहिवाशांची तारांबळ उडाल्याची माहिती समोर येत आहे.

अलीकडच्या काळात पाऊस अवेळी पडत असल्याने जागतिक तापमान वाढीचा परिणाम वातावरणावर झाला असल्याचे पर्यावरण तज्ञाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे कधी पाऊस जास्त पडतो तर कधी कमी. याचा परिणाम शेती क्षेत्राबरोबरच निसर्गावर देखील होत असल्याचे दिसून येत आहे. बदलत्या वातावरणाला वाढती सिमेंटची जंगले, त्याचबरोबर वाढते प्रदूषण,जंगलांचे कमी होणे असल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच अवेळी वादळे,पाऊस,पूर,भुस्कलन होत आहेत. असे सांगितले जात आहे.




परतीचा पाऊस राज्याला झोडपून काढू लागला आहे. अनेक धरणे,तलाव,नदी, नाले,ओढे भरून वाहू लागले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सिना नदीचा देखील समावेश होतो. या नदीच्या वर असणारे उजनी धरण आणि कोळेगाव प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने सिना नदीत पाणी सोडण्यात आल्याने नदी काठचे जनजीवन विस्कळित झाले असून पिके पाण्याखाली गेली आहेत. बंधाऱ्यावर पाणी असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. धरण क्षेत्रात आणि कोळेगाव प्रकल्प क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरू असल्याने या नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या नदीच्या पाण्यात शेतकऱ्यांची पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं आहे.

करमाळा,माढा,बार्शी,माळशिरस,अक्कलकोट,दक्षिण,सोलापूर,उत्तर सोलापूर,मोहोळ,पंढरपूर तालुक्याला परतीच्या पावसाचा तडाखा

सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून यामध्ये अनेक ठिकाणी नुकसान झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. गेल्या पाच ते दहा दिवसापासून परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवनावर परिणाम झाला असून पावसाने जिल्ह्यातील करमाळा,माढा,बार्शी,अक्काकोट,मोहोळ,माळशिरस,दक्षिण सोलापूर,उत्तर सोलापूर,पंढरपूर मोहोळ या तालुक्यांना झोडपून काढले आहे. या तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नद्या,नाले,ओढे भरून वाहू लागले आहेत.




करमाळा आणि माढा तालुक्याच्या सीमेवर असणारे उजनी धरण यापूर्वी पडलेल्या पावसाने भरल्याने काही दिवसापूर्वी भीमा नदीत पाणी सोडण्यात आले होते. धरण क्षेत्रात सातत्याने पाऊस पडत असल्याने भीमा आणि सिना नदीत पाण्याचा विसर्ग वाढत असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. वाढत्या पावसामुळे नागरिक हैराण झाले असल्याचे दिसून येत आहे. याच पावसामुळे वीज पडून अक्कलकोट तालुक्यात नागरिक जखमी झाले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणच्या बंधाऱ्याचे नुकसान झाले आहे. भराव वाहून गेले आहेत. नदीला पाणी असल्याने ते ओलांडत असताना काही नागरिक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. बार्शी तालुक्यात पावसाने जोरदार हजरी लावली असून अनेक ठिकाणच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू निर्माण झाले आहेत. ऐन दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांवर पावसाच्या रूपाने संक्रात कोसळली आहे. जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर,उत्तर सोलापूर,मोहोळ तालुक्यात देखील पावसामुळे नुकसान झाले आहे.

करमाळा आणि माढा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस

जिल्ह्यातील करमाळा आणि माढा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने या दोन्ही तालुक्यातील अनेक गावातील अनेक ठिकाणी शेती पिकाचे नुकसान झाले आहे. करमाळा तालुक्यातील केम येथील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाले आहेत. त्याचबरोबर या पावसाच्या पाण्याने माढा तालुक्यातील कुर्डुवाडी परिसरातील शेती पिकांचे देखील नुकसान झाले आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने प्रशासनाला पंचनामे करण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. नुकसान ग्रस्त भागाला या मतदार संघाचे लोकप्रतिनिधी यांनी भेटी देवून पाहणी केली आहे.





करमाळा आणि माढा तालुक्यात परतीच्या पावसामुळे ओढे,नाले भरून वाहिल्याने सिना नदीच्या पाण्याच्या पातळीत थोड्याफार प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येते. तसेच धरण क्षेत्रात पावसाने कहर केल्याने नदीला पाणी सोडण्यात आले आहे. पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होवू लागली आहे.

परतीच्या पावसामुळे सिना नदीला पाणी

जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे सिना नदीला पाणी आले असून नदी काठची पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येवू लागली आहे.

शेतकरी अमोल हजारे यांनी बोलताना सांगितले,की माझी शेती नदीच्या कडेला असून साखळी फुटून शेतात पाणी शिरते. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान होते. यामध्ये 50 ते 60 हजार रुपयांचे नुकसान होत असून शासन केवळ 5 हजार रुपयांची मदत देते. ती तुटपुंजी असून मदत वाढवून देण्याची मागणी शेतकरी अमोल हजारे यांनी बोलताना व्यक्त केली.




अनेक ठिकाणचे बंधारे पाण्याखाली वाहतुकीवर परिणाम

सिना नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे अनेक बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना शेतातील माल मार्केट ला घेवून जात असताना अडचणी येत आहेत. विद्यार्थी,नोकरदार वर्ग,महिला यांचा गावचा संपर्क तुटल्याने अनेक गावच्या लोकांना वळसा घालून दुसऱ्या गावात जावे लागत आहे. नदी पलीकडे असणाऱ्या शेतात शेतकऱ्यांना जाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.




कोळेगाव प्रकल्पातून 20 हजार क्युसेक्स ने पाण्याचा विसर्ग - तहसीलदार

जिल्ह्यातील कोळेगाव प्रकल्पातून सिना नदी पात्रात 20 हजार क्युसेक्स ने पाणी सोडण्यात आले असून नदी काठ च्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस पडत असून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाची सर्व यंत्रणा सज्ज असून पोलीस पाटील,तलाठी,कोतवाल,पोलीस निरीक्षक यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मोहोळ चे तहसीलदार प्रशांत बेंडसे यांनी दिली.

Updated : 19 Oct 2022 1:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top