कैरानातील यमुनेच्या पात्रात आटलेला रोजगार आणि विस्थापित
Max Maharashtra | 14 May 2019 2:18 PM IST
X
X
उत्तर प्रदेशातील कैराना जिल्ह्यातील मल्लाह जमातीच्या लोकांमध्ये होत असलेलं स्थलांतर हे भावी पिढ्यांच्या भवितव्यासाठी आणि शिक्षणासाठी घातक आहे. या भागात कलिंगड, टरबूज, काकडी यांची शेती कऱणारे हे लोक आहेत.
जर तुम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला जगवणारं काम आणि मतदानाचा हक्क यापैकी तुम्ही निवडा तर तुम्ही काय निवडाल ? असा आर्त सवाल साठ वर्षांच्या मीना मल्लाह विचारतात तेव्हा त्यांच्या रिकाम्या घरात त्यांचा प्रश्न घुमत राहतो. तिची तीन मुले आणि सुना तिच्यापासून दूर दुस-या जिल्ह्यात कुठेतरी कामाच्या शोधात गेले आहेत. ते कुठे आहेत याचीही तिला कल्पना नाही. ती उत्तरप्रदेशच्या पश्चिम भागात असलेल्या कैराना जिल्ह्यातील रामडा गावात एकटीच रहातेय.
रामडा गावातील दहा हजार लोकसंख्येपैकी सुमारे ६००० लोक हे यमुना नदीच्या तीरावर असलेल्य़ा शेतीवर आपली उपजिविका करीत असतात. या ठिकाणी फळे आणि भाजीपाला पिकवून ते गुजराण करीत मात्र, यमुना नदीचे पात्र सुकत चालल्याने शेती करणे अशक्य असल्याने त्यांना स्थलांतराशिवाय पर्यायच नाहीय. यामुळं कैराना जिल्ह्यातील रामडासह सुमारे वीस गावे स्थलांतरित झाली आहेत.
कैराना जिल्ह्यातील मल्लाह जमातीचे सुमारे वीस हजार लोक स्थलांतरित झाल्याची माहिती केवट मल्लाह एकता समितीचे अध्यक्ष मुस्तकीम मल्लाह यांनी दिली. यातील काही जण हे बिहार, उत्तराखंड या राज्यातील शेतामध्ये मजूरी करतात. तर काहीजण गंगेच्या पात्रातील जमीन भाड्याने घेऊन ती कसतात. तेथील सुपीक जमीनीवर ते कष्ट करून जगत असल्याचे रामडा येथील मल्लाह बस्तीतील या मुस्तकीम यांनी सांगितलं.
या गावाची शांतता भंग होते ती केवळ अरूंद गल्लीतल्या गाड्यांच्या आणि टायरच्या आवाजाने. उन्हाळ्यात झाडांच्या पानांची होणारी सळसळ आणि गळणारी पाने एवढाच काय तो आवाज. अन्यथा कुजबुजही इथे मोठी वाटावी इतकी स्मशानशांतता पसरलेली असते. घरांच्या दरवाज्यांना कड्या आणि कुलूपे दिसतात. या वस्तीत दुकान आहे. मात्र, दुकानदार निवांत झोप घेत असलेला आढळतो. मतदानाच्या दिवशी लोकांना मतदानासाठी यायचे म्हणजे त्यांचा एक दिवसाचा रोजगार बुडतो, त्यातच इतक्या दूरवर यायचे तर प्रवासखर्च होतो तो वेगळा, असं मुस्तकीम सांगतो. सुमारे वीस हजार लोकांना त्यांचा हक्क बजावून योग्य उमेदवार निवडता येत नाही. कारण त्यांच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न असतो.
मल्लाह जमातीचे लोक कमी होताना दिसताहेत. कारण त्यांची स्वतःची जमीन नसल्याने ते नदीपात्रात शेती करण्याचा प्रयत्न करतात. शिक्षणाविषयी या जमातीत फारशी जागृती आणि आस्था नाही त्यामुळं मुलांचं शैक्षणिक भविष्य अंधारमय आहे.
स्थालांतरित होणारे बहुतेक लोक आपल्या मुलांसह स्थलांतरित होतात कारण त्यांच्याकडे लक्ष द्यायला मागे कुणी नसतं. इथल्या शाळेत १०० विद्यार्थ्यांची हजेरीपटावर नोंद आहे. मात्र या काळात वर्गात केवळ तीन ते चार विद्यार्थी दिसतात. या मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत असतो. मात्र ही जमात त्यांच्या प्रगतीसाठी काहीही करू शकत नाही.
कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडल्यानं कैराना जिल्ह्यातील हिंदूंना विस्थापित व्हावं लागत असल्याचा आरोप भाजपानं दोन वर्षापूर्वी केल्यानं त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. मात्र, हे चुकीचे असल्याचे कालांतराने निष्पन्न झाले. पण आता होणारं विस्थापन हे वेगळ्या पद्धतीचं असून त्याबद्दल बोलायला कुणीही तयार नाहीय.
विशेष म्हणजे लोकांच्या स्थलांतरणाचा प्रश्नच नसल्याचे विद्यमान खासदार तबस्सुम हसन सांगतात. त्या समाजवादी पार्टीच्या खासदार आहेत. या भागात रोजगाराची संधी नसल्याने लोकांना बाहेर जावे लागतंय़. त्यामुळं त्यांना शिक्षणाची संधीही उपलब्ध होत असल्याचं सांगून या भागात रोजगार निर्मीती करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्या सांगतात.
रोजगारासाठी स्थलांतरीत होणारे शेतकरी हे कलिंगड, टरबूज, काकडी यांची शेती कऱणारे हे लोक आहेत. ही पिके केवळ पाण्यावर येत असल्याने नदीच्या पात्रातच शेती करणं शक्य असतं. मात्र दिवसेंदिवस पाणी आटत चालल्यानं आता हे शक्य नाहीय, हरयाणा सरकारनं हतनीकुंडातून पाणी न सोडल्यानं नदी पात्र कोरडं पडलंय़, असं मुस्तकीम सांगतो. खरं तर दोन्ही राज्यात भाजपाचीच सरकारं आहेत. त्यातच अनधिकृत वाळू उपसा हा प्रश्न अधिक गंभीर आहे. ही पिकं वाळूत घेतली जातात. जर वाळूच शिल्लक राहीली नाही तर पिकं कशी घेणार.
ही पिकं हिवाळ्यात म्हणजे जानेवारी महिन्यात लावून जून पर्यंत घेतली जातात. त्यामुळं यमुनेच्या पात्राशेजारील गावं सहा ते सात महिने कोरडी असतात. स्थलांतरित झालेले लोक पावसाळ्याच्या सुमारास परत येतात. तेव्हा ते कैराना इथं फेरीवाले म्हणून काम करतात. जर स्थलांतरित असलेल्या काळात त्यांना चांगला पैसा गाठीला बांधता आला तर ते आपल्या मुलींची लग्न करतात. पण ही सुद्धा मोठी कसरत असते.
पश्चिम उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातील गंगा नदीच्या पात्रात जमीन भाड्यानं घेऊन गफर मल्लाह यांचं वीस लोकांचं कुटूंब काम करतं. घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी ते इथं थांबले आहेत. मात्र, आता जगणं कठीण होत असल्याचं ते सांगतात. इथल्या पेक्षा दुप्पट गुंतवणूक गंगा नदीच्या पात्रात करावी लागते. त्यातच जिथं कुटूंब राहतं त्या झोपड्यांचं सहा महिन्याचं भाडही आम्हाला द्यावं लागतं. याआधी जर आम्हाला ४०००० हजारांचं फायदा होत होता तर तो आता दहा तो पंधरा हजारांवर आलाय.
चोवीस वर्षीय गफर कैरानामध्ये रोजगारासाठी आलाय. त्याचं कुटूंब त्याच्याजवळ नाहीय. मला आठवड्यात कसेबसे दोनदा काम मिळते. दिवसाला २५० रूपये हजेरी असतं. मात्र काम शोधण्यातच माझा वेळ जात असल्याचं तो सांगतो.
असा विचार केला तर ६० वर्षीय मीना त्याबातीत दुर्देवी आहे. कारण या वयात तिला मजूरीही करता येत नाही. मी स्वतःसाठी जेवण बनवणं पाणी भरणं ही कामं करते, माझ्यासारख्याच काही वयोवृद्ध माणसं गावात आहेत .त्यांच्याबरोबर राहाते. जेव्हा माझं कुटूंब इथं असतं तेव्हा आम्ही १२ लोक असतो मी नातवंडासह वेळ घालवते. माझा मुलगा आठवड्यातून दोनदा फोन करतो त्यामुळं जिवंतपणाचा अनवुभव येतो नाहीतर मी इथ भुतासारखी एकटीच असते.
अवैध वाळू उपश्यामुळं यमुनेच्या पात्रात कलिंगड, टरबूज, काकडी यांचं पीक घेण्यासाठी आता फार थोडी जागा उरलीय, असं नागलाराई गावाचा तन्वीर मल्लाह सांगतो.
मग गंगेच्या पात्रात शेतीसाठी तु का जात नाहीस असं विचारताच तो सांगतो, गंगेच्या पात्रात जमीन भाड्यानं घेण्यासाठी माझ्याकडं पैसै नाहीत. त्यामुळं मला इथंच माझ नशीब आजमावावं लागंतंय. पण मलाही लवकरच बाहेर पडावं लागेल असं वाटतंय गंगेच्या पात्रात नाही तरी कुठेतरी मजूरी करावी लागेल. कारण मी वाटाणे लावले आहेत. मात्र, सर्व पात्र कोरडं पड़लंय इतकंच का मी घेतलेल्या बोरवेलला सुद्धा पाणी नाहीय. मी गुतवलेला पैसाही पाण्यात गेला. आता काकडीतून काही पैसै मिळतील अशी मला आशा आहे. मला आठवत असल्यापासून मी शेती करतोय हा आमचा पिढीजात व्यवसाय आहे.
नदीचं पात्र आता कोरडं आहे दहा पंधरा वर्षापूर्वी काय परिस्थीती होतीस विचारताच तो सांगतो, आता इथं राहून पीक घेणा-या मोजक्या लोकांपैकी मी एक आहे, मला आठवतंय दहा वर्षापूर्वी हा सर्व परिसर हिरवाईने नटलेला असायचा. शेतातून तुम्हाला वाळू शोधावी लागायची. आज हे सर्व भकास आहे. आमच्याकडे पैसैही नाहीत आणि कुठलंही सामाजिक पाठबळ नाही.
सदर रिपोर्ट 'फर्स्टपोस्ट' या इंग्रजी वेबसाईटला 10 एप्रिल 2019 ला प्रकाशित झाला असून या मूळ रिपोर्टची खाली देण्यात आली आहे.
Travels through the Hindi belt: In dry Ramda village of UP's Kairana, Mallah community has little choice but to migrate
Updated : 14 May 2019 2:18 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire