गरोदर स्त्रीला नदी पार करताना पाहून उडेल थरकाप
एका बाजूला रस्ते आणि रेल्वेचे मोठमोठे प्रकल्प तर दुसऱ्या बाजूला गरोदर मातेला भरलेल्या नदीतून लाकडावरून पार करावे लागण्याची परिस्थिती. पहा पालघर जिल्ह्यातील विदारक वास्तव…
X
पालघर : समस्यां च्या गर्तेत अडकलेल्या आदिवासी बहुल असलेल्या कुर्लोद पैकी शेड्याचापाडा येथील सुरेखा लहू भागडे वय (22वर्ष) या नऊ महिनेच्या गरोदर मातेला ताप उलट्यांचा त्रास सकाळी साडेदहा वाजता सुरु झाल्याने येथील गावकऱ्यांनी लाकडाची डोली
अक्षरश तुडुंब भरून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाह पार करून त्यांनी त्या मातेला दवाखान्यात पोहचवले
विकासाच्या नावावर दिवसागणिक रस्ते विकासाचे जाळे विस्तारत समृद्धीसह विविध महामार्ग प्रगतीपथावर नेण्याचे दावे केले जात आहे. आधुनिकतेकडे वाटचाल करत मोनो मेट्रो बुलेट ट्रेन चालवणाऱ्या महाराष्ट्र आजही रस्त्या अभावी येथील आदिवासींना कोसो मैलाची जीवघेणी पायवाट तुडवावी लागत आहे.यामुळे एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्त्सव सुरु असताना दुसरीकडे रस्ता व पुलाअभावी आदिवासींना मरणयातना सोसाव्या लागत आहेत.
आजही पालघर जिल्ह्यातील अनेक गाव पाड्यांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा यांची प्रतिक्षा आहे. देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी मुबंईपासून 100 किमी अंतरावर तर मोखाडा तालुक्याच्या मुख्यालयापासून 20 ते 25 किमी अंतरावर दरी डोंगरात कुर्लोद ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जव्हार मोखाडा तालुक्यांच्या सीमेवर आदिवासी बहुल लोकवस्ती असलेला जांभुळ पाडा 30 घरे 110 लोकसंख्या शेड्याचापाडा 15 घरे रायपाडा 20 घरे रायपाडा व शेड्याचा पाडा एकूण 500 पेक्षा
लोकसंख्या असलेल्या गावपाडे सोयीसुविधा पासून वंचित आहे. याबाबत मॅक्समहाराष्ट्राने सातत्याने आवाज उठवून येथील आदिवासींच्या सोयीसुविधेचा प्रश्न सातत्याने चव्हाट्यावर आणला आहे पावसाळा सुरु झाला का येथील आदिवासी बांधवाना मरणयातना भोगाव्या लागतात एक आदिवासी महिला नदी ओसंडून वाहत असताना बंधाऱ्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचा व्हिडिओ दिनांक 24तारखेला समोर आला होता हि घटना ताजी असतानाच 25तारखेला एका गरोदर मातेला लाकडाची डोली करून तुडुंब भरून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहातून जीवघेणा प्रवास करावा लागल्याची दुर्दवी घटना समोर आल्याने येथील रस्त्याचा व पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
यामुळे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरही जर एखाद्या गावाला मूलभूत गरज पुर्ण होण्यासाठी झटावे लागत असेल तर हे नेमक्या कोणत्या विकासाचे द्योतक आहे हा खरा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे
कुर्लोद ग्रामपंचायती मधील शेड्याचापाडा,आंबेपाडा,रायपाडा,जांभूळपाडा
या गावपाड्याला रस्ताच नाही यामुळे उन्हाळ्यात नदी आटलेली असल्यामुळे कसा तरी प्रवास होतो मात्र पावसाचे प्रमाण वाढल्यावर मात्र या पाड्यांचा आणि जगाचा संपर्कच तुटतो.
पावसामुळे सदरची नदी ओसंडून वाहते यामुळे नदी पार करताच येत नाही. या दिवसांत या गावपाड्यांचा संपर्क तुटतो अशावेळी जगण्यासाठीच्या गरजेचा वस्तू आणणे सोडा मात्र शाळा,दवाखाना या सुविधा मिळत नाहीत.त्यात आता तर जगण धोक्यात आले आहे कारण काही महिन्यांपूर्वी या नदीवर एका संस्थेकडून मोठा बंधारा बांधण्यात आला यामुळे पाणी कमी असेल तर यावरून या बाजुला जाणे येणे शक्य होते. पाण्याचे प्रमाण वाढल्यास हा प्रवास अधिक धोक्याचा होतो मात्र जगण्यासाठी बाहेर तर पडावे लागेल या मजबुरीने येथील महिला बालके या बंधाऱ्यावर ये जा करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे हे कधी जीवावर बेतेल हे सांगता येत नाही.येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी यासंबंधी पाठपुरावा केला अर्ज दिले मात्र
याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप कुर्लोद वासियांनी केला आहे
कामानिमित्त किंवा रुग्णांना घेऊन येथील आदिवासी बांधव नदीतून जीवघेणी कसरत करत 5 किलोमीटरचा भला मोठा डोंगर तुडवत केवनाळे गाव गाठतात. तिथेही गाडी भेटली तर ठीक नाही तर 20किमीचे अंतर पार करत खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागते. यामुळे पेशंटला वेळेत उपचार न मिळाल्याने मागील पाच वर्षात 9 पेशंट उपचाराविना दगावले आहेत.
जांभूळपाडा ,रायपाडा, शेड्याचा पाडा, आंब्याचापाडा,हे पाडे राज्यापासून तुटलेले पाडे आहेत. येथे सोयीसुविधांचा अभाव आहे गावातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर लाकडाची डोली करून 5 किमीचा डोंगर पार करून त्या रुग्णाला न्यावे लागते. वेळेत उपचार न मिळल्याने येथील 1) जानू बेंडू भागडे( वय 25)सर्पदंशाने मृत्यू शेड्याचा पाडा 2) मंग्या रामा भागडे (वय 45 ) पोटाचा आजार शेड्याचापाडा 3) रुपाली केशव मोडक (वय 4 वर्ष) सर्पदंशाने मृत्यू शेड्याचा पाडा 4) जयराम नथु कोती शेड्याचा पाडा (वय 38) आकडीने मृत्यू 5) जानकी घाटाळ नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू 6) सक्री बाबू दोरे तापाने मृत्यू 7) सुनिल निखडे (वय 24 ) रायपाडा तापाने मृत्यू 8)सुंदर निखडे ताप उलटी अतिसार यामुळे मृत्यू अश्या आठ पेक्षा अधिक रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. यामुळे शासनाच्या मेक इन इंडिया डिजिल इंडिया, .या योजना कुठे आहेत ?, असा सवाल यावेळी उपस्थित होतोय.
" आम्ही याबाबत वेळोवेळी मागणी केली आहे मात्र अद्याप येथील पुलाचा विषय सुटलेला नाही.पावसाळ्यात जीवघेणा प्रवास करावा लागतो घरात बसून उपाशी रहायचे कि असा प्रवास करून जीव धोक्यात घालायचा असे प्रश्न आमच्यासमोर आ वासुन उभे आहेत. पावसाळयात वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक पेशंट दगावली आहेत यामुळे शासन अजून किती बळींची वाट पहाणार आहेत असा संतप्त सवाल यानिमित्ताने कुर्लोद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन मोडक यांनी उपस्थित केला आहे.