Home > मॅक्स रिपोर्ट > राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे विठ्ठलाची काकड आरती बंद

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे विठ्ठलाची काकड आरती बंद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवर भोंग्यावरुन घेतलेल्या भुमीकेचे सर्व राज्यभर पडसाद उमटले आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावरील स्पीकरवर चालणारी पहाटेची काकड आरती बंद झाली असून अजान बंद करायले गेले काकड आरतीबंद झाली असे चित्र सध्या पंढपुरात आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा ग्राऊंड रिपोर्ट....

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे विठ्ठलाची काकड आरती बंद
X

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्या संबंधीच्या भूमिकेमुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील स्पीकरवर चालणारी पहाटेची काकड आरती बंद झाली असून गेले अजान बंद करायला आणि बंद झाली काकड आरती. त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. राज ठाकरे यांनी महागाई, बेरोजगारी या मुद्यावर सरकारशी भांडावे पंढरपूरकर त्यांना साथ देतील. त्यांच्या भोंग्याच्या राजकारणाला एक पंढरपूरकर म्हणून विरोध असून त्यांच्या भूमिकेमुळेच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील स्पीकरवरची काकड आरती बंद झाली आहे. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी बोलताना केला. महागाईने सर्वसामान्य जनता हैराण झाली असून पेट्रोल,डिझेल,घरगुती गॅस आणि खाद्य वस्तू यांच्या किंमती वाढल्या आहेत. राज ठाकरे या विषयावर न बोलता भोंग्यावर बोलत आहेत. सध्या महागाईचा मूळ प्रश्न बाजूलाच राहिला आहे. राज्यामध्ये भोंग्यावरून जे राजकारण पेटले आहे. ते आम्हाला महत्वाचे वाटत नाही. कोरोना महामारीने जग ठप्प झाले असताना आता कुठे पंढरपूरच्या यात्रा चालू झाल्या आहेत. त्यामुळे आमची उपजीविका सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी भोंग्याचा घेतलेला विषय पूर्णपणे चुकीचा असून वाढत्या महागाई वरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पंढरपूर मध्ये कोणतीही धार्मिक तेढ निर्माण होणार नाही. कारण सगळ्यांची उपजीविका विठ्ठल मंदिरावर चालते. विठ्ठल मंदिरातील पहाटेची स्पीकरवरील काकड आरती बंद झाल्याने पंढरपूरकर राज ठाकरेंच्या भूमिकेवर नाराज असून त्यांच्या भोंग्याच्या भूमिकेला पंढरपूरकरांचा विरोध आहे. पहाटेच्या काकड आरतीला शासनाने रीतसर परवानगी द्यावी. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक बाहेर राज्यातून आणि राज्यभरातून येत असतात. काकड आरती वेळी सर्वांनाच मंदिरात प्रवेश मिळणे अशक्य असते. त्यामुळे काकड आरतीचा लाभ सर्व भाविकांना मिळावा, यासाठी शासनाने पुन्हा भोंग्यावरची काकड आरती सुरू करावी. जेणे करून भाविकांची सोय होईल. असे सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांना वाटते.

भोंग्याच्या राजकारणाचा पंढरपूरला फटका

सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी बोलताना सांगितले की,पंढरपूर नगरी लाखो साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी आहे. आमच्या लहानपणापासून विठ्ठल मंदिरात स्पीकरवर चालणारी काकड आरती,संध्याकाळची धूप आरती कानावर पडत आहे. या काकड आरतीचा आवाज सर्व पंढरपुरात ऐकू येत होता. त्यामुळे वातावरण प्रसन्न होवून जायचे. काकड आरतीला मंदिरात मोजकेच लोक जाऊ शकतात. कारण सर्व भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणे अशक्य आहे. पण स्पीकरमुळे मंदिराच्या बाहेर हजारो लोक काकड आरतीचा लाभ घेतात. सध्या भोंग्यावरून जे राजकारण चालले आहे. त्याचा सर्वात मोठा फटका पंढरपूरला बसला आहे. मस्जिदवरची भोंग्यावर चालणारी अजान बंद झाली आहे. त्याचबरोबर विठ्ठलाच्या मंदिरातील स्पीकरवरची काकड आरती ही बंद झाली आहे. त्यामुळे स्मशान शांतता वाटत आहे. शासनाचे खरेच भाविक भक्तांवर प्रेम असेल तर भोंग्यावरची काकड आरती पुन्हा चालू करावी.

काकड आरतीला प्रत्येक भाविकाला मंदिरात प्रवेश मिळणे अशक्य

कुंडलिक मंदिराचे पुजारी यांनी सांगितले की, प्रत्येक भाविकाला काकड आरतीला मंदिरात प्रवेश मिळणे अशक्य असते. भाविक जरी लांब असले तरी त्यांना स्पीकरवरच्या काकड आरतीचा लाभ घेता येत होता. स्पीकरवरची काकड आरती बंद झाल्याने भाविकांना त्याचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे सर्व पंढरपूरकर नाराज झाले आहेत. नित्यउपचार काकड आरती मंदिरात चालूच आहे. पण या भोंग्याच्या प्रकरणावरून पांडुरंगाच्या मंदिरावरील भोंगा उतरवलेला आहे. स्पीकरमुळे रोज काकड आरती लोकांना ऐकायला मिळत होती. त्यामुळे रोज प्रसन्न वाटायचे. आता यापुढे काकड आरती ऐकायला मिळणार नाही.

सरकारने काकड आरती भोंग्यावर सुरू करावी

सर्वच भाविक काकड आरतीला मंदिरात जाऊ शकत नाहीत. गर्दी झाल्यास त्याचा लोकांना त्रास होतो. स्पीकरवर लोक बाहेरून तरी काकड आरतीचा लाभ घेऊ शकत होते. सध्या स्पीकरवरची काकड आरती बंद झाल्याने भाविक नाराज आहेत. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर स्पीकरवरची काकड आरती चालू करावी. असे मुंबईच्या भाविकांने बोलताना सांगितले.

काकड आरतीचा लोकांवर होतो परिणाम

पंढरपूरचे स्थानिक रहिवाशी असलेल्या नागरिकानी बोलताना सांगितले की, भक्तांवर काकड आरतीचा खूप परिणाम होतो. स्पीकरवरची काकड आरती बंद झाल्याने वातावरण प्रसन्न नाही. निजाम सरकारने सुद्धा त्यावेळेस नगारा वाजवण्याची परवानगी दिली होती. नगारा वाजवणाऱ्याना मानधन दिले जात होते. त्याकाळी निजाम सरकारने सुद्धा मान्यता दिली होती. या सरकारने स्पीकरवरची काकड आरती पुन्हा चालू करावी व लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करावा.

पहाटे चार वाजल्यापासून विठ्ठलाच्या पूजेला होते सुरुवात

विठ्ठल मंदिराचे पूर्वीचे पुजारी बडवे यांनी बोलताना सांगितले की, पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत विठ्ठलाच्या पूजेचे नित्यउपचार चालतात. हे नित्यउपचार चालू असताना जागेअभावी सर्व भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणे अशक्य असते. लाऊडस्पीकरच्या माध्यमातून काकड आरती,धूप आरती याच्यामध्यमातून जी वातावरण निर्मिती होत होती. ती पूर्णपणे बंद झाली आहे. शासनाला विनंती आहे की, स्पीकरवरची काकड आरती पुन्हा सुरू करावी. विठ्ठल मंदिराचा पहाटे 4 वाजता दरवाजा उघडला जातो. त्यानंतर देवाचे 2 तास नित्यउपचार चालतात. 11 वाजता देवाला महानैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर 4 वाजता देवाला पोशाख परिधान करून पूजा केली जाते. सायंकाळी 7 वाजता देवाची धूप आरती होते. त्यानंतर रात्री 11 वाजता देवाजी शेज आरती करून मंदिर बंद केले जाते. स्पीकरवरची पहाटेची काकड आरती बंद झाल्याने भाविकांच्या कानावर देवाचे शब्द पडेना गेले आहेत. भाविक नुसते दर्शन घेऊन निघून जात आहेत. भाविक मंदिराच्या बाहेर उभारून मंगलमय वातावरणाचा लाभ घेत होते. ते आता बंद झाले आहे. त्यामुळे शासनाने स्पीकरवरच्या काकड आरतीला परवानगी द्यावी.

पंढरपूर मध्ये कधीच धार्मिक वातावरण बिघडले नाही

सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी बोलताना सांगितले की, पंढरपूर मध्ये कधीच धार्मिक वातावरण बिघडले नाही. सर्व जाती धर्माचे लोक पिढ्यान पिढ्या एकत्र रहात आहेत. हिंदू व मुस्लिम एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी होतात. पंढरपूर शहरात आजपर्यंत कुठल्याच जातीय दंगली झाल्या नाहीत. सर्वांची उपजीविका विठ्ठल मंदिरावर चालते. आमच्या सगळ्याचा माय बाप विठ्ठल आहे. त्यामुळे येथे सर्व जनता सुखात आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या जे चालू आहे त्याचा पंढरपूरवर कुठलाच परिणाम होणार नाही. कारण येथील सर्वच समाज एकमेकांना घट्ट धरून आहेत. कुंकू,फळे विकून येणाऱ्या भाविकावर मुस्लिम समाज आणि हिंदू समाज सुद्धा जगतोय. येथे सर्वजण गुण्यागोविंदाने राहत असल्याने जातीय तेढ कधीच निर्माण झाली नाही. जातीय तेढ निर्माण व्हावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. पण डाव यशस्वी झाला नाही. कालच मुस्लिम बांधवांची मुलाखत ऐकली,त्यात त्यांनी म्हटले आहे की, आमची स्पीकरवरची अजान बंद करा,पण विठ्ठलाची सकाळची काकड आरती चालू करा. म्हणजे विठ्ठलाच्या बाबतीत अशी भावना इतर धर्मियांची ही आहे. त्यांना विठ्ठला विषयी प्रेम आहे.

पंढरपूर च्या आसपासची नगरी विठ्ठलावर चालते. एका स्पीकरच्या काकड आरतीने पूर्ण वातावरण भक्तिमय होत होते. येणारा-जाणारा भाविक आनंद साजरा करत होता. ज्या भक्तला टेन्शन आले आहे,त्याचे टेन्शन घालवण्याचे काम हा लाऊडस्पीकर करत होता. स्पीकरवरची आरती बंद झाल्याने काहीतरी चुकल्यासारखे वाटत आहे. शासनाने या मंदिरावर रीतसर परवानगी घेऊन कायमस्वरूपी स्पीकरची सोय करावी. पंढरपूर ची जनता सुज्ञ असून कोणी कितीही तेल ओतण्याचा प्रयत्न केला किंवा काडी लावण्याचा प्रयत्न केला तर पंढरपूर ची जनता फक्त विठ्ठलावर प्रेम करणारी आहे. ती सर्व जाती धर्माला सोबत घेणारी आहे. येणाऱ्या काळात बाहेर जरी काही घडले तरी पंढरपूरात काही घडणार नाही. अस मला वाटतय असे गणेश अंकुशराव यांनी सांगितले.


Updated : 8 May 2022 3:58 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top