पालखी मार्गावर रस्त्याचा पेच; आषाढी एकादशीला आंदोलन
आषाढी एकादशीनिमीत्त देशभरातून अनेक पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. मात्र मोहोळ शहरातून पालखी मार्ग जात असतानाही सर्व्हिस रस्ते करण्यात आले नाहीत. त्यामुळे आषाढी एकादशीला नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे, याचा वेध घेणारा अशोक कांबळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट
X
येत्या 10 तारखेला आषाढी एकादशी असून त्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. महाराष्ट्राच्या आणि राज्याच्या बाहेरून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. वारकऱ्यांच्या जाण्या येण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी शासन, प्रशासन काळजी घेताना दिसत आहे. वारकऱ्यांची सोय व्हावी या हेतूने शासनाने मोहोळ-पंढरपूर-आळंदी या पालखी महामार्गाची आखणी करून त्याच्या कामाला मूर्त स्वरूप दिले आहे. सध्या या पालखी महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्याची कामे सुरू असून अनेक ठिकाणी कामे अडवण्याचा प्रयत्न ही झाला होता. प्रशासनाने संबधित नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला असला तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात अपयश आले असल्याचे दिसत आहे. दरम्यान मोहोळ शहरातून पालखी महामार्ग जात असताना आवश्यक तेथे सर्व्हिस रस्ते करणे गरजेचे होते. मात्र रर्व्हिस रस्ते बनवण्यात आले नाहीत. त्यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत.
मोहोळमध्ये नागरिकांच्या समस्येकडे शासन,प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जेथे मोहोळ शहरातील लोकवस्ती संपते तेथेच सर्व्हिस रस्ता संपतो असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे. रस्त्याचा सर्व्हे करत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावर असणाऱ्या शाळा आणि मंदिराचा विचार केला नसल्याचे दिसते. मोहोळ-पंढरपूर पालखी मार्गावर शहरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर अकराव्या शतकातील पुरातन मंदिर असून याच मंदिराच्या बाजूला जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. याठिकाणी सातत्याने मुलांना शाळेत सोडायला येणाऱ्या पालकांची आणि लहान मुलांची रहदारी असते. याच मंदिर आणि प्राथमिक शाळेच्या पुढच्या बाजूला इंग्लिश मिडीयम स्कूल असून याठिकाणी मोहोळ शहरासह ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेण्यासाठी येतात. ग्रामीण भागातील मुले या इंग्लिश मिडीयम शाळेत येत असताना चार चाकी वाहनातून येतात. त्यामुळे येथे शाळा भरण्याच्या वेळेत आणि सुटण्याच्या वेळेत गर्दी होत असते. तसेच पुरातन गणेश मंदिर येथे असल्याने या ठिकाणी भाविकांची गर्दी असते. पण याठिकाणी सर्व्हिस रस्त्याची निर्मिती केली नसल्याने भविष्यात अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसात सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न मार्गी नाही लागल्यास आषाढी वारीच्या दिवशी मोहोळ-पंढरपूर पालखी मार्गावर अडवून आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार भारत नाईक यांनी शासन,प्रशासनाला दिला आहे.
दोन किलोमीटरचा वळसा घालून पालकांना आणि मुलांना शाळेत यावे लागते
मोहोळ शहरापासून जवळ असणाऱ्या गणेश मंदिर,इंग्लिश मिडीयम स्कूल आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत येण्यासाठी नागरिकांना पंढरपूरच्या दिशेने दोन किलोमीटर जावून परत तांबोळे गावाला जाणाऱ्या रस्त्यापासून मोहोळ शहराकडे वळून शाळेत दीड किलोमीटरचे अंतर कापून यावे लागत आहे. पालकांना मुलांना शाळेत सोडण्याची सकाळची वेळ असते. त्याचवेळी पालकांना कामावर जाण्याची घाई असते. त्यामुळे पालक आणि मुले पंढरपूरकडून मोहोळच्या दिशेने येणाऱ्या वाहनाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करून शाळेत जातात. शाळेत जात असताना मुलांच्या वाहतुकीसाठी असणाऱ्या चार चाकी गाड्याही विरुद्ध दिशेने जात असल्याने पंढरपूरकडून मोहोळ च्या दिशेने येणाऱ्या आणि मोहोळ कडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या शाळेच्या वाहनांचा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पंढरपूरकडून येणारी वाहने उतारावरून वेगाने येत असल्याने या रस्त्याच्या बाजूला पालक आणि मुले थांबलेली असतात. उतारावरून वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी शासन,प्रशासन घेईल का असा ही प्रश्न नागरिक करीत आहेत. त्यामुळे शाळा मंदिरापर्यंत सर्व्हिस रस्ता करण्याची मागणी करण्यात येवू लागली आहे.
आषाढी एकादशी दिवशी नागरिक करणार आंदोलन
मोहोळ पंढरपूर पालखीमार्गावरील मोहोळ बसस्थानक ते मोहोळ शहराच्या हद्दीपर्यत सर्व्हिस रस्ता करावा व मोहोळच्या हद्दीपर्यंतचा रस्त्याचा नकाशा उपलब्ध करून देण्यात यावा, या मागण्यांसाठी चंद्रमौळी गणेश मंदिर अन्नछत्र मंडळ, चेंबर ऑफ कॉमर्स मोहोळ व चंद्रमौळी गणेश मंदिर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने पालखीमार्गावर चंद्रमौळी गणेश मंदिरासमोर रविवार दि. १० जुलै रोजी आषाढी एकादशी दिवशी सकाळी ११.०० वा. रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला या निवेदनाच्या प्रती मोहोळचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
प्राचीन गणेश मंदिर, जिल्हा परिषद शाळा आणि इंग्लिश मिडीयम स्कूल पर्यंत सर्व्हिस रस्ता करण्याची मागणी
मोहोळ पंढरपूर पालखी मार्गावर मोहोळ शहरालगत अकराव्या शतकातील प्राचीन चंद्रमौळी गणेश मंदिर आहे. तसेच मंदिरालगतच शहरातील एकमेव आय.एस.ओ. मानांकन प्राप्त जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा व अंगणवाडी आहे. या चंद्रमौळी गणेश मंदिराच्या दर्शनासाठी सातत्याने भाविकांची गर्दी असते. तसेच शाळेची गुणवत्ता चांगली असल्यामुळे जवळपास 200 विद्यार्थी पहिली ते चौथीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत.
सद्य स्थितीमध्ये मोहोळ पंढरपूर या पालखी मार्गाचे काम सुरु असून मोहोळ कडून पंढरपूर कडे जाणाच्या रस्त्यावरील भोसले शॉपींग सेंटरपर्यंतच सर्व्हिस रस्ता सोडण्यात येणार असल्याचे समजते.पंढरपूरहून सुटणारी दर्शन बसही या गणेश मंदीरात दर्शनासाठी थांबते. त्यामुळे या परिसरात सर्व्हिस रस्त्याची अत्यंत गरज आहे. भोसले शॉपींग सेंटरपासून पुढे मोहोळ शहराची हद्द असणाच्या श्री नागनाथ मंदिरापर्यंत दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्ता करण्यात यावा. जेणेकरुन रस्त्याच्या जवळ असणाच्या वाड्या-वस्त्या वरल विद्यार्थ्यांची,नागरिकांची मोहोळ कड़े येण्यासाठी सोय होणार आहे. गणेश मंदिर व शाळेला येण्यासाटी सर्व्हिस रस्ता न झल्यास त्या परिसरात अपघातांची संख्या वाढणार आहे, व त्या अपघातांच्या भितीपोटी सर्व सुविधांनी सुसज्ज असलेली शाळा बंद पडणार आहे. या सर्व्हिस रस्त्याच्या मागणीबाबत प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी व सुरु असलेल्य कामामध्येच तो रस्ता करुन देण्यात यावा. अशी मागणी नागरिक करीत आहेत.
तसेच मोहोळ ते पेनूर हद्दीतील माळी वस्ती पर्यत तालूक्याच्या हद्दीतून गेलेल्या पालखी मार्गाचा संपुर्ण नकाशा मिळवा अन्यथा आषाढी एकादशी दिवशी रविवार दि. १० जुलै रोजी मोहोळ पंढरपूर रस्त्यावरील चंद्रमौळी गणेश मंदिरासमोर पालखीमार्गावर चंद्रमौळी गणेश मंदिर अन्नछत्र मंडळ, चेंबर ऑफ कॉमर्स मोहोळ व चंद्रमौळी गणेश मंदिर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने रास्ता रोको करणार असल्याचे निवेदन तहसीलदार प्रशांत बेडसे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना देण्यात आले असून या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर व मोहोळ -पंढरपूर-आळंदी पालखी मार्गाचे प्रकल्य संचालक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
संबधित शाळेची शिक्षण समिती व मंदिर समितीकडून सर्व्हिस रस्त्याच्या मागणीसाठी निवेदन प्राप्त झाले असून त्याच्या प्रती वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आल्या आहेत