सावित्री उत्सव : आदराने घ्यावे असं व्यक्तिमत्व्य म्हणजे समाजसुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले-जयश्री शहा
X
मॅक्स महाराष्ट्र महिलांमध्ये शिक्षणाची ज्योत पेटवून महिलांना शिक्षणाचं दार उघडं करुण देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 'सावित्री उत्सव' म्हणून साजरा करत आहे. ज्यांचे नाव अभिमानाने व आदराने घ्यावे असं व्यक्तिमत्व्य म्हणजे समाजसुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ठोस कर्तृत्वामुळेच आजच्या समाजातील स्त्रिया कारकीर्द घडवत आहेत.
सावित्री उत्सव
३ जानेवारी २०१९
भारतातील मुलींच्या शाळेच्या प्रथम संस्थापिका, प्रथम शिक्षिका व प्रथम मुख्याध्यापिका म्हणून ज्यांचे नाव अभिमानाने घेतले जाते त्या व्यक्ती म्हणजे माननीय आद्य समाजसुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा फुले यांचेच.
सावित्रीबाईंच्या खंबीर स्वभावामुळेच त्यांनी या जबाबदाऱ्या पेलल्या. इंग्रजांच्या काळात सावित्रीबाईंच्या ठोस कर्तृत्वामुळेच आजच्या मुली स्वत:च्या ऐच्छिक विषयात शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कारकीर्द करताहेत.
त्यांपैकीच एक, मी सावित्रीची लेक ! हो कारण आज मी एक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि हे शक्य झाले केवळ ज्ञानज्योति सावित्रीबाईंमुळेच. सावित्रीबाईंपेक्षा कमी, पण कष्ट करून गेली २० वर्षे शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. गणित अध्यापनाचे कार्य करीत सावित्रीबाईंच्या आदर्श ज्ञानदानाचा वसा पुढे नेत आहे. त्याचबरोबर जमेल तिथे, जमेल तितके समाजसेवेचे कार्य करीत असते.
सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी स्त्री-शिक्षणासाठी केलेला संघर्ष हा कायमच मला प्रेरणादायी ठरला. म्हणून आयुष्यात सावित्रीबाईंसारखेच अखंड ज्ञानदान व गरजूंसाठी समाजसेवा करण्याची माझीही मनापासून ईच्छा आहे. त्याची सर आज माझ्या किंवा आपल्या कार्याला नक्कीच येऊ शकणार नाही. पण तरीही सावित्रीच्या लेकी म्हणून आपण आपल्या आईच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजाचं काही अंशी ऋण फेडण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो. चला तर मग नवा समाज घडवण्यासाठी जुन्या रूढी परंपरेमधून बाहेर पडू या. इतकंच नव्हे तर ३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस सावित्री उत्सव म्हणून साजरा करू या आणि साऱ्यांना ठणकावून सांगू या.......
आम्ही सावित्रीच्या लेकी
आम्ही ज्योतिबाच्या लेकी
नका समजू आम्हाला दासी
आम्ही कर्तृत्त्वाच्या राशी
(कवयित्री मोरवणकर)
जयश्री शहा
शिक्षिका
आचार्य ए. व्ही. पटेल ज्यु. काॅलेज
(गोकळीबाई), मुंबई